ऐहिकाची भूल कशी घालावावी

    11-Jan-2023   
Total Views |
ramdas swami


स्वामींच्या मनात नामस्मरणाची महती सांगून झाल्यावर राघवाची पवित्र भावना मनात रुजवण्यासाठी रामाची सगुणोपासनासांगावी, असे होते. समर्थांनी नामस्मरण, उपासनाव सदाचरण यांचे माहात्म्य जागोजागी सांगितले आहे. राघवाच्या नामस्मरणाने सगुणोपासनेनेमन पवित्र झाल्यावर आणि वृत्तींवर ताबा मिळाल्यावर निर्गुण परब्रह्माची अनुभूती घ्यायला समर्थ सांगतात.


पाखंडी माणसाचा परमेश्वरावर विश्वास नसतो. तसे पाहिले तर त्याचा कशावरही विश्वास नसतो. तो सर्व बाबतीत संशय घेत असतो. मन संशयी असल्याने त्याला निश्चित निर्णय घेता येत नाहीत, त्यातून त्याला अनेक गोष्टींची बाधा होते. संसारव्यथेचे ओझे शिरावर घेऊन तो स्वास्थ्य गमावून बसतो. हे मागील श्लोकात स्वामींनी स्पष्ट केले आहे. अशारीतीने सांसारिक स्वार्थी, अहंकारी गोष्टींचा गोंधळ त्याच्या मनात उत्पन्न झाल्याने माणसाची काळजी सुटत नाही. चिंता त्याला सतावत असते. नको त्या गोष्टींची माणूस चिंता करीत असतो. यासाठी स्वामी सांगतात

मना पावना भावना राघवाची।
धरीं अंतरीं सोडि चिंता भवाची।
भवाची जीवा मानवा भूलि वेली।
नसे वस्तुची घारणा वृर्थे गेली॥७९॥


राम ही एक व्यक्ती आहे, असे समर्थ मानत नाहीत. त्यांच्या मते, राम म्हणजेच अंतरात्मा, म्हणजेच परब्रह्म आहे. केवळ परब्रह्म शाश्वत असून त्याची प्रचिती घ्यायची, तर माणसाला मनबुद्धीच्या पलीकडे जावे लागते. हा तत्त्वज्ञानच्या अभ्यासाचा भाग आहे. व्यवहारातील एखादा घटक जाणून घ्यायचा, तर मन प्रथम तो डोळे, कान, नाक, स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रियांद्वारा जाणून घेत असते. पण इंद्रियांद्वारा मिळणारे हे ज्ञान बर्‍याच वेळा फसवे असते. यावर मागे चर्चा झाली आहे. तथापि मनाची ती सवय आहे. परंतु, मनाने ब्रह्म जाणता येत नाही. ब्रह्माची अनुभूती घ्यायची, तर मनाच्या या सवयीचा उपयोग होत नाही. कारण, जाणणारा व जे जाणून घ्यायचे ते एक असल्याने ती स्थिती मनाला अनुभवता येत नाही.

 व्यवहारात काही गोष्टी तर्काने समजता येतात. तर्क हा बुद्धीचा विषय आहे. परंतु, बुद्धीने किंवा तर्काने परब्रह्माचे ज्ञान होत नाही. परब्रह्म मनबुद्धीच्या आवाक्यात येणारे नाही. परंतु, या श्लोकाच्या पहिल्या चरणात समर्थ मनात राघवाची भावना धरायला सांगतात. मनाचा सूक्ष्म विचार करता मनात विविध विचार भावभावना निर्माण होत असतात. राग, द्वेष, प्रेम, मत्सर, स्वार्थ, अहंकार इत्यादी भावभावनांनी मन गढूळ झालेले असते. प्रपंचातील आसक्ती इत्यादी वाढवण्याचे काम मन करीत असते. तथापि, अशा मनात जर सर्वगुणसंपन्न राघवाची भावना केली, तर ती मन पवित्र करीत असते. राघवाच्या भावनेने रामाच्या गुणांचे चिंतन होऊन मन विषयांच्या ओढीपासून दूर जाऊ लागते. मनातील राग, द्वेष, मत्सर इत्यादी भाव कमी होण्यास मदत होते. मनात ठेवलेल्या राघवाच्या पवित्र भावनेने मन शुद्ध व पवित्र होत जाते.

 रामाच्या पावन अधिष्ठानाला मनात स्थान मिळाल्याने मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार, आसक्ती इत्यादी वृत्ती मावळू लागतात. जर या वृत्तींवर ताबा मिळवता आला, तर त्यापासून निर्माण होणारी संसारचिंता करण्याचे कारण उरत नाही. स्वामी सांगत आहेत की, तू मनात राघवाची पवित्र अशी भावना धरुन ठेव आणि संसाराच्या प्रपंचाच्या चिंता, काळजीकडे लक्ष देऊ नको. त्यांना सोडून दे. मागील दहा श्लोकांत समर्थांनी ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. तोच भाव ‘धरी अंतरी भावना राघवाची’ हे सांगण्यामागे आहे.

समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक शंकरराव देव म्हणतात की, मनाचे श्लोक क्र. ६७ पासून पुढचे श्लोक हे उपासनांवर आहेत. उपासनेसाठी भक्ताच्या समोर सगुण मूर्ती ध्यानासाठी असली पाहिजे. दुसरे अभ्यासकही ल. रा. पांगारकर यांच्या मते, श्लोक २८ ते १३५ यातून स्वामींना सगुणोपासनासांगायची आहे, याचा अर्थ स्वामींच्या मनात नामस्मरणाची महती सांगून झाल्यावर राघवाची पवित्र भावना मनात रुजवण्यासाठी रामाची सगुणोपासनासांगावी, असे होते. समर्थांनी नामस्मरण, उपासनाव सदाचरण यांचे माहात्म्य जागोजागी सांगितले आहे. राघवाच्या नामस्मरणाने सगुणोपासनेनेमन पवित्र झाल्यावर आणि वृत्तींवर ताबा मिळाल्यावर निर्गुण परब्रह्माची अनुभूती घ्यायला समर्थ सांगतात.

मनशुद्धीच्या, तर्काच्याही पलीकडे असलेल्या परब्रह्माचा अनुभव संतसंगतीत मिळतो, असा समर्थांचा अभिप्राय आहे. प्रस्तुत श्लोकाचा विषय राघवाची भावना अंतरात धरण्याचा म्हणजे सगुणोपासनेचा असल्याने त्या उपासनेतून संसार चिंता कशी कमी करता येईल, ते स्वामी सांगत आहेत. या चिंता उत्पन्न करणारा प्रपंच तर काही सोडून देता येत नाही. त्यासाठी माणूस संसारचिंतेत कसा अडकत जातो, यावर स्वामी मोजक्या शब्दांत भाष्य करीत आहेत. माणसाला प्रपंचाची भूल पडली आहे, असे ते सांगतात. सत्य, असत्य, शाश्वत, अशाश्वत या बाबतीत मानवाच्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला आहे. याचे कारण जे खरे नाही तेच खरे आणि शाश्वत आहे, अशी माणसाने मनाची समजूत करुन घेतली आहे, जे असत्य असतानाही ते सत्य आहे, अशा समजुतीने माणसाची अवस्था भ्रमिष्ट झाली आहे. मुळात नसलेली गोष्ट प्रत्यक्षात आहे, असे वाटणे याला भ्रम म्हणतात. हे जग वास्तवात दिसत असूनही त्याला ‘भ्रम’ म्हटले आहे.

जगातील जड वस्तू आपल्याला दिसतात. मग त्या नाहीत असे म्हणता येत नाही. त्या वस्तूचे खोटेपण भ्रामकत्व कसे आहे, हे स्वामींनी वेगळ्या प्रकारे सांगितले आहे. स्वामी दासबोधात सांगतात की, दृश्य जगातीलपदार्थ विघटनक्षम आहेत. ज्याचे विघटन होते ते शाश्वत नाही. या वस्तू विघटनशील, परिवर्तनशील आहेत. या सांसारिक गोष्टी माणसाने खर्‍या व शाश्वत मानल्याने माणसाला एक प्रकारे भूल पडल्यासारखे झाले आहे. स्वामी म्हणतात, मुळात जे शाश्वत नाही त्याची धारणा केल्याने सर्व व्यर्थ गेले. अज्ञान आणि भ्रम यांचे कायम वास्तव्य मानवाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशाश्वत आहे, ते सत्य आहे, असे मानून माणूस त्यावर भावभावनांच्या इमारती रचत असतो. मुळात पाया कच्चा असल्याने माणूस नको त्या गोष्टींची चिंता आणि त्यांचे दु:ख करीत बसतो.

भगवंत हा शाश्वत असून तो आपला उद्घारकर्ता आहे, असा दृढ विश्वास ठेवला, तर प्रापंचिक सुख-दु:खांपासून मोकळे होता येईल. परंतु, आपण नको त्या वस्तूची धारणा केल्याने सारे व्यर्थ गेले. या श्लोकांत स्वामींनी शाश्वत, अशाश्वत, भ्रम इत्यादी तत्त्वज्ञानांतील कल्पनांचा समावेश केल्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्याचे चटकन आकलन होत नाही. याची स्वामींना कल्पना आहे, यासाठी पुढील श्लोकात स्वामी लोकांना पटणारे उदाहरण देऊन सांगतात की, भगवान शंकराने श्रीधराला म्हणजे श्रीविष्णूला आपल्या अंत:करणात स्थान दिले आहे. त्या भगवंताला आपण मनात धरून ठेवावे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असे केले तर दुस्तर असा भवसागर तरून जाऊ. तो श्लोक असा आहे.

धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें।
तरा दुस्तरा त्या परा सागरातें।
सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें।
करा नीकरा त्या खरा मछरातें॥८०॥
 
श्लोकातील अर्थाचे विवेचन करण्यापूर्वी या श्लोकाच्या रचनेतील शब्द चमत्कृती पाहण्यासाठी आहे. श्रोत्यांना कंटाळा घालवण्यासाठी असे प्रयोग स्वामी मधून-मधून करतात. त्या श्लोकाच्या प्रत्येक ओळीत चार वेळा ‘रा’ या अक्षराचा प्रयोग केला आहे. पूर्ण श्लोकात १६ वेळा ‘रा’ हे अक्षर ठराविक अंतराने आल्याने श्लोक वाचताना मजा येते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..