काही दिवसांपूर्वीच समाजातील काही जात्यांध दुष्प्रवृत्तींनी हिंदू समाजातील कन्यादान आणि इतर विवाहादी विधींची सार्वजनिक खिल्ली उडवली आणि ब्राह्मणांसह वैदिक विधींबद्दलही अपमानास्पद विधाने केली. त्यानिमित्ताने हिंदू धर्मातील विवाहविधींचे, कन्यादानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
सानन्दं सदनं सुताश्च सुधियः कान्ता प्रियभाषिणी
सन्मित्रं सधनं स्वयोषिति रतिः चाज्ञापराः सेवकाः
आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे
साधोः सङ्गमुपासते ही सततं धन्यो गृहस्थाश्रमः
हे धन्य गृहस्थाश्रमाचे वर्णन आहे. विवाह हा १६ संस्कारांपैकी गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह म्हणजे ‘वि + वाह’ अर्थात ‘विशेष रूपाने उत्तराधिकार’ किंवा ‘उत्तरदायित्व वहन करणे’ असा होय. विवाहाला ‘पाणीग्रहण’ असेही म्हटले जाते. विवाहाला ‘उपयम’, ‘परिणय’, ‘उद्वाह’ अशीही नावे आहेत. ‘पाणीग्रहण’ म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात हाती घेणे. ‘उपयम’ म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे. ‘परिणय’ म्हणजे वधूचा हात हाती घेऊन अग्नीला प्रदक्षिणा घालणे.
‘उद्वाह’ म्हणजे वधूला पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. विवाह ही मानवी समाजातील सर्वात प्राचीन संस्था मानली जाते. विवाह ही केवळ कुटुंबातील महत्त्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार विवाह हा अत्यंत सावधपणे म्हणजेच जागरूक राहून करण्याचा विधी आहे. यामुळेच मंगलाष्टकात ‘शुभ मंगल सावधान’ असे म्हणत असावे. मनुष्याला देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण यातीन प्रकारच्या ऋणांतून मुक्ती हवी असते. यज्ञ यागादी कार्यातून देवऋण, स्वाध्याय आणि सेवा यातून ऋषीऋण आणि ब्रह्मविवाहाच्या संस्कारातून पितरांच्या श्राद्धतर्पणासाठी योग्य आणि सदाचारी धार्मिक संतती उत्पन्न करून पितृऋण फेडता येते.
दश पूर्वांन् परान्वंश्यान् आत्मनं चैकविंशकम्।
ब्राह्मीपुत्रः सुकृतकृन् मोचये देनसः पितृन्।
विवाह अर्थात ब्रह्मविवाहातून उत्पन्न संतती आपल्या कुळाच्या २१ पिढ्यांना पापमुक्ती देतो. ज्यात त्याच्या वर्तमान पिढीचा व भूत आणि भविष्यकाळातील प्रत्येकी दहा पिढ्या समाविष्ट असतात. भविष्यपुराणानुसार जो वर ब्रह्मविधीने सालंकृत कन्येशी विवाह करतो, तो आपले सात पिढ्यांचे पूर्वज आणि येणार्या सात पिढ्यांचे वंशज यांची नरकभोगातून मुक्ती करतो. भारतीय परंपरेत अनेक प्रकारच्या विवाह प्रथा किंवा प्रकार प्रचलित आहेत. मनुस्मृतीनुसार ‘ब्राह्म’, ‘देव’, ‘आर्ष’, ‘प्राजापत्य’, ‘असुर’, ‘गंधर्व’, ‘राक्षस’ आणि ‘पैशाच’ असे आठ प्रकारचे विवाह आहेत.
ब्राह्मो दैवस्तथैवार्षः प्राजापत्यस्तथाऽसुरः
गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधमः
यातील पहिले चार श्रेष्ठतम आणि शेवटचे चार निकृष्टतम विवाह मानले जातात. मनुस्मृतीनुसार विवाहाचे प्रमुख उद्देश यौनतृप्ति, वंशवृद्धि, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायु, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभ हे प्रमुख होत. समाजाचे तंत्र सुव्यवस्थित रचनेने चालण्यासाठी उभारलेला प्रमुख स्तंभ म्हणजे ‘भारतीय विवाह’ संस्था होय.हिंदू धर्मात वंशवृद्धी करण्यासाठी शारीरिक, मानसिक बलाने परिपक्व अशा सुयोग्य युवक आणि युवतीवर दोन्ही परिवाराच्या संमतीने विवाह संस्कार केला जातो.
भारतीय परंपरेनुसार दाम्पत्यजीवन हे आध्यात्मिक साधनेचे स्वरूप मानले गेले आहे. गृहस्थी परिवार जीवनातूनच समाजाला अनुकूल व्यक्ती, व्यवस्था आणि विचार देण्यासाठी श्रेष्ठ अशी नवी पिढी निर्माण करता येते. समाजाला आवश्यक असे महापुरुष, संत, महंत, सैनिक, कार्यकर्ते, पत्रकार, विचारक, चिंतक, खेळाडू हे या परिवार संस्थेतूनच प्राप्त होणार असल्याने विवाह संस्कार हा सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. समाजाभिमुख परिवार संस्था, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील साधकांच्या व्यवस्था आदींबाबत साहाय्यभूत ठरत असते.
