संशोधकांसाठी संरक्षित वनक्षेत्र या प्रयोगशाळाच!

प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिला संशोधकांना विश्वास ; दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्कार सोहळा

    08-Jun-2022
Total Views | 144
PCCF
 
 
मुंबई (प्रतिनिधी): “महाराष्ट्रातील कोणतीही संरक्षित वने ही तुम्ही स्वतःची प्रयोगशाळा समजून त्यामध्ये काम करू शकता,” असा विश्वास वन्यजीव संशोधकांना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिला. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मंगळवारी आयोजित केलेल्या ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्कार सोहळ्यात लिमये बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या तळागाळात पर्यावरण क्षेत्रात काम करणारे 11 संशोधक आणि संवर्धकांचा सन्मान करण्यात आला.
 
 
 
 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावर्षी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या निसर्ग माहिती केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाला ‘सी-टेक’ आणि ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे सहकार्य मिळाले होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव आणि राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘भारतीय विचार दर्शन’चे सदस्य जितेंद्र देऊळकर आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलारही व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात वन्यजीव प्रजात आणि अधिवास संवर्धन, संरक्षण आणि जनजागृती संदर्भात लक्षवेधी काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यांना सन्माचिन्ह आणि त्यांच्या कामास सहयोग राशी म्हणून 21 हजार रुपये प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तयार केलेला ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ हा विशेषांकही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
 
  

Visheshank 
 
 
 
 
 
या पुरस्कारार्थ्यांमध्ये दहा जणांचा समावेश होता. श्रीवर्धन तालुक्यात कांदळवन संवर्धन आणि जनजागृतीसंदर्भात केलेल्या कार्याबद्दल ‘काळिंजे कांदळवन पर्यटन गटा’ला सन्मानित करण्यात आले. प्रेमसागर मेस्त्री यांना रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धनात दिलेल्या योगदानाकरिता हा पुरस्कार देण्यात आला. अक्षय खांडेकर यांना पश्चिम घाटातील पालींच्या संशोधनामध्ये दिलेल्या योगदानाकरिता आणि धनुषा कावलकर यांना भारतातील गुहांच्या संशोधन आणि संवर्धनात दिलेल्या योगदानाकरिता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकणातील पाणमांजर संवर्धनाच्या कामात दिलेल्या योगदानाकरिता मल्हार इंदुलकर आणि कातळ सड्यांच्या अभ्यासातील योगदानाकरिता प्रतीक मोरे यांची या पुरस्कारकरिता निवड करण्यात आली होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण कार्यात दिलेल्या योगदानाकरिता वनमजूर ज्ञानदेव परीट यांना हा पुरस्कार देण्यात आला. शुभम यादव यांना गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधनामध्ये दिलेल्या योगदानाकरिता हा पुरस्कार देण्यात आला. ‘माय ग्रीन सोसायटी’ यांना शहरातील मियावाकी पद्धतीने वनीकरण करण्यात दिलेल्या योगदानाकरिता आणि सावन बहेकार यांना गोंदिया जिल्ह्यातील सारस संवर्धनात दिलेल्या योगदानाकरिता ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स’ पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. या सोहळ्यात ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील ‘फ्लेमिंगो दर्शन बोट सफारी गटा’चा विशेष सन्मान करण्यात आला. ठाणे खाडीतील फ्लेमिंगो जनजागृतीसाठी दिलेल्या योगदानाकरिता त्यांचा सन्मान करण्यात आला.
 
 
 
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष कौतुक
पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुनील लिमये म्हणाले की, “ग्रामस्थांपासून वनमजूर आणि संशोधकांचादेखील सत्कार करणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष कौतुक वाटते. पाठीवर एक छोटीशी थाप जरी दिली, तरी माणूस पुढे खूप चांगले काम करतो. पर्यावरणरक्षणासाठी अनेक वर्षे विविध स्तरांतून प्रयत्न होत आहेत आणि आपण सर्व यात काहीना काही हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही वन विभागातर्फे संशोधकांना आणि संवर्धकांना जमेल तेवढी मदत करायला तयार आहोत.”
 
 
“दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पर्यावरण आणि वन्यजीवविषयक बातम्या या अत्यंत अभ्यासपूर्णरित्या मांडल्या जातात. त्याचबरोबर ‘महा एमटीबी’कडून तयार करण्यात येणार्‍या वन्यजीवविषयक व्हिडिओज्च्या माध्यमातून जनजागृतीसाठी मोठे काम होत आहे,” असे कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी म्हणाले.
 
 
“ ‘स्पिसिज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स पुरस्कार’ एक महत्त्वाकांक्षी उपक्रम दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे करण्यात येत आहे. पर्यावरण आणि वन्यजीवविषयक काम करणार्‍या लोकांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. ग्रामस्थ महिला पुढे येऊन शास्त्रीय माहिती देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण हे काळींजे गाव आहे,” असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन म्हणाले.
\
 
“दरवर्षी होणारा हा पुरस्कार सोहळा यावर्षी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त आयोजित करण्यात आला, याचा मला आनंद आहे. विविध जीव आणि परिसंस्थांसाठी काम करणार्‍या या सर्व वॉरियर्सचे अभिनंदन. गेला काही काळात पर्यावरणाविषयक जागरूकता वाढू लागली आहे. असे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत,” असे ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’चे संचालक तथा वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121