भूकमुक्त भारतासाठी धडपडणारी ‘जय हिंद फूड बँक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2022   
Total Views |
 
 

dayitva 
 
 
 
 
 
 
 
वेडं ठरविण्यापासून सुरू झालेला प्रवास आता लोकांच्या कौतुकाने भरून पावतोय. अन्नदानासारखे पुण्याचे काम आणखी वाढवण्याची इच्छा असूनही परिस्थिती आडवी येते. मात्र, तरीही गरजूंची भूक शमविण्याचे कार्य जिद्दीच्या जोरावर आजही अविरतपणे सुरू आहे. जाणून घेऊया भूकमुक्त भारताचे ध्येय समोर ठेऊन काम करणार्‍या ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ संचलित ‘जय हिंद फूड बँक’विषयी...
 
 
सोलापूर शहरात जन्मलेल्या सतीश सुरेश तमशेट्टी यांना समाजसेवेचे बाळकडू कुटुंबीयांकडूनच मिळाले. २००६ साली हरिभाई देवकरण प्रशालेतून दहावीला अवघे ३८ टक्के मिळवत उत्तीर्ण झाल्यानंतर सतीश यांना शिक्षणाचे महत्त्व उमगले. कमी टक्के मिळाल्याने मोठ्या कसरतीनंतर त्यांना ‘कुचन ज्युनिअर महाविद्यालया’त प्रवेश मिळाला. यादरम्यान त्यांनी कराटेत विभागीय, राज्यस्तरावर यश संपादन केले. बारावीनंतर सतीश यांनी ‘संगमेश्वर महाविद्यालया’तून ‘बीबीए’ची पदवी घेतली. सतीश यांच्या वडिलांकडे शेताची नासधूस करणार्‍या रानडुकरांना पळविण्यासाठी छर्‍यांची बंदूक होती.
 
याच बंदुकीच्या साहाय्याने सतीश कागदावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत. दहा मी. ‘एअर पिस्तूल’मध्ये जिल्हा, राज्य स्पर्धेत यश मिळवत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. ‘हिराचंद ज्ञानचंद कॉलेज’मध्ये ‘एमबीए’साठी प्रवेश घेतल्यानंतर सतीश यांचा समाजकार्याकडे ओढा वाढला. सतीश यांचे वडील सुरेश तमशेट्टी लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात उतरले खरे, पण त्यांनी समाजकारणाचा वसा आजतागायत चालू ठेवला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे जाण्याचा निश्चय सतीश यांनी केला.
 
बहीण अ‍ॅड. सरोजनी या महिलांसाठी सामाजिक संस्था चालवत असल्याने त्यांचा आदर्श घेऊन सतीश यांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचे ठरवले. एकदा सतीश यांच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात जेवण शिल्लक राहिले. तेव्हा सतीश यांना जेवणाचं काय करायचं, यासाठी फोन आला. ही बाब सतीश यांनी वडिलांच्या कानावर घातली. तेव्हा वडिलांनी ते जेवण गरीब वस्तीतील लोकांना देण्याचे ठरवले. सतीश लागलीच त्या लग्नात जाऊन शिल्लक जेवण घेऊन आले व ते गरीब वस्तीत वाटले. हा प्रसंग त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक केला आणि त्यांना अनेक ठिकाणांहून शिल्लक जेवण घेऊन जाण्यासाठी फोन येऊ लागले.
 
माध्यमांनीही या कामाची दखल घेतल्याने ते जिल्ह्यात परिचित झाले. सतीश यांना या कार्यात मित्रांचीही साथ मिळाल्याने त्यांनी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अखेर नोव्हेंबर, 2016 साली ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने संस्थेची स्थापना झाल्यानंतर त्याअंतर्गत ‘जय हिंद फूड बँक’, ‘जय हिंद अकॅडमी’, ‘जय हिंद’ची जलसेवा, ‘सक्षम जय हिंद’ यांच्या माध्यमातून कामाला सुरूवात झाली. ‘जय हिंद अकॅडमी’च्या माध्यमातून बेघर निवारा केंद्र, वस्ती, फुटपाथ येथील महिला, विद्यार्थी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. ‘जय हिंद जलसेवे’च्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी काम केले जाते.
 
