पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम पुणे येथे येत्या शनिवार, दि. २१ मे रोजी आयोजित करण्यात आला असून केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे. पुण्यातील 'एकता' मासिकाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी 'एकता'च्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे.
पुण्यातील नवी पेठ येथे पत्रकार भवन सभागृहात सकाळी १0.00 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय विचारांचा प्रचार - प्रसार करणारे मासिक म्हणून 'एकता' मासिक ओळखले जाते. यंदाचे वर्ष हे एकता मासिकाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने या कार्यक्रमात 'एकता'च्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या, आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण विषयातील तज्ज्ञ डॉ. शांतीश्री पंडीत यांची नुकतीच नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली.
यानिमित्ताने डॉ. शांतीश्री पंडीत यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. डॉ. पंडीत यांचा हा सत्कार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होत आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी म्हणून डॉ. मुळे यांनी जपान, रशिया, मॉरिशस, सीरिया आदी देशांच्या भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी, मालदीवचे भारताचे उच्चायुक्त, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे कॉन्सुल जनरल, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट, व्हिसा व अनिवासी भारतीय विभागाचे सचिव अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत.
या महत्वपूर्ण कार्यक्रमास 'एकता'चे वाचक, विचार परिवारातील कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत मंडळी, विद्यार्थी, पत्रकार बंधू व पुण्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकता मासिक फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, एकताचे संपादक मनोहर कुलकर्णी व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल दामले यांनी केले आहे.