ठाणे: ठाणे शहरात कोरोनाचा ‘बूस्टर डोस’ मोफत देण्याचा कार्यक्रम दि. १५ जुलैपासून सुरू झाला असून गेल्या दहा दिवसांपासून सुमारे १९ हजार, १३९ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे शहरामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा संपला आहे. जेमतेम एक दिवस पुरेल इतकाच साठा महापालिकेकडे शिल्लक असल्याने ‘बूस्टर डोस’साठी ‘कोव्हिशिल्ड’ लाभार्थ्यांची फरफट सुरू आहे. ठाणे महापालिकेकडून राज्य शासनाकडे ५० हजार लसींची मागणी केल्यानंतर १५ ते २० हजारांपर्यंत पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेकडून ३२ आरोग्य केंद्र, फिरत्या केंद्रांद्वारे ‘बूस्टर डोस’ देण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा ‘बूस्टर डोस’ मोफत मिळण्यास सुरू होण्याबरोबरच ‘बूस्टर डोस’ घेण्याची मर्यादा सहा महिन्यांइतकी कमी करण्यात आल्याने झुंबड उडत आहे, तर दररोज महापालिकेकडून कोरोना लसीच्या दोन ते अडीच हजार लसी लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. ‘बूस्टर डोस’ घेणार्यांची गर्दी वाढू लागली असून ‘कोव्हिशिल्ड’ लस घेणार्यांची संख्या यामध्ये ८० टक्के आहे. त्यामुळे ‘कोव्हिशिल्ड’चा तुटवडा महापालिकेच्या केंद्रात जाणवू लागला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात ‘कोव्हिशिल्ड’ची उपलब्धता न झाल्यास महापालिकेकडे ‘कोव्हिशिल्ड’चे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ येणार आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान
देशातील नागरिकांना दि. १५ जुलैपासून ७५ दिवस करोना लशीचा बुस्टर डोस (वर्धक मात्र) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तेव्हा, याची पूर्तता मुख्यमंत्री कशी करणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.