मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल शेफाली जरिवाला यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. केवळ ४२ वर्षांची असलेल्या शेफालीचा मृत्यू शुक्रवारी, २७ जून रोजी झाला. त्यानंतर शनिवारी ओशिवरा स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नसतानाही पोलीस तपासात काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.
मुंबई पोलीसांनी अंधेरी येथील शेफालीच्या घरात पंचनामा करताना काही औषधं व सप्लिमेंट्स जप्त केली आहेत. यात अॅन्टी-एजिंग गोळ्या, त्वचा चमकदार ठेवण्यासाठीचे सप्लिमेंट्स व विविध प्रकारचे जीवनसत्व (विटॅमिन) गोळ्या यांचा समावेश आहे. हे सर्व ती कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेत होती, असं तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या गोळ्यांचा तिच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पोलीसांनी या तपासाअंतर्गत मिळवलेल्या पंचनाम्याचा भाग म्हणून हे बॉक्स जप्त केले. मात्र यामुळे तिच्या आरोग्यावर काही गंभीर परिणाम झाला होता का, याबाबत अजूनही संशय कायम आहे.
शेफालीचा पती पराग त्यागी याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मृत्यूपूर्वीच्या दिवशी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने शेफाली उपवास करत होती. उपवासानंतर अन्न ग्रहण केल्यावर ती एकदा बेशुद्ध पडली होती, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. यावरून डॉक्टरांचा अंदाज आहे की, रक्तदाबात अचानक झालेली घसरण (सडन बीपी ड्रॉप) हे मृत्यूमागील संभाव्य कारण असू शकतं.
शुक्रवारी शेफालीला तिचा पती आणि तीन इतर व्यक्ती बेलव्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. यानंतर शवविच्छेदनासाठी तिचं पार्थिव RN कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे आणि त्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. सध्या मुंबई पोलिसांनी सदोष मृत्यू (Accidental Death Report - ADR) चा गुन्हा नोंदवला असून, प्राथमिक तपासात कोणतंही संशयास्पद किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं कारण आढळून आलेलं नाही.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.