"साडेचार तास ईडी चौकशी! चहल म्हणाले होय आम्ही तेव्हा कंत्राटं दिली होती... पण"
काय म्हणाले इकबाल सिंह चहल?
16-Jan-2023
Total Views | 79
13
मुंबई : कोरोना काळातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरुन मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडी चौकशी सोमवारी तीन तास चौकशी झाली. कोविड जंबो सेंटरचे कंत्राट देत असताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडीने चौकशी केली आहे. चहल यांनी ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
चहल म्हणाले, "मुंबईचील लोकसंख्या एक कोटी चाळीस लाख इतकी होती. कोरोना काळात एकूण ११ लाख कोविड पॉझिटीव्ह झाले होते. मुंबईतील एकूण बेड्सची संख्या फक्त चार हजार इतकी होती. यावेळेत मुंबईसाठी तातडीने कोरोना काळात बेड्स उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्यामुळे महापालिकेतर्फे शासनाला या संदर्भातील विनंती करण्यात आली होती. मुलुंड जम्बो कोविड सेंटर, बीकेसी फेस १ आणि फेस २ जम्बो कोविड सेंटर, शीव, मालाड, कांजूरमार्ग, दहिसर आदी कोविड केंद्र ही मुंबई महापालिका वगळता इतर संस्थांनी बांधली होती. एमएमआरडीए, सिडको, मुंबई मेट्रो रेल आदी संस्थांनी ही बांधकामे केली होती. मुंबई महापालिकेला याचा खर्च शून्य आला होता. १५ हजार बेड होते. तसेच एक हजार आयसीयू बेड होते."
"बेड तयार झाले मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कसे उभारावे हा आमच्यापुढे प्रश्न होता. त्यावेळी कोरोना काळात याच कोविड जम्बो केंद्रांसाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या सर्वांसाठी यंत्रणा आपली होती. यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक करण्याचे योजिले होते. त्यानंतर परिपत्रक काढण्यात आले होते. आम्हाला लागेल तितक्या मनुष्यबळाची मागणी आम्ही केली होती. त्यानंतर ती भरती करण्यात आली. एकूण ९६ हजार रुग्ण यातून बरे होऊन गेले. यानंतर एका पोलीस ठाण्यात या कंत्राटी भरतीबद्दल तक्रार करण्यात आली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात आम्ही आमचीही बाजू मांडली होती. कंत्राट काळातील या कराराबद्दल जर अनियमितता असेल तर पुढील कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलीसांना केली होती.", असेही चहल म्हणाले.
मोठा मासा गळाला लागणार?
इकबाल सिंह यांची सुमारे साडेचार तास चौकशी झाली आहे. या काळात टेंडर देत असताना झालेली अनियमितता याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी तक्रार केली. त्यानंतर चहल यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या विविध कामांच्या निविदांमध्ये घोटाळा झाला, असा आरोपही करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही याबद्दल तक्रारी केल्या होत्या. सोमय्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचेदेखील नाव पुढे आले आहे. तसेच, या प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून, आता याच प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून देखील केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची देखील चौकशी ‘ईडी’कडून केली जाणार असल्याचे समोर आले आहे.