दुर्दैवाने आजकाल विवाह सोहळे भपकेबाज आणि दिखाऊ प्रदर्शन होत चालले आहे. पॅकेज, पैसा, मानसन्मान या उथळवृत्तीमुळे विवाह संस्काराचे गांभीर्य मात्र लोप पावते की काय, अशी भीती वाटायला लागते. असो. मात्र, असे असतानाही अनेक युवक-युवती या भपकेबाजपणाला फाटा देऊन वैदिक विवाहविधी बरोबरच सामाजिक उपक्रम, रक्तदान, देहदान संकल्प, सामाजिक वनीकरण, अनावश्यक खर्च टाळून अनाथालयांना दान, वनवासी परिवारांना मंगलनिधीअर्पण अशा विधायक उपक्रमाची जोड विवाहाला देऊन समाजात नवा आदर्श प्रस्थापित करत आहेत, ही अत्यंत आनंददायक बाब म्हणता येईल.
विवाह संस्काराच्या प्रारंभी गणपतीपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन इत्यादी आराधनात्मक विधी साजरे करतात. विवाहविधीमध्ये प्रामुख्याने वाङ्निश्चय, देवक, सीमान्तपूजन, मधुपर्क, गौरीहर,अन्तःपटधारण, कन्यादान, कंकणबंधन, मंगळसुत्र बंधन, विवाहहोम (लाजा होम), सप्तपदी, ऐरणी दान, गृहप्रवेश व लक्ष्मीपूजन असे विधी केले जातात. विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्न गणपती यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच ‘देवक बसविणे’ असे म्हणतात. विवाहविधींचा प्रारंभ वधूवरांस हळद लावण्याने होतो. हरिद्रालेपनविधी यानावाने हा विधी ओळखल्या जातो.
आई, बहीण व नात्यातील लोक वधूवरांना सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह वधूगृही जाऊन वरपक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो, त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात. वधूला हळद लावताना नारळ व पाच मूठभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात. हळद लावल्यावर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधिले जाते. वधूगृही जाताना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळातच सीमांपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-वडील सखेसोयरे व नातलग वरपक्षांचे स्वागत करण्यात व देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपती आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी व कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यायची असल्यामुळे वराची पूजा करतात.
वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसवतात. लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेवपूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोरस्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसर्या बाजूला नवर्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पमाळा असतात. शुभमुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाट उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधनाने वधू विवाहबंधनात अडकते.कन्यादानविधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये, असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. ‘नातिचरामि’ या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.
गौरी कन्यामिमां विप्रयथाशक्ति विभूषिताम्।
गोत्राय शर्मणे तुभ्यंदत्ता विप्रसमाश्रय।
कन्येम माग्रतो भूयाःकन्येमे देविपार्श्वयोः।
कन्येमे पृष्ठतोभूया
स्त्वद्दानान्मो क्षमाप्नुयाम्॥
ममवंशकुले जातापालिता बहुवत्सरान्।
तुभ्यंविप्रामया दत्तापुत्र पौत्रप्रवर्धिनी॥
धर्मे चार्थेच कामेचना तिचरितव्यात्वयेयम्॥
हा श्लोक पठण करून धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्ध्यर्थं ही कन्या तुम्हास दिली आहे. धर्म, अर्थ, काम पुरुषार्थासमयी तिचे उल्लंघन करू नये, असे वधू पितावरांस सांगतो. त्यावर ’उल्लंघन करणार नाही,’ असे अभिवचन देतो. हिंदू संस्कृतीत कन्यादान विधी हा गृहस्थाश्रम प्रवेशाचा मुख्य भाग असून अनादिकालापासून हा संस्कार हिंदू समाजात होतो आहे.
होमाग्नी प्रज्वलित केल्यावर लाजाहोम विधी होतो. वर मंत्रोच्चार करीत असताना वधू होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधू नवरदेवाच्या मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. तद्नंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकांचे साथीदार राहतील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधीपार पडतात. मंगळसूत्रात दोन पदरी दोर्यातत काळे मणी गुंफलेले असतात.
मध्यभागी चार छोटे मणी आणि दोन लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन, दोन वाट्या म्हणजे पती-पत्नी तसेच चार काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ. मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाचे, तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक असते. शिव-शक्तीच्या बळावरच वधूने सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून, कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मगच ते वधूच्या गळ्यात वराकडून घातले जाते.
सप्तपदी हा वैदिक विवाहातील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. सप्तपदीनंतर विवाहित कन्येला वराच्या वामांगी बसविले जाते. यावत्कन्या न वामांगीतावत्कन्या कुमारिका जोपर्यंत कन्या वामांग अधिकारिणी होत नाही, तोपर्यंत तिला कुमारिका मानले जाते. लाजाहोम आणि पाणीग्रहण झाले तरीही सप्तपदीशिवाय वर आणि कन्या हे पती-पत्नी होत नाहीत. ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील 85वे सूक्त आणि अथर्ववेदातील 14व्या कांडातील पहिले सूक्त हे विवाहसूक्त आहे. या सूक्तांच्या आधारेच वैदिक विवाह संस्कारविधी तयार करण्यात आला आहे.
