माळ तिसरी : आधारवेल : जगन्माता श्रीसारदादेवी

    28-Sep-2022   
Total Views |

सारदादेवी
 
 
मानवजातीच्या उद्धारासाठी अवतरलेल्या वर्तमानयुगात भगवान श्रीरामकृष्ण यांची दिव्यलीला परिपूर्ण करण्याकरिता साक्षात ब्रह्मशक्ती श्रीसारदादेवींच्या रूपात त्यांची सहधर्मचारिणी म्हणून भूतलावर प्रकट झाली. जडवादाच्या - भोगवादाच्या - घोर अंधकारात मग्न अशा वर्तमान जगासमोर दिव्य मातृभावाचा परमपावन असा आदर्श श्रीसारदादेवींनी प्रस्थापित केला. श्रीसारदादेवींचे हे दिव्य मातृत्व आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श संन्यासिनी, आदर्श गुरू इत्यादी अनेकविध रूपांतून प्रकट झाले होते. पावित्र्य, सरलता, प्रेम, करुणा, त्याग, सेवा यांसारख्या असंख्य दैवी गुणांनी विभूषित असे त्यांचे सोज्वळ जीवन आणि त्यांच्या श्रीमुखातून सहजपणे निघालेले उपदेश मोहग्रस्त आणि संसारासक्त जीवांना परमप्राप्तीचा मार्ग दाखविणारे होते. श्रीरामकृष्ण यांच्या आधारवेलीवर श्रीसारदादेवी यांनी रामकृष्ण मठाचे कार्य व्यापक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
 
 
श्रीसारदादेवी यांचा जन्म बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील जयरामवाटी या गावी गुरुवार,२२ डिसेंबर १८५३, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी तिथीला झाला. सारदादेवी यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र मुखोपाध्याय आणि आईचे नाव श्यामासुंदरी देवी असे होते. सारदादेवींनी आपल्या जन्माबद्दल म्हटले आहे - “माझाही जन्म त्यांच्यासारखाच (श्रीरामकृष्णांसारखाच) झाला. माझी आई देवदर्शनासाठी शिहड येथे गेली होती. परत येताना एकाएकी शौचाला लागल्यामुळे ती तशीच एका झाडाखाली बसली. शौचाला झाले नाही पण वाटू लागले की उदरात एक प्रकारचा वायू शिरला आहे आणि सारे शरीर जड झाले आहे. आई तशीच बसून होती. ज्या झाडाखाली ती बसली होती त्या झाडावरून एक पाच-सहा वर्षांची सुंदर बालिका खाली आली. तिच्या अंगावर लाल रेशमी वस्त्र होते. जवळ येऊन तिने पाठीमागून आईच्या गळ्याभोवती आपले सुकुमार हात घातले. म्हणाली, 'आई, मी तुझ्या घरी येईन.' इतक्यात आई भोवळ येऊन पडली. थोड्या वेळाने लोकांनी तिला उचलून आणले. त्या बालिकेनेच आईच्या उदरात प्रवेश केला होता. त्यानंतरच माझा जन्म झाला."
 
 
वयाच्या सहाव्या वर्षी श्रीसारदादेवी यांचा विवाह श्रीरामकृष्ण यांच्याशी झाला. चोवीस वर्षीय श्रीरामकृष्ण आणि सहा वर्षाच्या श्रीसारदादेवी होत्या. दक्षिणेश्वरी कालीमंदिरात श्रीरामकृष्णांची प्रखर साधना सुरू होती. श्रीरामकृष्णांनी एकीकडे आपल्या त्यागपूर्ण जीवनाचा आदर्श पत्नीसमोर ठेवून उच्च अशा आध्यात्मिक उपलब्धीसाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणण्याचे शिक्षण त्यांना दिले, तर दुसरीकडे आपल्या दैनंदिन गृहस्थ जीवनाला आवश्यक असणारे कामकाज, देव, ब्राह्मण, अतिथी यांची सेवा, गुरुजनांप्रती श्रद्धा, लहान मंडळीवर प्रेम, कुटुंबातील लोकांची सेवा आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या. कुटुंबातील सर्वांचे स्वभाव आणि त्यांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्यांच्याशी कसे वागले पाहिजे, नावेमध्ये किंवा गाडीत बसताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, प्रत्येक वस्तूकडे कसे लक्ष ठेवावे लागते, दिव्यात वात कशी ठेवावी लागते या साऱ्या गोष्टी श्रीरामकृष्णांनी सारदादेवींना शिकवल्या. बारीकसारीक गोष्टीही त्यांनी सोडल्या नाहीत. परंतु त्याचबरोबर त्यांनी त्यांना साधन-भजन, ध्यान-धारणा, समाधी यांबद्दलही उपदेश केला. श्रीरामकृष्णांची शिकवण्याची हातोटी विलक्षण होती.
 
