रझाकारांसोबत सजाकारांचाही बंदोबस्त करणार

राज ठाकरेंचा सणसणीत इशारा

    17-Sep-2022
Total Views | 81
 




मुंबई : 'मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या बाबतीत जनतेत अनभिज्ञता आहे. महाराष्ट्रात 'रझाकारांचे' लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार होते त्यामुळे याविषयी फारसे बोलले गेले नाही. आजचा हा दिवस मराठवाड्यात उत्साहात साजरा व्हायला हवा. पण रझाकारांची पुढची औलाद या दिनालाच विरोध करते ही दुर्दैवाची बाब आहे. गेली कित्येक वर्ष संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार आहेत. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि 'सजा'कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच.' असा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे गट आणि एमआयएमवर निशाणा साधला आहे.
जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, 'मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारणमराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.'
 
 
लढ्याचे विस्मरण होता काम नये

पुढे राज म्हणाले की, 'मुक्तिसंग्रामाविषयी माहिती घेतल्यानंतर यातील नवनवे संदर्भ उलगडत गेले. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही. माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा. आणि माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.'





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121