'माॅं' चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी घसरण; काजोलच्या भयपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद!

    01-Jul-2025   
Total Views |


maa film collections drop on third day

मुंबई : काजोलची प्रमुख भूमिका असलेला नवा थरारपट 'माॅं' २७ जूनला मोठ्या अपेक्षांसह चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने दमदार कमाई करत सकारात्मक सुरुवात केली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.
चित्रपट विश्लेषक संस्था सॅकनिल्कच्या प्राथमिक अंदाजानुसार, रविवारी 'माॅं' ने केवळ ४० लाख रुपयांची कमाई केली. तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहता, हा आकडा दुसऱ्या दिवसाच्या ₹६.१८ कोटी आणि पहिल्या दिवसाच्या ₹४.६५ कोटी कमाईच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे एकूण तीन दिवसांत चित्रपटाची कमाई ₹११.२३ कोटी इतकी झाली आहे.
काय आहे घसरणीचं कारण?
'माॅं' चित्रपटामध्ये भयपट शैली असली, तरी त्याची कथा पारंपरिक मदर सेंटिमिमेंट आणि अतींद्रिय शक्तींवर आधारित आहे. काजोलचा अभिनय वाखाणण्याजोगा असला तरी कथानकाचा वेग, पटकथेतील काही ठिकाणी जाणवणारी झपाटलेपणाची कमतरता आणि प्रेक्षकांच्या विशिष्ट वर्गालाच रुचणारी शैली यामुळे सामान्य प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंती मिळालेली दिसत नाही.
त्याशिवाय, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालतो आहे. त्याने नऊ दिवसांतच ₹९५.५ कोटींची कमाई करत ‘मा’साठी मोठं स्पर्धात्मक वातावरण तयार केलं आहे.
समीक्षकांची माफक स्तुती
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी 'माॅं' ला ३.५ स्टार दिले असून, त्यांनी काजोलच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, "हा केवळ एक भयपट नाही, तर एका आईची झुंज दर्शवणारी कहाणी आहे." मात्र, समीक्षकांकडून आलेली स्तुती बॉक्स ऑफिसवर रूपांतरित झालेली दिसत नाही.

ओटीटीवरून अपेक्षा
निर्मात्यांनी जाहीर केलं आहे की ‘मा’ लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने, आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाला नव्याने प्रेक्षक मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.
सामान्यतः थिएटर रिलीजनंतर ४५-६० दिवसांत चित्रपट ओटीटीवर येतो. त्यामुळे 'माॅं' ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर झळकण्याची शक्यता आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.