सांगतेलाही वादाची किनार...

    19-Jan-2023   
Total Views |
 
Rahul Gandhi
 
 
 
राहुल गांधी सोमवार, दि. 30 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून यात्रेची सांगता करणार आहेत. परंतु, तत्पूर्वी काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून यात्रेची सांगता करण्यात येणार असल्याचे पक्षाने जाहीर केले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी रजनी पाटील यांनीही वादात उडी घेत लाल चौकात ध्वजारोहण करणे, हा रा. स्व. संघाचा अजेंडा असल्याचे सांगितले. यात्रेच्या सांगतेचा मुख्य सोहळा श्रीनगरमधील ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर’ येथे होणार आहे. यावेळी फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, शिवसेनेचे संजय राऊतही सहभागी होण्याची शक्यता आहे. पण, कितीही मोठे नेते आता यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी झाले तरी त्याचे राजकीय पडसाद उमटतील, नवीन समीकरणे उदयास येतील, असे मानणे गैर ठरावे.
खरंतर एकीकडे ‘भारत जोडो’ म्हणणारे राहुल गांधी, भारताचाच तिरंगा ध्वज लाल चौकात फडकावण्यापासून हा ‘संघाचा कार्यक्रम’ म्हणून स्वत:ला परावृत्त करत असतील, तर तो निव्वळ मूर्खपणा! कारण, लाल चौक हे काश्मीरच्या अस्मितेचे एक प्रतीक. काँग्रेसच्या काळात या लाल चौकात पाकिस्तान्यांचे झेंडे फुटीरतवाद्यांनी फडकवले होते. त्यामुळे एकप्रकारे लाल चौकात ध्वजवंदन करून राहुल गांधींना त्यांच्या पूर्वजांच्या पापांची परतफेड करायची ही नामी संधी होती. परंतु, जिथे तिथे संघद्वेषाची कावीळ झालेल्या राहुल गांधींना लाल चौकही पिवळाच दिसणार, यात नवल ते काय! त्यातच गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर पक्षाची तिथे मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. असो, तर राहुल गांधींनी यानिमित्ताने ‘कलम 370’वरही आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच, 2019 नंतर काश्मीरमध्ये झालेल्या बदलांचाही जरूर आढावा घ्यावा. कारण, नेहरु, गांधी, मुफ्ती, अब्दुल्ला जे करू शकले नाहीत, ते मोदी-शाहंनी काश्मीरमध्ये करून दाखविले. दरम्यान, राहुल गांधी यांनी दि. 7 सप्टेंबर, 2022 रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली खरी. परंतु, यात्रा काश्मीरला पोहोचूनही उपयोग तसा शून्यच! किमान यात्रेची सांगता तरी शांततेने आणि वादविवाद न करता होईल असे वाटले होते. परंतु, त्यातही काँग्रेसने वाद उभा केलाच. रा. स्व. संघाचा काहीही संबंध नसताना काँग्रेसने आरोप केले खरे. परंतु, ही यात्रा एकंदरीत ‘फ्लॉप शो’च म्हणावा लागेल.
 
 
बंगालमधील जिहादी षड्यंत्र
 
ममताबानो यांची पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेली बेबंदशाही आणि एकाधिकारशाही ही नवीन नाहीच. अहंकार आणि बहुमताच्या जीवावर ममताबानो यांनी बंगालमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव घेणे सोडा, साधं ते नाव कानावर पडले तरीही ममतांचा थयथयाट झालाच म्हणून समजा. आताही पश्चिम बंगालमधील माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराने ममता सरकारचा हिंदूद्वेष्टेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ’पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळा’ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जारी केलेल्या चाचणी पेपरमध्ये त्यांना नकाशावर चक्क ’आझाद काश्मीर’ चिन्हांकित करण्यास सांगितले. पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानी ‘आझाद काश्मीर’ म्हणतात आणि आता तसे भारतीय विद्यार्थ्यांनी लिहिल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कृतीचा भाजपनेही तीव्र निषेध केला असून, पश्चिम बंगालच्या ‘टीएमसी’ सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपने या कृत्याला ‘जिहादी षड्यंत्र’ असे म्हटले आहे. दरम्यान, परीक्षेच्या पेपरच्या पान क्र. 132चा ‘स्क्रीनशॉट’ही सोशल मीडियावर ‘व्हायरल’होत आहे. या वादानंतर आता केंद्र सरकारने ममता सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असून त्यावर ममता सरकारने चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मिळमिळीत उत्तर दिले. ‘पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळ’ दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी चाचणी पेपर्सचा संग्रह जारी करते. यामध्ये विविध शाळांनी तयार केलेले इयत्ता दहावीचे प्रश्न आहेत. ‘व्हायरल’ होत असलेल्या या संग्रहातील पान क्र. 132 मधील उपविभाग क्र. 2.4 मध्ये चार ठिकाणे नकाशावर दाखविण्यास सांगितले आहे. त्यानंतर अनुक्रमे मोपला बंडाचे ठिकाण, गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले पहिले सत्याग्रह स्थळ आणि शेवटी चट्टोग्राम नकाशावर दाखवण्यास सांगितले आहे. परीक्षेच्या पेपरचा वादग्रस्त प्रश्न मालदा येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यामंदिरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ममता सरकार फुटीरतावाद्यांचे समर्थक आहे की काय, अशीच शंका येते. ममता सरकारकडून विद्यार्थ्यांमध्ये भारतविरोधी मानसिकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह तर आहेच. परंतु, असे प्रकार वेळीच हाणून पाडणे आवश्यक आहे, अन्यथा तोवर फार उशीर झालेला असेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.