मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही वांद्रे महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दांपत्याने शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले होते. यावरूनच संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत संघर्ष पेटला होता. राणा दांपत्याला अडवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही मातोश्री बाहेर गर्दी केली होती.
शनिवारी मुंबई पोलिसांकडून राणा दांपत्याला अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकारावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही म्हणायची तर कुठे पाकिसनात म्हणायची का?" असा सवाल त्यांनी केला आहे.