कलाविश्वात रममाण महादेव

    09-Jul-2022   
Total Views |

महादेव गोपाळे
 
 
 
दहावी नापास झाल्यानंतर हार न मानता व कलेची कोणतीही पदवी न घेता त्यांनी चित्रकलेसह रांगोळीविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया महादेव शंकर गोपाळे यांच्याविषयी...
 
 
 
पुणे जिल्ह्यातील कळमोडी गावात जन्मलेल्या महादेव शंकर गोपाळे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. नोकरीनिमित्त वडील आणि आई मुंबईत. परंतु, महादेव गावीच चुलत काकांकडे राहात. रोकडीनाथ विद्यामंदिरमध्ये त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. इयत्ता तिसरीपासूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. अभ्यासापेक्षा त्यांच्या वह्या चित्रांनीच भरून जात. शाळेत ते गणिती आकृत्यांसह अनेक महापुरूषांची चित्रे रेखाटत. पुढे कर्मवीर विद्यालयात आठवी ते नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. सकाळी ५ वाजता उठल्यानंतर शेतीची कामे आटोपून चटणी भाकर खाऊन विनाचप्पल सहा मैल चालत ते शाळेत जात. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा बनविलेला पुतळा शाळेने चक्क जपून ठेवला. नागपंचमीला नाग, गणेशोत्सवाला गणेशमूर्ती आणि बैलपोळ्याला बैलांची मातीची प्रतिकृती तयार करायला त्यांना आवडत. वादळी पावसाने गावातील अनेकांना मूर्ती आणणे शक्य झाले नाही, तेव्हा महादेव यांनी बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली.
 
 
 
पुढे दहावीसाठी आई-वडिलांनी त्यांना मुंबईत घाटकोपरच्या घरी बोलावून घेतले. वयाच्या १६व्या वर्षीच ते दररोज पहाटे ३ वाजता उठून दूध सेंटरवर काम करून नंतर रेशन धान्य दुकानात कामासाठी जात. दिवसभर काम केल्यानंतर रात्री ते नवमहाराष्ट्र नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण घेत. दहावीत पदरी अपयश आले आणि चित्रांच्या वेडावर सगळे खापर फोडले गेले. परंतु, त्यांची जिद्द कायम होती. १९७९ साली पुन्हा परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले. नंतर गावपातळीवर घडलेल्या एका घटनेने त्यांचे शिक्षणावरून मन उडाले. दूध सेंटरवर काम करताना ज्येष्ठ कलाकार राजन जगताप यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्यांनी महादेव यांच्या चित्रकलेचे कौतुक करत मार्गदर्शन केले. त्यानंतर महादेव यांनी दूध सेंटरचे काम सोडले आणि एक वर्षांचा कमर्शियल पेंटरचा डिप्लोमा केला. सुर्वे यांच्या गणपती बनविण्याच्या कारखान्यातही त्यांनी काही काळ काम केले. त्यांना चित्रपटाच्या पोस्टरचे विशेष आकर्षण होते. त्यावेळी तंत्रज्ञान विकसित नसल्याने पोस्टर चित्रकारांकडून काढून घेतले जात. काही काम हाती नसल्याने दादरला ‘बाळकृष्ण आर्ट’मध्ये ते तासन्तास पोस्टर बनविण्याच्या कामाचे निरीक्षण करत. त्यामुळे सोनार नामक गृहस्थांनी त्यांची बाळकृष्ण वैद्य यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी लागलीच त्यांना नोकरीही दिली. याठिकाणी मनोहर गावडे यांच्यासोबत महादेव काम करू लागले. आपल्या आवडीचे काम मिळाल्याने त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले.
 
 
 
दोन-तीन वर्ष काम केल्यानंतर पुढे प्रभाकर सोनार यांच्या ओळखीने त्यांनी श्रीकांत धोंगडे यांच्या ‘स्टुडिओ प्रभा’मध्ये जवळपास चार वर्षं काम केले. याठिकाणी अनेक मराठी कलाकार, अभिनेत्यांचा सहवास लाभला. अनेक चित्रपटाचे पोस्टर बनविल्यानंतर स्वतः नाना पाटेकर यांनी त्यांचे कौतुक केले होते. स्टुडिओतील कामावरून परतताना झेड ब्रिजवरील पत्र्यांच्या छिद्रांमधून ते रेल्वे कारखान्यात डोकावत. तेव्हा त्यांना याठिकाणी काम करण्याची इच्छा व्हायची. नंतर ‘डिजिटल’ युगात पोस्टरच्या कामांना खीळ बसली. एके दिवशी खोत नामक गृहस्थांनी त्यांना रेल्वे भरतीत अर्ज करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला आणि ते १९८४ साली रेल्वेत रूजू झाले. महादेव यानंतर अनेक रांगोळी प्रदर्शनांना भेट देऊ लागले. घाटकोपरला भाजी गल्लीत कलासाधनाचे प्रदर्शन भरत. त्यावेळी त्यांनी गुपचूप रांगोळीला हात लावला आणि नंतर रांगोळी काढण्याचा सराव सुरू केला. त्यानंतर १९८५ साली त्यांना कलासाधनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटांचे पोस्टर बनविण्याचा अनुभव असल्याने त्यांनी प्रथम अमिताभ आणि जय बच्चन यांची कृष्णधवल रांगोळी रेखाटली. अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. कळव्यातील राज्यस्तरीय स्पर्धेतहीपहिला क्रमांक पटकावला. ते आपली नोकरी सांभाळून रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी रांगोळी काढत. रांगोळीच्या माध्यमातून समाजप्रबोधनावर त्यांचा विशेष भर असतो.
 
 
 
चित्रकला जोपासताना त्यांनी रांगोळीविश्वात मोठे नाव कमावले. ना कोणती पदवी, ना कुठले शिक्षण, तरीही आत्मविश्वास, चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले ध्येय गाठले. स्वित्झर्लंडमध्येही त्यांनी आपल्या रांगोळीची कला सादर करत भारताच्या रांगोळीला जागतिक स्तरावर नेले. रेल्वे बोर्डाचे अधिकारी आल्यानंतर त्यांचे स्वागतही महादेव पोर्ट्रेट काढून करत. त्यांना रेल्वेत पेंट शॉप विभागात नोकरी मिळाल्याने त्यांच्या हातातील ब्रश कधीही मागे पडला नाही. तब्बल ३८ वर्षं नोकरी केल्यानंतर ते नुकतेच रेल्वेतून निवृत्त झाले. बाळकृष्ण वैद्य. मनोहर गावडे, श्रीकांत धोंगडे, प्रवीण वैद्य यांच्या सहकार्याने त्यांनी रांगोळीविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंनीही त्यांच्या कलेचे कौतुक केले होते. रेल्वेत इतकी चांगली नोकरी असून हे सगळं करायची गरज काय, अशा अनेक सल्ल्यांना त्यांनी बाजूला सारले. सध्या त्यांची मुलगीही चित्रकला शिक्षिका आहे. रांगोळी हा कधीही व्यवसाय होऊ शकत नाही. ती कला म्हणून जोपासली पाहिजे. रांगोळीने सन्मान मिळेल, पण त्याबरोबरीने जोडधंदा असणे आवश्यक असल्याचे गोपाळे सांगतात. दुसर्‍यांच्या घरी खिडकीला लटकून दूरदर्शन पाहणार्‍या महादेव यांना नंतर दूरदर्शनवरच ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात बोलावण्यात आले. दहावीत नापास होऊनही पुढे आत्मविश्वासाच्या बळावर कलेच्या गोकुळात रमून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या महादेव गोपाळे यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा....
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.