पाकिस्तानने पचवले अफगाण निर्वासितांचे पैसै! देश सोडण्याचे दिले आदेश
19-Nov-2023
Total Views | 73
मुंबई : पाकिस्तानने अफगाण निर्वासितांना देशातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर अफगाण निर्वासित व्यावसायिकांकडून घेतलेले पैसे परत देण्यास पाकिस्तान्यांनी नकार दिला आहे. ते काही दिवसांत परत जाणार असल्याचे माहिती असूनही पाकिस्तानी त्यांचे पैसे परत करत नाहीत.
पाकिस्तानने अलीकडेच अफगाण निर्वासितांना देशातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अफगाण निर्वासित १९७९ मध्ये अस्थिर अफगाणिस्तानातून पळून पाकिस्तानमध्ये आले होते. त्यानंतर आता पाकिस्तान सरकारने १७ लाख अफगाण नागरिकांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे.
यासोबतच हे अफगाणी लोक त्यांच्यासोबत केवळ ५० हजार रुपये घेऊन जाऊ शकणार असल्याचेही पाकिस्तान सरकारने सांगितले आहे. तसेच आतापर्यंत जवळपास २ लाख अफगाण नागरिक पाकिस्तान सोडून गेले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.
पाकिस्तानातील कराची शहरातील अल आसिफ भागात राहणारा हाजी मुबारक शिनवारी हा एक अफगाण शरणार्थी आणि व्यापारी आहे. वाहतुकीपासून कपड्यांपर्यंत अनेक व्यवसाय त्याच्याकडे आहेत. तसेच त्याने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी लोकांना कर्जही दिले आहे. पाकिस्तानी त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पाकिस्तानी पोलिस त्यांच्या भागात येऊन त्यांची पिळवणूक करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाविरोधात अफगाण महिलांनी निदर्शने केली आहेत.