वेदारंभ संस्कारातील वेगवेगळ्या विधी संपन्न करीत असताना मध्यवर्ती प्रसंगी गुरू आपल्या शिष्याला हा मंत्र शिकवतात. सर्वात आधी याच मंत्राने वर्णमाला, अष्टाध्यायी, व्याकरण, वेद इत्यादी शिकवण्यास प्रारंभ होतो. म्हणूनच वेदारंभाचा हा मूलभूत मंत्र आहे.
ओम् भूर्भुव: स्व:।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो न प्रचोदयात्॥
(यजुर्वेद-३६/३)
अन्वयार्थ
(ओम्) हे सर्व रक्षक परमेश्वरा! (भू:) प्राणरक्षका, प्राणस्वरुपा! (भुव:) सर्व दुःखांना दूर करणार्या देवा!(स्व:) सर्व प्रकारची सुखे प्रदान करणार्या भगवंता! (सवितु:) सकल जगताच्या उत्पत्ती करणार्या, सूर्यादी तत्त्वांच्या प्रकाशक अशा, (देवस्य) दिव्यत्वाने, दातृत्वाने परिपूर्ण अशा (तत्) त्या (वरेण्यम्) वरणीय, स्वीकरणीय व (भर्गः) पवित्र व शुद्ध स्वरूपाचे (धीमहि)आम्ही ध्यान करतो, धारणा करतो. (य:) जो परमेश्वर (न:) आमच्या (धिय:) बुद्धींना व कर्मांना (प्र+चोदयात्) सत्प्रेरित करो, सन्मार्गाने नेवो!
विवेचन
वेदांमधील हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. या मंत्राचा अर्थपूर्ण जप केल्याने मानव सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन शाश्वत सुख व आनंदाला प्राप्त होतो. भगवंताशी त्याचे नाते जडते. या मंत्रात परमेश्वराची स्तुती, त्याचे शुद्ध स्वरूप आणि शेवटी त्याकडे बुद्धीची कामना केली आहे. याच मंत्राला गायत्री, सावित्री, महामंत्र किंवा गुरुमंत्र असेही म्हणतात.विद्यार्थ्यांचा गुरुकुलामध्ये प्रवेश झाल्यानंतर ’वेदारंभ संस्कार’ प्रसंगी गुरू सर्वात प्रथम आपल्या शिष्याला हा मंत्र शिकवतात. म्हणून याचे नाव ’गुरुमंत्र’ असे पडले आहे. तसेच, सर्व मंत्रांमध्ये सर्वात दिव्य अर्थ व महान आशय असल्याने याला ‘गुरुमंत्र’ म्हटले जाते. तसेच ‘गायन्तं त्रायते इति गायत्री’ म्हणजेच एखादा उपासक ज्या मंत्राचे श्रद्धेने गायन करतो, त्याचे रक्षण करणारा मंत्र म्हणजे गायत्री!वेदारंभ संस्कारातील वेगवेगळ्या विधी संपन्न करीत असताना मध्यवर्ती प्रसंगी गुरू आपल्या शिष्याला हा मंत्र शिकवतात. सर्वात आधी याच मंत्राने वर्णमाला, अष्टाध्यायी, व्याकरण, वेद इत्यादी शिकवण्यास प्रारंभ होतो. म्हणूनच वेदारंभाचा हा मूलभूत मंत्र आहे.
ज्या दिवशी हा संस्कार पार पाडावयाचा आहे, त्यादिवशी बालकाने शुद्ध स्नान करून व नवीन वस्त्रे धारण करून यज्ञाच्या वेदीवर विराजमान व्हावे. अग्निहोत्राच्या सर्व प्रारंभिक विधीक्रिया करून ‘बटू अग्ने सुश्रव: सुश्रवसं मा कुरु!...’ या पारस्कर गृह्य सूत्रातील मंत्राने अग्निकुंडातील अग्नीला एकत्र करावे. त्यानंतर त्या होमकुंडाला प्रदक्षिणा घालावी. अग्नीमध्ये विद्यमान असलेले तेज, ओज, प्रकाश हे सर्व गुण त्या ब्रह्मचार्यांमध्ये प्रविष्ट व्हावेत आणि तो प्रकाशित व्हावा, ही या मागची भावना आहे. म्हणजेच अग्नीपासून त्याला गुणग्राहकता मिळावी, हा या मागचा उद्देश!त्यानंतर त्या ब्रह्मचार्याने अग्नीमध्ये ‘ओम् अग्नये समिधमाहार्षं बृहते जातवेदसे। यथा त्वमग्ने समिधा.......॥ (पारस्कर गृह्यसूत्र- २/४/३)’ हा मंत्र तीन वेळा बोलून प्रत्येक वेळी एक - एक समिधा त्यात समर्पित करावी. उपनिषदात ‘समित्पाणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्!’ असे वाक्य आले आहे. म्हणजेच ब्रह्मचार्याने आपल्या हाती समिधा घेऊन गुरुकुलातील वेदज्ञानी व ब्रह्मनिष्ठ अशाआचार्यांच्या सान्निध्यात यावे.
