मुंबई : राज्य सरकारकडून ज्येष्ठ लोककलाकारांना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मानधन कार्यप्रणाली (SOP) स्पष्टपणे कळवावी, असे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मंत्री शेलार बोलत होते. या वर्षीच्या मानधनासाठी आवेदन प्रक्रिया आजपासून (१ जुलै) सुरू झाली असून, मागील काही वर्षांपासून या प्रक्रियेबाबत तक्रारी येत असल्याने त्यावर वेळेत कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, "प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराने दिलेल्या आवेदनाला ठरलेल्या कालमर्यादेत लेखी उत्तर दिलं गेलं पाहिजे. यामुळे प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण होईल आणि कलाकारांच्या प्रश्नांना वेळेत प्रतिसाद मिळेल." बैठकीत असेही निदर्शनास आले की, काही जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ कलाकार मानधन समित्यांचे गठन अद्याप झालेले नाही. त्यामुळे या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि समान धोरण राबवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कार्यपद्धती पुन्हा कळवणे आवश्यक असल्याचं मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं.
सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, उप सचिव महेश वाव्हळ, सह संचालक श्रीराम पांडे यांच्यासह विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मंत्री शेलार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “मानधन वितरणात पारदर्शकता, वेळेवर उत्तर आणि तक्रारींचे कालबद्ध निवारण ही प्राथमिकता असावी. प्रशासनाची जबाबदारी म्हणजे केवळ अनुदान देणं नव्हे, तर ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाला योग्य तो सन्मान आणि आदर मिळावा, हे सुनिश्चित करणं आहे.''
राज्य शासनाकडून दरवर्षी विविध लोककलांमध्ये योगदान दिलेल्या ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक सहाय्य स्वरूपात मानधन दिलं जातं. मात्र, अर्जाच्या प्रक्रियेमध्ये विलंब, उत्तर मिळत नसणं, समित्यांच्या बैठका वेळेत न होणं यामुळे अनेक कलाकार नाराजी व्यक्त करत असतात. या पार्श्वभूमीवर मंत्री शेलार यांच्या सूचनांमुळे यंदाच्या वर्षीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेवर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.