मुंबई : भारतात घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सत्यमेव जयते सारखा कार्यक्रम आमिर खान घेत असे. याच कार्यक्रमातून त्याने अनेक क्षेत्रांतील मान्यवर, खरोखरीच समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांचे कार्य जगासमोर आणले. याच कार्यक्रमातून हिंदूंच्या सणांना, प्रथा- परंपरांवर टीका करणाऱ्या अनेकांना बोलावले पण एकदाही इस्लाम मधील वाईट प्रथांबद्दल आवाज उठवणाऱ्या, तिहेरी तलाक सारख्या अत्यंत जाचक मध्ययुगीन प्रथेबद्दल लढा देणाऱ्या एकाही सामाजिक कार्यकर्त्यांस त्याने या कार्यक्रमात बोलावले नाही.
सध्या समाजमाध्यमांवर याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. संगत नावाची एक सामाजिक संस्था चालवणाऱ्या कमला भसिन यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी हिंदूंचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनाची खिल्ली उडवली आहे. माझा भाऊ अगदी लहान आहे, मीच त्याला सांभाळत आहे, तरीही रक्षाबंधनाच्या दिवशी तो आपल्या परंपरेनुसार माझा रक्षक बनतो. मग ही परंपरा कशी काय मान्य करायची? असा सवाल कमला यांनी विचारला आहे. याच मुलाखतीत त्यांनी करावा चौथ या सणाचीही खिल्ली उडवली आहे. यातूनच त्यांनी भारतीय परंपरांमध्ये जपल्या गेलेल्या पुरुष सत्ताक मूल्यांची खिल्ली उडवली आहे.
तिहेरी तलाकसारख्या मध्ययुगीन प्रथेच्या विरोधात अनेक वर्षे लढा देऊन मुस्लिम महिलांनी या विरोधात न्याय मिळवला. सर्वोच्च न्यायालायाने या प्रथेला शेवटी रद्द करवले आणि मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला. मुस्लिम महिलांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अमीर खानने एकदाही आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही किंवा साधे पाठिंब्याचे ट्विट, व्हिडिओ केल्याचे कधीच समोर आलेले नाही त्यामुळे अशा कलाकाराच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची वेळ आली तर त्यात नवल नाही.