समिधा ही अग्नीच्या संस्पर्शाने प्रदीप्त होणारी असते. इथे आचार्य हा अग्नी आहे, तर विद्यार्थी हा समिधा आहे. आचार्यरूप अग्नीच्या संस्पर्शाने समिधारूप ब्रह्मचारी ज्ञानाग्नीने प्रज्वलित व्हावा, ही यामागची भावना. जसा विझलेला अग्नी काष्ठाला पेटवू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानहीन आचार्यदेखील आपल्या विद्यार्थ्याला प्रज्वलित करू शकत नाही. या मंत्रात ब्रह्मचारी म्हणतो- हे आचार्यप्रवर, आपण ज्ञानाग्नीने परिपूर्ण आहात. आपल्या सान्निध्यात येऊन मी स्वतःला चमकवू इच्छितो. आपण दीर्घायुषी, बुद्धिमान, वर्चस्वी, ब्रह्मवर्चस्वी आहात. म्हणून आपल्या संगतीत येऊन मला पण हे गुण प्राप्त करावयाचे आहेत. याकरिता मी माझे जीवन आपल्याचरणी अर्पण करतो. आपल्या आज्ञाचे मी सदैव मी पालन करेन.
यानंतर हा बटू आपल्या तळहात यज्ञकुंडातील अग्निसमोर धरून तापवितो व मुखाला स्पर्श करतो व मंत्राच्या माध्यमाने म्हणतो - अग्नी हा शरीरांना धारण करणारा, आयुष्य देणारा, वर्चस्वी व मेधावी आहे. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये देखील हे गुण यावेत व माझे रक्षण व्हावे. त्यानंतर त्याच अग्नीने तप्त झालेल्या तळहाताने संपूर्ण चेहरा, नाक, डोळे, कान व दोन्ही भुजांनादेखील स्पर्श करावा. यानंतर परमेश्वराचे ध्यान करून ब्रह्मचार्याने शारीरिक, मानसिक व आत्मिक बळ प्राप्त करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करावी. यानंतर हा ब्रह्मचारी आपल्या आचार्यांसमोर येतो आणि आपले गुडघे भूमीवर टेकवून आचार्यांना म्हणतो- ‘अधीहि भू: सावित्रीं भो अनुब्रूहि।’हे आचार्यप्रवर, पहिल्यांदा ओम् शिकवून नंतर तीन महाव्याहृती व नंतर सावित्री अशा या त्रिक म्हणजेच तिघांना (तीन भागांना) मिळून परमेश्वराच्या वाचक अशा गायत्रीमंत्राचा मला उपदेश करावा.हे ऐकल्यानंतर आचार्यांनी उपरणे घ्यावे व ते आपल्या व बालकाच्या खांद्यावर ठेवून त्या बालकाच्या दोन्ही हातांची बोटे पकडून पुढील तीन प्रकारे गायत्री मंत्राचा उपदेश करावा -
पहिल्यांदा
ओम् भुर्भुव: स्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।
दुसर्यांदा--
ओम् भूर्भुवः स्वः।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
तिसर्यांदा
ओम् भूर्भुवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्॥
आचार्यांनी हा मंत्र ब्रह्मचार्याकडून अगदी सावकाशपणे शुद्ध रूपाने उच्चारण करून घ्यावा आणि त्याला अर्थ पण समजावून सांगावा. आचार्यांकडून विद्यार्थ्याच्या दोन्ही हातांची बोटे पकडण्याचा उद्देश हाच की, आचार्य व विद्यार्थी हे दोघेही एकाग्र व्हावेत. परस्पर एकाग्र बनून या दोघांनीही अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण करावी.यानंतर आचार्यांनी ‘मम व्रते हृदयं ते दधामि मम चित्तं अनुचित्तं अस्तु’ हा आश्वलायन गृह्यसूत्रातील मंत्र म्हणून त्याच्या हृदयाला स्पर्श करीत प्रतिज्ञा करावी. हे झाल्यानंतर आचार्यांनी आपल्या या नवागत विद्यार्थ्याला मेखला प्रदान करावी. यावेळी आचार्यांनी ‘इयं दुरुक्तं परिबाधमाना वर्णं पवित्रं पुनती म आगात्। (ऋग्वेद-३/८/४)’ हा मंत्र उच्चारावा.
