महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील कित्येक शहरांनी तापमानाचा ४०-४२ अंश सेल्सिअसचा पाराही ओलांडला आहे. आगामी काही दिवस उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचा पारा आणखीन वधारण्याची भीती आहेच. तेव्हा, एरवी कडक उन्हाळ्याची सवय असली तरी यंदाच्या उष्णतेच्या लाटेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यानिमित्ताने उष्मापात आणि उष्णाघात यांची लक्षणे आणि त्यावरील एकूणच उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख....
आपले शरीर हे जगातील सर्वात सुंदर, बरेचसे किचकट आणि छान अचूकता असलेले यंत्र आहे. शरीरातील असंख्य पेशी आपले कार्य पार पाडत असतात. त्यांच्या कामात सुसूत्रता असते. ऋतुमानाप्रमाणे हवेत व वातावरणात होणारे फरक त्या पटकन हेरतात व त्याप्रमाणे कार्यवाही करतात. बाह्य तापमान कितीही कमी असो वा कितीही जास्त असो, आपल्या शरीराचे तापमान ठरावीक पातळीत असते (साधारणत: ३७ डिग्री सेल्सिअस). हे तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी मानवी मेंदूमध्ये तापमान नियमित करणारे केंद्र (टेम्परेचर रेग्युलेटरी सेंटर) असते. बाहेरील तापमान वाढल्यास या यंत्रणेकडे संवेदना पोहोचतात व शरीराचे तापमान सामान्य राहावे, यासाठी कार्यवाही सुरू होते. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, अंगातून घाम जास्त येतो व त्याद्वारे शरीराचे तापमान सामान्य राखण्याचा प्रयत्न होतो. उन्हाळ्यातील आजार-पर्यावरणाच्या र्हासामुळे दरवर्षी उन्हाळा तीव्र होत चालला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांनी ४० डिग्री सेल्सिअसची पातळी गाठली आहे. विदर्भातील काही शहरे ४५ डिग्री सेल्सिअसचा आकडा गाठताना दिसतात. ऋतूप्रमाणे आपल्या जीवनशैलीत व आहारात बदल करण्याची आवश्यकता असते. असे न केल्यास उन्हाळ्यातील आजारांना सामोरे जावे लागते. उष्माघातासारख्या आजारात वेळीच औषधोपचार न केल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो.
उन्हाळ्यातील सौम्य आजार
भूक न लागणे, अंगाची लाही लाही होणे, हात-पाय दुखणे, अंगावर घामोळ्या उठणे, उष्णतेने फोड येणे, घाम जास्त येत असल्यामुळे व कपडे ओलसर राहिल्यामुळे काखेत, जांघेत व पोटाखाली नायटा उठणे ही सौम्य लक्षणे दिसतात. उन्हाळा अति तीव्र असल्यास उष्मापात (हिट एक्झॉशन) आणि उष्माघात (हिट स्ट्रोक) हे आजार होण्याची शक्यता बाळावते.
उष्मापात (हिट एक्झॉशन)
उन्हामध्ये काम करणारे शेतमजूर, बांधकाम करणारे मजूर, खडी फोडणारे, रस्त्याची कामे करणारे मजूर, भर उन्हात फिरतीची कामे करणारे सेल्समन, उन्हामध्ये क्रिकेट, फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळणारे खेळाडू यांना उष्मापाताची लागण होऊ शकते.
उष्मापाताची लक्षणे मळमळणे, उलट्या होणे, दरदरुन घाम फुटणे, थकवा येणे, हातापायांना गोळे येणे, स्नायूंमध्ये व सांध्यामध्ये प्रचंड वेदना होणे, हृदयाचे ठोके वाढणे, श्वास जलदगतीने चालणे, ग्लानी येणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, मूर्च्छा येऊन शुद्ध हरपणे. उष्मापात जास्त प्रमाणात असल्यास आकडीदेखील येऊ शकते. उन्हामध्ये काम करणारे कष्टकरी मजूर अचानक भोवळ येऊन पडतात.
