वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास २० लाखांची आर्थिक मदत
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय
24-Aug-2022
Total Views | 96
57
मुंबई: वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास किंवा पशुधनाचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास उपचारासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
मुनगंटीवार म्हणले, महाराष्ट्रात वनविभाग करत असलेल्या वन्यजीव संवर्धनामुळे वन्यजीवांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे वन्यजीव-मानव संघर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे वनालगत गावात राहत असणाऱ्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना वनविभागाकडून प्रबोधन करण्यात येत आहे. डॉ शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनांद्वारे स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
तथापि सन २०१९-२०,२०-२१, २१-२२ मध्ये अनुक्रमे ४७,८०,८६ इतक्या मनुष्यहानीच्या घटना घडल्या आहेत. मनुष्यहानीच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे वाढते होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन वाघ, बिबट्या, रानडुकरे, अस्वल, रानगवा, तरस, लांडगा, मगर, हत्ती आणि रानकुत्रे यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मनुष्यहानी आणि पशुधन हानीत देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्याच्या रकमेत वाढ करण्याचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.
वन्यप्राणीच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात १५ लाखांवरून २० लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. गाय, म्हैस, बैल याचा मृत्यू झाल्यास ६० हजारवरून ७० हजार तर मेंढी, शेळी यांचा मृत्यू झाल्यास १० हजारावरून १५ हजार वाढविण्यात आले आहे. तसेच पशुधनाला कायमचे अपंगत्व आल्यास उपचारासाठी ४ हजाराहून ५ हजार देण्यात येईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.