परिस्थितीचा बाऊ न करता, अभ्यासात सातत्य ठेवत, एकाचवेळी एक नव्हे, तर दोन-दोन पोस्ट मिळवणार्या शेतकर्याची मुलगी ते क्लास टू अधिकारीपदापर्यंत मजल मारलेल्या सोनाली पगारेविषयी...
परिस्थितीचे कारण देत, ग्रामीण भागातील अनेक मुली बर्याचदा शिक्षण अर्धवट सोडून लग्न करून चूल आणि मूल यामध्येच अडकून पडतात. परंतु, संधी मिळाली, तर ग्रामीण भागातील मुलगी केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर किती मोठी झेप घेऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे सोनाली बाळू पगारे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक या छोट्या गावातील सोनालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगात एकाचवेळी दोन-दोन पोस्ट मिळवल्या.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सोनालीच्या डोळ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. आई-वडिलांची आणि मित्रमंडळींची भक्कम साथ होती. अनेकदा अपयशही आले, परंतु ती खचली नाही. नातेवाईकांचे प्रसंगी टोमणेही ऐकावे लागले, पण सोनालीने कधीच ध्येयाशी तडजोड केली नाही. तिचे ध्येय निश्चित होते आणि त्यात सातत्यदेखील होते. शेवटी सोनालीने करून दाखवलेच आणि एक नव्हे, तर एकाचवेळी दोन-दोन पोस्ट मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शिवाय ज्या नातेवाईकांनी तिला सुरुवातीला टोमणे मारले, त्यांनीसुद्धा सोनालीचे तोंडभरून कौतुक केले.
सोनालीचे आई-वडील हे शेती करतात. त्यांच्या घरात एकूण चार मुली. काबाडकष्ट उपसून त्यांनी चारही मुलींना चांगले शिक्षण दिले. केवळ परिस्थिती नाही म्हणून चारही मुलींपैकी कुणालाच शिक्षण कमी पडू दिले नाही. सोनालीचे प्राथमिक शिक्षण दिंडोरीतील उमराळे जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण तिने जनता विद्यालयात घेतले. यानंतर पुढे काय शिकावे, म्हणून तिने नाशिकच्या सामनगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजला 2014 मध्ये अॅडमिशन घेतले. त्यानंतर मॅकेनिकल शाखेतून 2017 साली तिने इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. याच काळात तिने प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात ’आरटीओ’ची परीक्षा दिली. याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तिला काहीच कल्पना नव्हती. मात्र, अभ्यास बर्यापैकी झालेला असल्याने पूर्वपरीक्षा सोनालीने उत्तीर्ण केली. मात्र, ‘मेन्स’ परीक्षेसाठी तिच्याकडे दुचाकीचा परवाना नसल्याने तिला परीक्षेला बसता आले नाही.
त्यानंतर तब्बल वर्षभर सोनालीने वडिलांना हातभार लागावा व स्वतःचा राहण्या- खाण्याचा खर्च सुटावा म्हणून एका खासगी कंपनीत काम करून सातत्याने व चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. मात्र, या सर्वांत नोकरी करून अभ्यासाला वेळ देता येणे शक्य नव्हते, शेवटी तिने पुन्हा अभ्यासिकेत प्रवेश घेऊन पूर्णवेळ अभ्यासाला वाहून देण्याचे ठरवून पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. त्यानुसार 2020 मध्ये ‘महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी’ अर्थात ‘महाजेनको’ची जाहिरात निघाली. या परीक्षेत चांगल्या गुणांनी सोनाली उत्तीर्ण झाली. त्यानुसार तिने नियोजन आखत मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र, त्याचदरम्यान कोरोना महामारी आल्याने त्यात दोन वर्ष गेल्याने तिला खूप नैराश्य आले. याच काळात अगदी जवळच्या नातेवाईकांनी घरच्यांना लग्नाविषयी सल्ले देण्यास सुरुवात केली, मात्र या सल्ल्यांमुळे ती अजिबात खचली नाही.
सातत्याने कठोर परिश्रम करत सोनलीने अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये ‘मेन्स’ परीक्षा झाली, यातदेखील चांगल्या गुणांनी यश संपादन केले. त्यानंतर यंदा फेब्रुवारी 2023 मध्ये या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ज्युनिअर इंजिनिअरसह साहाय्यक इंजिनिअरसाठी तिची निवड झाली. हा निकाल जेव्हा आई-वडिलांना व बहिणींना तिने सांगितले, तेव्हा त्यांना अगदी आकाश ठेंगणे झाल्यासारखे झाले. त्यांनी मुलींसाठी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची त्यांची भावना होती. त्यांना विश्वास होता की, सोनाली एक ना एक दिवस घवघवीत यश मिळवेलच. ’आम्हाला माहीत होत ते तू करून दाखवशील’ हे त्यांचे गौरवोद्गार असल्याचे सोनाली सांगते.
दरम्यान, या निकालानंतर सोनाली सांगते की, अतिशय कष्टातून हे यश मला मिळाले आहे, तिची जिद्द, तिची ध्येयाची सतत आठवण करून आयुष्यातील प्रसंग, आई-वडील या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या. तिला खरतर डॉक्टर व्हायचे होते, पण या क्षेत्रात ती अपघाताने आल्याचे सांगते. वास्तविकता ग्रामीण भागात बहुतांश मुलींना कुटुंबीय, नातेवाईकांमुळे फक्त दोन किंवा तीनच वर्षं अभ्यासासाठी मिळतात. त्या काळात मुलींना एखादं मोठं पद मिळाले नाही, तर त्यांची कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत जाते. ती ही त्याला अपवाद नव्हती. या काळात सुदैवाने तिला मित्रमैत्रिणी अगदी चांगले मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. तिच्या बरोबरीचे मित्रमैत्रिणी सगळे खूप मनापासून अभ्यास करायचे आणि आज तिने दोन-दोन परीक्षेत यश मिळवले. तत्पूर्वी ‘आयटीआय’ महाविद्यालय प्राध्यापकपदाची परीक्षादेखील उत्तीर्ण असून या परीक्षेचा अंतिम निकाल येणे बाकी आहे. मात्र, ‘महाजेनको’त निवड झाल्याने तिला खूप आनंद झाल्याचे ती सांगते. भविष्यात ‘युपीएससी’ची परीक्षा देण्याचा विचार असल्याचे सोनाली आवर्जून सांगते. सध्या सोनाली नाशिकमधील एका डिप्लोमा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत व ’महाजेनको’त असिस्टंट इंजिनिअरिंगची ’क्लास टू’ ची पोस्ट घेणार असल्याचे ती सांगते. सोनालीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
- गौरव परदेशी