प्रथमोपचार
उन्हामध्ये असा प्रकार घडल्यास रुग्णास आधी सावलीच्या ठिकाणी आणावे. थंड पाण्याने त्याचे अंग पुसावे. रुग्ण जर शुद्धीत असेल तर त्यास पिण्यासाठी पाणी, लिंबू सरबत, ताक, जल संजीवनी हे जलमय पदार्थ द्यावे. काही रुग्णांत पाणी पिण्याचे पण त्राण नसते. अशा वेळेस घोट घोट पाणी देत राहावे. थोडे बरे वाटल्यास रुग्ण व्यवस्थित पाणी पिऊ लागतो व त्यास बरे वाटू लागते. थंड पाण्याने अंग पुसणे चालू ठेवावे. हातापायांना गोळे आले असल्यास सौम्य मसाज घ्यावा. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास डॉक्टरी सल्ला घेण्यासाठी रुग्णास रुग्णालयात पाठविणे.
उपचार
शरीरातील पाणी कमी झालेले असल्यास अशा रुग्णांना सलाईन लावले जाते. रक्त तपासणी करुन या उष्मापाताचा शरीरातील इतर अवयवांवर काही परिणाम झाला आहे का, हे बघितले जाते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अतिधुम्रपान करणारे, क्षयरोगाचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांची विशेष काळजी घेतली जाते. उष्मापाताचा वेळीच उपचार केले तर तो सहसा त्रासदायक ठरत नाही. रुग्णाला थोडीशी विश्रांती देऊन तो आपल्या कामास हळूहळू सुरुवात करू शकतो. उष्मापाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होण्याची शक्यता निर्माण होते व हा उष्माघात प्राणघातकदेखील ठरू शकतो.
उष्माघात
तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रक केंद्र नादुरुस्त होते. शरीराचे तापमान अचानक वाढते ते 40 डिग्री सेल्सिअसच्यावर जाते. शरीरातील प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होतो. मेंदूच्या पेशींना सूज येऊन त्यांच्या कार्यात बिघाड होतो. आकडी येणे, शुद्ध हरपणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुसे यांच्या कार्यातदेखील बिघाड होतो. वेळीच उपाय न केल्यास या अवयवांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. व्यवस्थित उपचार केल्यास हळूहळू रुग्णाच्या परिस्थितीत सुधारणा होते.
प्रतिबंधात्मक उपाय
जीवनपद्धतीतील बदल ऋतूप्रमाणे जीवनपद्धतीत बदल करणे जरुरी आहे. उन्हाळ्यात भूक मंदावते, यास्तव आहारात काही बदल करणे जरुरी आहे. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. प्रौढांनी दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. अतिथंड पाणी शक्यतो टाळावे, वाळा घातलेले सुगंधी पाणी पथ्यकारक ठरते.
उन्हाळ्यातील पेहराव
पांढरे सुती कपडे वापरावे. दुपारी उन्हात बाहेर पडण्याची वेळ आली तर डोक्यावर टोपी घालावी किंवा पांढरे उपरणे गुंडाळावे. प्रवासात पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी. उन्हात जास्त चालणे झाल्यावर सावलीचा आधार घेऊन थोडी विश्रांती घ्यावी.
उन्हाळ्यातील आहार
ताक, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळ पाणी, ताडगोळे, फणस, आमरस, पुदिन्याचा रस, टोमॅटो सूप यांचा आहारात समावेश करावा. जेवणात लघुआहाराचा अवलंब करावा. लघुआहार म्हणजे पचण्यास हलका, वरण भात, तूप, खिचडी, इडली, पोहे, ढोकळा, लाह्या हे सर्व लघुआहारात मोडतात. कढईत तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार ह्यांचे प्रमाण कमी करावे.