‘मेखला’ म्हणजेच करदोरा किंवा गोफ मेखला धारण केल्याने प्राण व अपान वायू बलवान होतो आणि शारीरिक पचनक्रिया अत्यंत सुरळीत होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वाणीमध्ये स्पष्टपणा येतो. एखादे काम करताना माणूस ’कंबर कसून उभा राहतो’. याचाच अर्थ उत्साहाने तत्पर होतो, हे यामागे सूचित करावयाचे आहे. ब्रह्मचार्याने गुरुकुलात शिकत असताना नेहमी कंबर कसून शारीरिक, आत्मिक, मानसिक, बौद्धिक उन्नतीसाठी तत्पर असावे. आज-काल कमरेला पट्टा बांधण्याचीदेखील विदेशी पद्धत रूढ झाली आहे. कदाचित हे भारतीय संस्कृतीचेच अनुकरण असावे.
यानंतर आचार्य हा आपल्या ब्रह्मचार्याला दोन लंगोट, दोन टॉवेल, एक उपरणे आणि दोन कटिवस्त्रे म्हणजेच धोती प्रदान करतो. त्यासोबतच आश्रम परिसरातील हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि यदाकदाचित एखादवेळी अन्याय झाला, तर तो दूर करण्यासाठी दंड म्हणजेच काठी बहाल करतात.अशा याप्रसंगी आता आचार्यांच्या समोर पिता हा आपल्या बालकाला उपदेश करतो. हा उपदेश म्हणजे जणू काही आपल्या मुलाला या गुरुकुलामध्ये राहत असताना दिला गेलेला मार्मिक संदेशच आहे. आई-वडिलांचे हे शेवटचे निरोपाचे बजावून सांगणे. या उपदेशात जवळपास २२ वाक्ये आली आहेत. १) आजपासून तू ब्रह्मचारी आहेस. २) दोन्ही वेळा संध्या प्रार्थना करीत राहा. ३) वाईट कर्मापासून दूर राहा. ३) दिवसा झोपू नकोस. ४)आचार्यांच्या आधीन राहून सांगोपांग वेदांचे अध्ययन कर. ५) धर्माचरण करीत राहा. ६) क्रोध करू नये व खोटे बोलणे नको. ७) आठ प्रकारच्या मैथुनापासून दूर राहा. ८) जमिनीवर झोपत राहा. ९) अति वर्जयेत्. इत्यादी !
अशा प्रकारच्या पितृ-उपदेशानंतर हा बटू सर्वांच्या समोर भिक्षा मागतो. भिक्षा मागितल्याने विद्यार्थ्यांचा गर्व आणि अभिमान नाहीसा होतो. उच्चकुलीन असला तरी तो सामान्य विद्यार्थी बनून जीवन जगतो. जे काही भिक्षेत मिळाले, ते आचार्यांना प्रदान करतो व साधे जीवन जगण्याचा ज्ञानाचे उच्च शिखर गाठण्यासाठी तपोनिष्ठ बनून प्रयत्न करतो. शेवटी या ब्रह्मचार्याला आचार्य आणि उपस्थितांकरवी आशीर्वाद दिले जातात.असा हा वेदारंभ संस्कार म्हणजे खर्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्व सर्वांगीण उन्नतीचा व वैदिक शिक्षणाचा शुभारंभ ठरतो.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य