चीनचे अशांत भविष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2022   
Total Views |

covid



"आग लगे चाहे बस्ती में, हम तो रहेंगे मस्ती में...’ सध्या चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीने हेच धोरण अवलंबलेले दिसते. अगदी आपल्या मराठी म्हणीनुसार, ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून’, अशा प्रकारचे चिनी सरकारचे वागणे आहे. एक सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष जनतेला कशाप्रकारे वागणूक देऊ शकतो याचे उत्तम प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे चिनी सरकार होय. जगभरातला कोरोना तसा आटोक्यात आला. पण चीनच्या शांघायमध्ये आजही कोरोनाचा हैदोस आहे. लोक संतापले आहेत. मानवी हक्क कार्यकर्ते, जागरूक पत्रकार आणि समाजचिंतक अभ्यासक हतबल झाले आहेत.

मात्र, चिनी सरकार असे ढिम्म की, हुं की चूं हलत नाही. विचार करा, जगभरातला कोरोना गेला असता आणि आपल्या देशातल्या एखाद्या गावात त्याचा हैदोस सुरू असता, तर त्यासाठी देशभर डफल्या वाजल्या असत्या, केंद्र सरकारला मनुवादी ठरवून शाहिनबागसारखे आंदोलन सुरू असते. पण, चीनमध्ये असे काही घडत नाही. चीनमध्ये लोक मरोत, लोकांच्या मानवी हक्काच्या अधिकारांचे हनन होवो, तिथे काही घडत नाही. घडत नाही म्हणण्यापेक्षा लोकांवर इतका दबाव आहे की, चिनी जनता सरकारविरोधात काहीही करत नाही. बोलतही नाहीत.

बोलणार तरी कुठे? कारण चिनी प्रसारमाध्यमेसुद्धा चिनी कम्युनिस्ट सरकारच्या दावणीला बांधलेली आहेत. प्रसारमाध्यमे तेच प्रकाशित करणार, प्रदर्शित करणार जे चिनी कम्युनिस्ट सरकारच्या हिताचे आहे. चिनी सरकारच्या विरोधात बोलणार्‍याला मोठी किंमत चुकवावी लागते. यामुळेच की काय गेल्या काही वर्षात चीनमध्ये शेकडो पत्रकारांना अटक झाली. त्यात पाश्चिमात्य देशातील पत्रकारांची संख्या मोठी आहे. यांना अटक का झाली तर?चिनी कम्युनिस्ट सरकारच्या सत्तेत चिनी जनतेचे दबलेले प्रश्न जगजाहीर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ते प्रश्न चीनच्या सरकारी योजनांबद्दलचे होते, ते प्रश्न चीनच्या इतर देशासोबतच्या विस्तारवादी भूमिकेबाबत होते, ते प्रश्न चीनच्या धार्मिक नितीबाबत होते, ते प्रश्न उघुर मुस्लिमाबाबत होते, ते प्रश्न तिबेटी बौद्धधर्मीयांबद्दल होते, ते प्रश्न हाँगकाँगच्या संदर्भातले होते, ते प्रश्न तैवानबद्दलचे होते. या आणि अनेक घटना व समस्यांबाबत प्रश्न विचारणार्‍या माहिती काढणार्‍या व्यक्तिंना वर्षानुवर्षे तुरूंगात टाकले गेले. काही तर चक्क गायबच झाले. ते लोक स्वतःहून कुठे पळून गेले की, त्यांना पळवून लावले, निदान ते जीवंत तरी आहेत का, याबाबत कुणालाच काही माहिती नाही. याहीपलीकडे जाऊन कोरोना आणि चीनचा संबंध यावर तर्कविर्तक करणार्‍यांनाही चिनी सरकारने सोडले नाही.

थोडक्यात, चीनमध्ये सगळे आलबेल आहे, चीनचे कम्युनिस्ट सरकार चिनी जनतेचे खर्‍या अर्थाने पालनहार आहेत, अशा प्रकारची वातावरण निर्मिती चिनी सरकार करत असते. हे सगळे करताना चिनी कम्युनिस्ट सरकार जगभरात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो ते वेगळेच. कुठे भारताच्या सीमेचा वाद उकर, कुठे हाँगकाँगच्या नागरिकांच्या अधिकारासंदर्भात नियमावली तयार कर, कुठे तैवानच्या हद्दीत विमान घुसव. जगाच्या पाठीवरच्या छोट्या-छोट्या देशांना मदत करून त्या देशाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करायचा, अशी सगळी खलनायकी कृत्ये चीन करतच राहतो. जगभरात नाचक्की होत असताना स्वतःच्या देशातल्या नागरिकांनी याबाबत ‘ब्र’ही बोलू नये, याची मात्र चोख व्यवस्था चीन करतो.
आताही रशिया-युक्रेन युद्धात किंवा भारत-पाकिस्तान संबंधामध्ये चीनची जी भूमिका होती ती अनेक चिनी नागरिकांना बिल्कूल पटली नाही. पण त्यावर ते खुलेपणाने मत प्रदर्शित करू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी चिनी प्रशासनाने तिबेटी बौद्धविहारातून काही बौद्ध भिक्खूंना उगीचच जबरदस्तीने अटक केली. मात्र, चीनमधे मोठ्या प्रमाणात नागरिक असलेल्या बौद्धधर्मीयांना याबाबत माहितीही मिळाली ती काही महिन्यांनी. पण, माहिती मिळाल्यांनतर त्याबाबत दुःख किंवा प्रतिक्रियाही व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. या पाश्वर्र्भूमीवरसुद्धा चीनला जगातली मोठी शक्ती म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी देशातल्या समस्यांना अक्षरशः बासनात गुंंडाळून चीन जगभराच्या उचापतीत रमत आहे. भविष्यात चीनला याचे परिणाम भोगावे लागतीलच. कारण, कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे राहत नाही. आज ना उद्या शांततेच्या भ्रमात असलेला चीन अशांत होणारच.



 
@@AUTHORINFO_V1@@