हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता फिश वेंकट यांची तब्येत सध्या अत्यंत नाजूक असून त्यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
फिश वेंकट यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि #PrayForFishVenkat हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे. अनेक सहकलाकारांनीही त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
फिश वेंकट हे दाक्षिणात्य सिनेमातील एक लोकप्रिय विनोदी कलाकार आहेत. त्यांनी ‘गब्बरसिंग’, ‘रेडी’, ‘दुव्वाडा जगन्नाधम’, ‘सराईनोडु’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या खास शैलीतील संवादफेक आणि विनोदी अभिनयामुळे त्यांना स्वतंत्र फॅनबेस मिळाला आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत निवेदन अद्याप आलेले नसले तरी, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील २४ तास त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
फिश वेंकट यांचं आरोग्य संकटात असून संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांचे लक्ष त्यांच्या प्रकृतीकडे लागले आहे. त्यांच्या चाहत्यांनी लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली आहे.