सिडकोचे धोरणात्मक जलनियोजन, सिडकोकडून पाणी पुरवठा योजनांची आखणी, नवी मुंबईची पाण्याची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या उपाययोजना

Total Views |

नवी मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना, यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे.

सन २०५० पर्यंत सिडको आणि नैना क्षेत्रांमधील पाण्याची अंतिम मागणी १२७५ एमएलडी इतकी प्रकल्पित आहे. ही मागणी पूर्ण करण्याकरिता सिडकोने व्यापक आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत हेटवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा), नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या सध्या अस्तित्वात असलेल्या स्रोतांचा कमाल वापर करण्यासह बाळगंगा धरण व कोंढाणे धरण यांसारखे नवीन स्रोत निर्माण करण्याचा समावेश आहे.

सिडकोतर्फे प्रस्तावित करण्यात आलेला बहुप्रतीक्षित कोंढाणे धरण प्रकल्प हा पाणी पुरवठा करणारा महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे. कोंढाणे धरण हे उल्हास नदीवर मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. सुरूवातीला या धरणातून २५० एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. अंतिमत: तो ३५० एमएलडी पर्यंत वाढविण्यात येणार आहे. बाळगंगा व कोंढाणे धरणांचे काम पूर्ण होण्यासाठी लागणारा अंदाजे ४-५ वर्षांचा कालावधी लक्षात घेता, सध्याची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हेटवणे धरण आणि मजीप्राच्या न्हावा-शेवा-टप्पा-3 या सध्या अस्तित्वात असलेल्या स्रोतांद्वारे अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर करण्याची विनंती सिडकोने केली आहे.

ऑगस्ट २०२०मध्ये ११९.८० कोटी रकमेच्या बदल्यात राज्य सरकारने पाण्याचा अतिरिक्त १२० एमएलडी कोटा मंजूर केल्याने सिडकोला सद्यस्थितीत हेटवणे धरणातून २७० एमएलडी पाणी मिळत आहे. अतिरिक्त १२० एमएलडी पाणी उपयोगात आणण्याकरिता आराखडा तयार करण्यासह सध्याच्या २७० एमएलडी पाणी पुरवठा प्रणालीचे आवर्धन करण्यासाठी सिडकोतर्फे तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हेटवणे जलावर्धन योजना जून २०२९ पर्यंत पूर्ण होणे आहे. ही चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्राचे ४१%, प्रक्रिया न केलेल्या पाण्याच्या जलबोगद्याचे ८.५% व शुद्ध पाण्याच्या जलबोगद्याचे २५.७% काम पूर्ण झाले आहे. कोंढाणे धरणाद्वारे नैना प्रकल्पाला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे, हेटवणे पाणी पुरवठा जलावर्धन योजनेद्वारे सिडको अधिकारक्षेत्रासह पनवेल महानगरपालिका क्षेत्राला सुरळीत पाणी पुरवठा होणे सुनिश्चित होणार आहे.

“नवी मुंबईचा विकास आणि विस्तार सातत्याने होत असताना शाश्वत जलव्यवस्थापनप्रति असणारी आमची कटिबद्धता कायम आहे. वर्तमानातील तसेच भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी सक्षम असे पाणी पुरवठा पायाभूत सुविधांचे जाळे आम्ही विकसित करीत आहोत.”

- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.