 
कालांतराने श्रीरामकृष्णांनी एकदा दक्षिणेश्वरला श्रीसारदादेवी यांची जगदंबेच्या त्रिपुरसुंदरी षोडशीरूपात अमावस्येच्या दिवशी ५ जून १८७२ रोजी पूजा केली. श्रीसारदादेवींचे खरे स्वरूप त्यांच्या दृष्टीसमोर स्पष्टपणे प्रकटले होते. षोडशीपूजेच्या माध्यमातून श्रीरामकृष्णांनी फक्त श्रीसारदादेवींमधील दिव्य मातृत्वाला जागृत केले असे नाही तर या पूजेद्वारे त्यांनी संपूर्ण स्त्रीजातीला गौरवान्वित केले. तिला सर्वोच्च सन्मानाचे पद प्रदान केले. "या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।" हा मंत्र श्रीरामकृष्णांनी केलेल्या श्रीसारदादेवींच्या षोडशीपूजेने सार्थ झाला होता.
 
 
श्रीसारदादेवी अगदी पहिल्यांदा इ.स. १८७२ मध्ये दक्षिणेश्वरी आल्या होत्या. तेव्हापासून १५ ऑगस्ट १८८६ मध्ये श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतली तोपर्यंतचा साधारण पंधरा वर्षांचा काळ हा श्रीसारदादेवींचा साधनाकाल म्हणता येईल. यावेळची त्यांची सर्वात मोठी साधना म्हणजे श्रीरामकृष्णांची सेवा. या सेवेच्या माध्यमातूनच त्यांचे दांपत्यजीवन परिपूर्ण झाले होते. श्रीसारदादेवींचा अवतार विश्वमातृत्वाचा आविष्कार करून देण्यासाठी झाला होता. या कालावधीमध्ये त्या आदर्श पत्नीच्या रुपात आपल्याला दिसून येतात. पति-पत्नी यांनी संसारात कसे राहावे हाही आदर्श श्रीरामकृष्ण व सारदादेवी यांच्या दांपत्य - जीवनावरून आपल्याला कळून येतो.
 
 
श्रीरामकृष्ण संघाची स्थापना व्हावी, संघाचा प्रसार व्हावा म्हणून श्रीसारदादेवी कायम व्याकुळ असत श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीसारदादेवी पुढे आल्या होत्या. श्रीरामकृष्णांच्या एका संन्यासी भक्ताजवळ त्या बोलल्या होत्या, त्या म्हणाल्या की देहत्यागानंतर मी त्यांची प्रार्थना करत असे," तुमच्या नावाने ज्या तरुण मुलांनी घरदार सोडले, त्यांना जाड्याभरड्या अन्नवस्त्राची ददात पडू देऊ नका. तुमचा आदर्श, तुमचा मनोभाव हृदयात बाळगून त्यांनी एकत्र राहावे व संसारतापाने दग्ध झालेल्या संसारी लोकांनी त्यांच्याकडे यावे, त्यांच्याकडून गोष्टी ऐकून शांती प्राप्त करावी, यासाठीच तर संघ स्थापन व्हावा." आणि ही इच्छा पूर्ण झाली. स्वामी विवेकानंद आणि इतर संन्यास्यांच्या प्रयत्नाने श्रीरामकृष्ण संघ कालांतराने रामकृष्ण मठ म्हणून सर्वदूर ओळखल्या जाऊ लागला.
 
 
श्रीरामकृष्ण परमहंसांनी केलेल्या कार्याच्या आधारवेली असणाऱ्या श्रीसारदादेवी यांनी कार्यात सुसूत्रता आणली आणि २० जुलै १९२० रोजी रात्री दीड वाजता शिवयोग साधत श्रीसारदादेवी यांनी महासमाधीद्वारा आपले अवतार कार्य संपविले. स्थूल दृष्टीने श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी झालेला वियोग चौतीस वर्षांनंतर संपुष्टात आला. श्रीरामकृष्णांच्या अवतार समाप्ती नंतर रामकृष्ण मठाच्या आधारवेल असणाऱ्या श्रीसारदादेवी यांनी दया, करूणा, सहानुभूतीने आणि मातृत्वाच्या स्पर्शाने हजारो लोकांच्या जीवनात सुगंध पसरविला.
 
 
लोककल्याणासाठी, लोकशिक्षणासाठी श्रीसारदादेवींनी देह धारण केला होता ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी केलेली सर्वांची सेवा. एकीकडे 'ब्राह्मी स्थिती' आणि दुसरीकडे'अबाध कर्म' - हे दोन त्यांच्या जीवनाचे मुख्य पैलू होते. साधन-भजन यांमध्ये आणि सेवेमध्ये त्या समान भावाने मग्न होत. असा समन्वय असलेले जीवन क्वचितच पाहावयास मिळते. श्रीसारदादेवींच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग नमस्कार.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.