फळे आणि फळांचा रस
उन्हाळ्यात पिकणारी सर्व फळे आरोग्यास चांगली असतात. आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, नारळ पाणी, ताडगोळे, करवंद, पेरु, कच्ची कैरी, कलिंगड, संत्री, मोसंबी ही सर्व फळे किंवा त्यांचा रस यांचा आहारत प्रयत्नपूर्वक समावेश करावा. ओली हळद, धणे, जिरे, बडीशेप, दूध, तूप, लोणी याचा वापर वाढवावा. भात, मुळा, मसूर, मटार यांचा आहारात समावेश करावा. बाजारातील कोल्डड्रिंक्स शक्यतो टाळावीत. त्याऐवजी लिंबू सरबत किंवा मसाला छासचा वापर करावा. शाळा-कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असते. मुलांनीदेखील भर उन्हात बाहेर जाणे वा खेळणे टाळावे. आमच्या लहानपणी कॅरम, बुद्धिबळ, मुंबई व्यापार, चौपाल, ल्युडो असे बैठे खेळ उपलब्ध होते. आता संगणक युग आले आहे. त्याचा योग्य वापर मुलांनी करावा. प्रौढांनीदेखील दुपारी १२ ते ४ घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. दुपारी १ ते ३ पुणे शहर झोपलेले असते तसे आपण घरात राहून विश्रांती घ्यावी. शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी, प्रिकली हिट पावडर, मॉईश्चरायझर क्रिम यांचा योग्य वापर करावा.
सार्वजनिक प्रतिबंधात्मक उपाय
यावर्षी उन्हाळा जास्त जाणवतो आहे. पर्यावरणाचा र्हास तर त्याचे उत्तर नाही ना? शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारण्यात येत आहे. हे करत असताना आम्ही वृक्षलागवड व जलसंवर्धन याकडे अजिबात लक्ष देत नाही. फोटो काढण्यासाठी आम्ही वृक्षलागवड करतो, पण त्या वृक्षाची देखभाल करण्याची जबाबदारी आम्ही घेत नाही. जलसंवर्धनाचे काम निष्ठेने करणारे उल्हास परांजपे यांसारखी माणसे विराळीच असतात. ते ग्रामीण व वनवासी भागात पाण्याच्या टाक्या कमी खर्चात बांधण्याचे मार्गदर्शन करतात. ‘फेरो सिमेंट’ तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रामीण भागात शेतीसाठी व झाडांसाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यास ते मदत करतात. अशा प्रकारच्या टाक्या बनविण्याचे प्रशिक्षण ते स्थानिक गवंड्यांना देतात. या कामासाठी निधी ‘सीएसआर’मार्फत उभा केला जातो. आमचे मित्र किशोर मोघे यांचे उदाहरण येथे देण्यासारखे आहे. किशोरने आपला६०वा वाढदिवस आपल्या शालेय वर्गमित्रांसोबत ठाणे जिल्ह्यातील वनवासी पाड्यात साजरा केला. वर्गमित्र आणि गावकर्यांच्या मदतीने त्याने ६० झाडांचे रोपण केले. वर्गमित्र आणि गावकरी यांच्याबरोबर सहभोजन घेतले. या सर्व झाडांच्या देखभालीची जबाबदारीदेखील किशोरने घेतली. किशोर त्या पाड्यात नियमित जातो व त्या पाड्यातील गावकर्यांच्या मदतीने त्या झाडांची देखभाल करतो. गेल्या पाच वर्षांत यातील अनेक झाडे चांगलीच बहरली. किशोरच्या या स्तुत्य उपक्रमाचे आपण सर्वांनी अनुकरण करावे. आपल्या वाढदिवसाला किमान एका रोपाचे रोपण करून त्यांचे संगोपन करावे. पर्यावरणाचा र्हास रोखणे व आपली वसुंधरा सुंदर ठेवणे तुमच्या आमच्या हाती आहे. हा कडक उन्हाळा तुम्हाला सुसह्य ठरो, ही सदिच्छा!
- डॉ. मिलिंद शेजवळ