ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवर पुन्हा एकदा टोलनाके आले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावरील कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्याने मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसह नुकतीच टोल ठेकेदाराच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच सोमवार, दि. २० जूनपर्यंत थकीत वेतन अदा केले नाही, तर टोलनाक्यावर धिंगाणा घालू, असा गर्भित इशाराही दिला आहे.
ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावर कंत्राटी पद्धतीने काम करणार्या मुलांचे मागील दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराने अद्याप अदा केलेले नाही. ही मुले अतिशय गरीब घरातील असून ठेकेदाराने वेतन न दिल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच-सहा दिवस वेतन मिळेल, या आशेने ठेकेदाराच्या कार्यालयावर खेटा मारूनही वेतन न मिळाल्याने हवालदिल झालेल्या या कर्मचार्यांनी पायपीट करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात धाव घेतली.
तसेच मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याकडे ठेकेदार वेतन देत नसल्याची कैफियत मांडली. त्यानंतर याची त्वरित दखल घेत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि महाराष्ट्र सैनिकांनी नुकतीच मानपाडा येथील ठेकेदाराच्या कार्यालयावर धडक दिली. परंतु, ठेकेदार याठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याच्याशी फोनवरून संपर्क साधत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी थेट इशारा देत या मुलांचे वेतन अदा केले नाही, तर सोमवार, दि. २० जून रोजी मुलुंड टोलनाक्यावर धिंगाणा घालू आणि त्यानंतर जे काय घडेल त्याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असेल, असा सज्जड दम भरला. यानंतर सोमवार, दि. २० जून रोजी कर्मचार्यांना पगार मिळेल, असे आश्वासन ठेकेदाराने दिल्याचे मोरे यानी सांगितले.