पुणे : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. “आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार गेले हे लक्षात ठेवावे, असा टोला हाणून त्यांनी आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून आपले सुरक्षाकवच सोडावे,” असे आव्हान दिले. ”ठाकरे यांनी स्वत:चे ‘ग्लोरिफिकेशन’ करणे थांबवावे,” असा सल्लादेखील विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना दिला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना, शरद पवार यांनी आमच्या सरकारवर टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, राज्यात त्यांनी कोणते प्रकल्प आणले? जनहिताची कोणती कामे केली? असे प्रश्नही त्यांना केलेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे पुणे दौर्यावर आहेत. महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा केला असता, तर ‘वेदांता’-‘फॉक्सकॉन’ प्रकल्प बाहेर गेला नसता. त्या सरकारची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे विखे-पाटील म्हणाले. आता आमचे सरकार महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावावर विचार करु
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडलेल्या कृषी शिक्षणाच्या प्रस्तावाचे स्वागत करताना त्यांनी या भूमिकेवर आम्ही विचार करु असे सांगितले.
राज्यात संपूर्ण पशुधनाचे लसीकरण करणार
‘लम्पी’ आजाराबाबत आम्ही उपाययोजना सुरू असून राज्यातील सर्व पशुधनाचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली. राज्यातील दोन कोटी पशुधनापैकी केवळ चार हजार पशुधनाला आजार झाला आहे. योग्यवेळी उपाययोजना केल्याने परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.