‘सक्षम जय हिंद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम केले जाते. मात्र, सर्वाधिक काम ‘जय हिंद फूड बँके’च्या माध्यमातून सुरू झाले. सध्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः सतीश तमशेट्टी असून त्यांना उपाध्यक्ष अनिकेत सरवदे, खजिनदार विनय गामजी, सचिव गजानन यन्नम यांसह नागेश कांबळे, आलोक तंबाके, योगी वळसंगे, सुधीर तमशेट्टी, किरण देशमुख, इंद्रजित वर्धन यांची मोलाची साथ मिळत आहे. सतीश यांच्या पत्नी मनाली, आई राजश्री, बहीण सरोजनी यांचेही त्यांना सहकार्य मिळते. हळूहळू ‘जय हिंद फूड बँक’ उपक्रमाचा विस्तार सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरही होत गेला.
सोलापूरनंतर दुसरी शाखा अक्कलकोटला सुरू झाली आणि सध्या तुळजापूर, नळदुर्ग, पंढरपूर, लातूर, पुणे, सुरत आणि आता मुंबई अशा २५ शाखा आहे. संस्थेला राजकुमार चोरडिया यांनी एक वाहन दिले असून संस्थेकडे शिल्लक अन्न घेऊन जाण्यासाठी स्वतःची भांडीदेखील आहे. तसेच जयेश संघा हे गाडीच्या दुरूस्तीसाठी मदत करतात. दैनंदिन धान्यासाठी गिरीश क्षीरसागर यांची संस्थेला मदत होते. भूकमुक्त भारताचे ध्येय समोर ठेवून संस्था काम करत असून अन्न वाया न जाता ते गरजूंपर्यंत पोहोचविण्यास संस्थेचे प्रथम प्राधान्य असते. कुणाकडेही एखादा विवाह सोहळा किंवा अन्य कार्यक्रम असेल, तर तिथे मोठ्या प्रमाणावर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली असते.
 
मात्र, माणसांचा अंदाज न आल्याने अन्न शिल्लक राहते. अशावेळी ‘जय हिंद फूड बँके’ला लोक संपर्क करतात. त्यावेळी संस्थेकडून संबंधित ठिकाणी लवकर कोण पोहोचू शकते, हे निश्चित करून ‘फूड बँके’च्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहिती टाकली जाते. नंतर सर्व टीम आपल्या गाडीसह व आवश्यक ‘पॅकिंग’ सामानासह शिल्लक अन्न घेण्यासाठी पोहोचते. यावेळी सदर अन्नाची तपासणी करून खाण्यायोग्य जेवण असेल, तर पुरावे म्हणून फोटो घेतले जातात आणि नंतर जेवण ताब्यात घेतले जाते. त्यानंतर अतिशय कमी वेळेत हे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे सर्वात मोठे आव्हान असते.
 
यावेळी कामगार वस्ती, झोपडपट्टी, वृद्धाश्रम यांसारख्या जिथे गरज असेल तिथे अन्न वितरित केले जाते. कुणालाही मोफत जेवणाची सवय लागू नये, याची संस्था काळजी घेते. तसेच, ज्यांना जेवणासाठी खरोखर दुसर्‍यांवर अवलंबून राहावे लागते त्यांना संस्था बेघर निवारा केंद्रात ठेवण्याबरोबरच त्यांना मोफत जेवण पुरवते. पाच तासांपेक्षा जास्त वेळ झालेले अन्न, ताटात उरलेले किंवा उष्टे टाकलेले अन्न तसेच, दुग्धजन्य पदार्थ संस्था ताब्यात घेत नाही. या कार्यामध्ये वेळ प्रचंड महत्त्वाची असून वेळेच्या बचतीकडे संस्थेचा कल असतो. संस्थेकडे ‘फूड सेफ्टी’चे लायसन्सदेखील आहे.
काही लोकं वाढदिवस, वर्षश्राद्ध यांसारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवण बनवून वितरित करण्यासाठीही संस्थेला संपर्क करतात. ज्या सामाजिक संस्थांना अनुदान मिळत नाही, तिथे अन्न वाटपाला संस्था प्राधान्य देते. बेघर निवारा केंद्रातील लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, वृद्धाश्रमातील महिलांना साड्या, ब्लँकेट्सचे वाटप तसेच शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. आतापर्यंत जवळपास 500 हून अधिक विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले आहे.
 
