होय, आम्हाला भोंग्यांचा त्रास आजही होतो!

वडाळ्यातील चार रस्ता परिसरातील स्थानिकांची व्यथा

    27-May-2022
Total Views | 34

wadala 
 
 
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय उचलून धरला आणि संपूर्ण राज्यात त्यासंबंधी बदल दिसू लागले. मशिदीवरील भोंग्यांचा आवाज हा काही प्रमाणावर का होईना, पण कमी करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे आदेश दिले. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी (मविआ) सरकारने अद्याप यावर कोणतीही समाधानकारक अशी पावले उचललेली नाहीत. वडाळ्यातील चार रस्ता परिसरात असणार्‍या अल्पसंख्यांकांच्या वसाहतीमुळे पूर्वी भोंग्यांमुळे, तर आता त्यांच्या लग्नसोहळ्यात वाजणार्‍या भोंग्यांमुळे स्थानिक व शैक्षणिक संस्था त्रस्त झाल्या आहेत. यासंदर्भात तेथील स्थानिक महेंद्र सप्रे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला.
 
 
“अनेकदा या भोंग्यांमुळे आम्हाला होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही वसाहतीतील लोकांना जाऊन सांगितले. तसेच, त्यांना या भोंग्यांचा आवाज कमी करण्यास विनंतीही केली. मात्र, ते आमच्या कोणत्याच म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत. या त्रासामुळे अनेकदा माटुंगा पोलीस ठाण्यासह वडाळा व अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यातही तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलिसांची पाठ फिरताच यांचे भोंगे पुन्हा सुरू होतात. यासंदर्भात मी व ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजि’चे प्राध्यापक असे मिळून तब्बल 30 नागरिकांच्या सह्यांसह एक याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती महेंद्र सप्रे यांनी दिली.
 
 
 
 
राज ठाकरेंच्या सभांमुळे शक्य
 
स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून, हवाई दलाच्या लढाऊ विमानांसह प्रवासवाहू विमानापर्यंत सर्वांसाठीच नियम बनवण्यात आले आहेत. आपल्या रेल्वेच्या भोंग्यासाठीही काही मर्यादा लावण्यात आलेल्या आहेत. परंतु, असे कोणतेच नियम भोंग्यांच्या बाबतीत वापरण्यात येत नाहीत. जे राज्य सरकारला जमले नाही, ते राज ठाकरेंच्या केवळ तीन सभांमुळे शक्य झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केवळ तीन सभांमुळे राज्यातील भोंग्यांच्या विषयाचा चेहरा बदलला. भोंग्यांचे आवाज हे कमी करण्यात आले,” असेही मत सप्रे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने वडाळा पोलीस ठाण्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता वडाळ्यातील हा प्रभाग वडाळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. तसेच, आमच्याकडे एक तक्रार आली होती. त्यावेळी आम्ही संबंधितांवर कारवाई करून त्यांना वडाळा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले, असे अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याचे ‘पीएसआय’ यादव यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121