वैदिक विवाह हा अन्य धर्मीयांच्या विवाहाप्रमाणे करार (कॉन्ट्रॅक्ट) नसून माता-पिता, नातेवाईक, इष्ट मित्र आणि गुरुजन यांच्या सहमतीने आशीर्वादाने होणारा आनंद सोहळा आहे. इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता आणि अन्य समस्त देवतेच्या साक्षीने संपन्न होत असल्याने विवाहसंस्कार श्रद्धा, प्रेम आणि आनंदाचा संगम आहे. सप्तपदीला सनातन वैदिक धर्मात सात जन्माचे स्नेहबंधन मानले गेले आहे. वर म्हणतो, “हे देवी, तू संपत्ती आणि ऐश्वर्य तसेच दैनिक खाद्य आणि पेय पदार्थांच्या प्राप्तीसाठी सप्तपदीमध्ये पहिले पाऊल टाकावे.
भगवान विष्णू या गतीसाठी तुला द्रुढ करोत आणि तुला श्रेष्ठ अशी संतती प्राप्त होवो. जी वृद्धापकाळात आमचा आधार होईल. दुसरे पाऊल हे त्रिविध बल आणि पराक्रमाच्या प्राप्तीसाठी, तिसरे पाऊल धनसंपत्ती वृद्धीसाठी, चौथे पाऊल सुखलाभवर्धक धनसंपत्तीचा भोग घेता यावा म्हणून, शरीराचे आरोग्य वर्धनासाठी, पाचवे पाऊल प्राणिमात्राचे पालन आणि रक्षणासाठी, सहावे पाऊल सहा ऋतुनुसार यज्ञ आणि उत्सव साजरे करण्यासाठी आणि माझ्या जीवनातील खरा मित्र (सखी) म्हणून तू राहावे यासाठी सातवे पाऊल तू टाकावे.”
इष एकपदी भवऊर्जे द्विपदी भव
रासस्पोशाय त्रिपदी भवमा यो भव्याय चतुष्पदी भव
प्रजाभ्यः पंचपदी भवऋतुभ्यः षट्पदी भव
सखा सप्तपदी भवसा मामनुव्रता भव
या विधींनंतर वर आपल्या उजव्या हाताने वधूच्या हृदयाला स्पर्श करून म्हणतो, “मी तुझ्या हृदयाला माझ्या कर्माने अनुकूल करतो, आपले चित्त अनुकूल होवो. प्रजापालल ब्रह्माने तुला माझ्यासाठी नियुक्त केले आहे.हे सखी, तू माझे कथन एकाग्रचित्त होऊन श्रवण कर.” आजही पाश्चात्य देशात जिथे विवाहाला करार मानले जाते, तिथे हजारो वर्षांपासून आपला वैदिक विवाह संस्कार, वर आणि वधुला सखा (मित्र) म्हणून सदैव राहाण्याची मुभा देतात.
समञ्जन्तु विश्वे देवाः समापो हृदयानि नौ
सं मातरिश्वा सं धाता समु देष्ट्री दधातु नौ
विवाहसंस्कार हे केवळ दोन शरीरांचे मिलन नसून दोन आत्मा, दोन परिवार यांचे ऋणानुबंधन आहे. म्हणूनच वैदिक विवाह संस्कारात वरवधू प्रार्थना करताना म्हणतात, “हे विश्वनिर्मात्या ब्रह्मदेव, पालनकर्त्या श्रीहरी विष्णू आणि संहारकर्त्या महादेवा आपल्या शक्तीने आणि विवाहमंडपात विराजमान देवता आणि उपस्थित विद्वतजनांच्या शुभाशीर्वादाने आमचे हृदय आणि आत्मा एकरूप होवोत. सप्तदीनंतर वधू-वर अचल, अक्षय आणि अढळ अशा ध्रुवतार्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात.
विवाहबंधाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय. वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्वासन (मांडव परतणी) या विधीनंतर विवाह संस्काराची सांगता होते. स्वधर्म-स्वराष्ट्र रक्षणासाठी सतत सावधपणा अंगी यावा आणि देव, देश, धर्मकार्यार्थ दाम्पत्य जीवन समर्पित व्हावे, अशी प्रतिज्ञा आणि संकल्प नवदाम्पत्यांनी केल्यास नक्कीच प्रत्येक परिवार देवाचे घर म्हणून सुखेनैव नांदेल.
आता सावध व्हा वधुवर झणी अवघ्या स्वधर्मा वरा
देवाचे घर नांदवू सुखभरे संकल्प ऐसा स्मरा
जितेंद्रिय करा विनंती हृदये देवा धनी मनोहरा
राधागोविंद पार्वती शिवहराकुर्यात सदा मंगलम्
- डॉ. भालचंद्र हरदास (9657720242)