बदलापूर (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून बदलापूरच्या कात्रप आणि परिसरात सुरू असलेले विजेचे भारनियमन त्वरित थांबवून नागरिकांवरील अन्याय दूर करावा. तसेच वाढीव अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरण्यापासून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपतर्फे सोमवारी महावितरणच्या अधिकार्यांना देण्यात आला.
बदलापूरच्या कात्रप, शिरगाव, आपटेवाडी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवरून भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने सोमवारी खरवई येथील वीज कार्यालयाला धडक दिली. यावेळी भाजयुमो, ओबीसी सेल यांच्यावतीने निवेदन देत वीजपुरवठ्यात सुधारणा करून अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्यापासून नागरिकांना सूट देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजयुमो पूर्व विभाग अध्यक्ष तुषार प्रभुदेसाई यांच्यासह युवती अध्यक्ष ज्योती जवळेकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष गणेश भोपी, महिला अध्यक्षा स्वाती बेलंके, वैभव उदावंत, प्रद्युम्न ठाकूरदेसाई, दिनेश भोसले, सुचित्रा मोरे आदी उपस्थित होते.