सोलापूर जिल्हा रूग्णालयात दूरवरून लोकं मोफत उपचारासाठी येतात. मात्र, त्यांना मोफत जेवण मिळत नाही. ही बाब लक्षात घेत ‘जय हिंद फूड बँके’ने त्यांना दररोज स्वयंपाक बनवून मोफत जेवण देण्याचे ठरवले. तत्कालीन आयुक्त हरिश बैजल यांनी संस्थेला रूग्णालयात एक जागा उपलब्ध करून दिली. सध्या ‘जय हिंद फूड बँके’तर्फे 200 जणांना मोफत जेवण दिले जाते. त्याचप्रमाणे संस्थेतर्फे निराधार 25 वृद्धांचा शोध घेऊन त्यांनाही दररोज दोनवेळेस जेवणाचा डबा दिला जातो. ‘पाणी फाऊंडेशन’च्या जलसंवर्धन मोहीम व श्रमदानातही संस्थेचे सहकारी सहभागी होतात. मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्याचे कामही संस्थेमार्फत केले जाते.
“ज्या लग्नसोहळ्यात तुम्हाला पाहुणे म्हणून बोलावतात, तिथेच तुम्ही भांडी घेऊन शिल्लक अन्न घ्यायला येतात. तुझं ‘एमबीए’ झालेलं आहे, काहीतरी दुसरं काम कर जास्त पगार मिळेल,” असे अनेक मोफत सल्ले सतिश यांना लोकांनी दिले. त्यावेळी ते खचून जात. ‘कोविड’ काळाआधी पुण्यात त्यांनी एक वर्ष बँकेत नोकरीही केली. या दरम्यानही त्यांनी काम सुरूच ठेवले. याच कामावरून त्यांना बँकेतून समजदेखील मिळाली. नंतर कोरोनामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. सोलापूरला परतल्यानंतर त्यांनी ‘रिअल इस्टेट’मध्ये काम करण्यास सुरूवात करत दुसरीकडे संस्थेच्या कामाची व्याप्ती आणखी वाढवली. ‘कोविड’ काळात पाच हजार जणांना धान्याचे किट वितरित करण्यात आले.
 
संस्थेच्या वाहनातून जवळपास १२ रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अन्नाची किंमत केली जात नाही. जेवढी भूक असेल तेवढेच अन्न ताटात घ्यावे. अन्न वाया घालवू नये. लोकांच्या बडेजावपणा आणि आपापसांतील स्पर्धेतून जंगी सोहळ्यात लोकांचा अंदाज न घेता स्वयंपाक केला जातो. मदतीअभावी संस्थेला या कार्यात प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन सतीश करतात. तसेच, अन्नदानाचे हे कार्य भारतभर नेण्याची इच्छा असून शासनाने भूकमुक्तीसाठी एक धोरण राबवून एक टोल फ्री क्रमांक जारी करावा, असेही ते सांगतात.
 
‘जय हिंद अकॅडमी’ने कबड्डी आणि क्रिकेट संघाला दत्तक घेतले असून त्यांना खेळाचे मैदान, प्रशिक्षक उपलब्ध करण्यासह खेळाचे साहित्य पुरवण्याची जबाबदारी संस्थाच उचलते. नेमबाजीसाठी आवश्यक ‘एअर रायफल’साठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे सतीश यांनी त्यांची नेमबाजीची आवड मागे सोडली. मात्र, भविष्यात सोलापूर जिल्ह्यातून नेमबाज घडविण्याचा त्यांचा मानस आहे. अन्नधान्य ही राष्ट्राची संपत्ती समजून त्याची काळजी घेतली पाहिजे. सामाजिक कार्याची आवड आहे. मात्र, परिस्थिती आडवी येते. बक्कळ पैसा असता तर कामाची व्याप्ती आणखी वाढवता आली असती. भूकमुक्त भारतासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी आम्ही ‘जय हिंद फूड बँके’च्या माध्यमातून गरजूंचे उदरभरण करण्याचे काम करतो. मला वेडं ठरवणार्‍या लोकांच्या तोंडी आता माझं कौतुक ऐकल्यावर समाधान वाटते.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@