साहित्यश्रीमंत डॉ. धनश्री साने

    06-Mar-2022   
Total Views |

Dr. Dhanashree Sane
 
  
जिद्दीने शिक्षण पूर्ण करणार्‍या, विविध पुस्तकांचे संपादन करणार्‍या, संत साहित्यावर व्याख्याने देणार्‍या डोंबिवलीतील डॉ. धनश्री साने यांच्याविषयी जाणून घेऊया...
 
 
डोंबिवलीतील डॉ. धनश्री साने यांच्या विचारांना एक आध्यात्मिक बैठक असून संत साहित्यावर त्यांनी विविध व्याख्याने दिली आहेत. त्यांना वाचनाचा व्यासंग असून त्यांच्या पीएच.डीच्या ‘योगसंग्राम’ या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून मुंबई विद्यापीठातून ‘स्वामी स्वरूपानंद पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया. डॉ. धनश्री साने यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांना एक बहीण आणि एक भाऊ आहे. त्यांचे बालपण अतिशय उत्तम गेले. त्यांची आई शिक्षिका, लेखिका, संवादिका असून तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. तसेच त्या रा. स्व. संघाशी संबंधित संघटनांत काम करतात. त्यांच्या आई मंगला नातू यांना समाजात मानाचे स्थान आहे. त्यांच्या नावानेच धनश्री यांना लोक ओळखतात. आईचे सर्व गुण धनश्री यांच्यात उतरलेले दिसून येतात. त्यांच्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत भाऊदेखील संघपरिवाराशी जोडलेले आहेत. बोरिवली येथील संघाच्या शाखेत कार्यवाहपदाची धुरा ते सांभाळत आहेत. सुसंस्कृत अशा घरात त्यांची जडणघडण झाली. त्यांचे वडील स्टेट बँकेत नोकरी करीत होते. त्यामुळे नोकरीनिमित्ताने त्यांची सातत्याने बदली होत होती. त्याचा परिणाम धनश्री यांचे शिक्षण कधी या गावात, तर कधी त्या गावात, असा झाला. त्यांचे शालेय शिक्षण मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय, मनमाड येथे झाले. साक्री गाव येथे ‘बीए’चे प्रथम वर्ष झाले. पुढील शिक्षणासाठी त्या मुंबईला आल्या.
 
 
 
मुंबईच्या गोरेगाव-पाटकर विद्यालयातून त्यांनी मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन आपले ‘बीए’चे शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी ‘एमए’ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे लगेचच १९८० मध्ये लग्न झाले. लग्नानंतर त्या डोंबिवलीकर झाल्या. लग्नानंतर त्यांनी ‘बी.एड’, ‘पीएच.डी’, ‘एम.फील’ हे सर्व शिक्षण मुंबई विद्यापीठातून केले. मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘एमए’ला प्रथम श्रेणीमध्ये असण्याची गरज असते. पण धनश्री यांची प्रथम श्रेणी दोन ते तीन गुणांनी हुकली होती. घर आणि शिक्षण यांचा समतोल साधत त्यांनी मिळविलेले हे यशसुद्धा कमी नव्हते. पण ‘एमए’ला प्रथम श्रेणी मिळवायची, असे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणून त्यांनी पुन्हा ‘एमए’ची परीक्षा दिली. यावेळी मात्र त्यांनी जिद्दीने प्रथम श्रेणी मिळविली. त्यामुळे पुढील शिक्षणाचा त्यांचा मार्ग आपसूकच सोपा झाला. ‘पीएच.डी’, ‘एम.फील’ सगळीकडे त्यांना लगेचच प्रवेश मिळाला. विभावरी शिरूरकर यांच्या ‘कळ्यांचे नि:श्वास’ या कथासंग्रहावर ‘एम.फील’ पदवीसाठी त्यांनी प्रबंध सादर केला आहे. शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेतसहभागी होऊन हमखास पारितोषिक मिळविणार्‍या विद्यार्थिनींमध्ये धनश्री या होत्या. लग्न झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. वृद्ध सासू, मुले आणि घर सांभाळता सांभाळता त्यांनी जमेल तशा पद्धतीने नोकरी केली. जेव्हा घराला जास्त गरज असेल, तेव्हा त्यांनी नोकरीचा फारसा विचार न करता कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी अनेक संस्थांमध्ये ज्ञानदानाचे काम केले. धनश्री यांचे पती धनंजय साने मुंबई महापालिकेच्या सेवेत आहेत, या प्रवासात त्यांना पतीची चांगली साथ लाभली.
 
 
 
डोंबिवलीतील राधाबाई साठे विद्यालयातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. सहा महिने त्यांनी याठिकाणी ज्ञानदानाचे काम केले. डोंबिवलीतील ‘एसएनडीटी महाविद्यालया’तही त्यांनी काही काळ काम केले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातही त्यांनी मराठी विषय शिकविला आहे. डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात १९८८ साली प्राध्यापक म्हणून त्या रूजू झाल्या. काही काळानंतर त्यांनी नोकरीत ‘ब्रेक’ घेतला. काही काळानंतर त्यांनी पुन्हा के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात नोकरी पत्करली. मुलांनाही शिक्षणाचे महत्त्व समजावे, यासाठी लग्नानंतरही धनश्री या शिक्षण घेत होत्या. या सगळ्या शिक्षणातून त्यांना आनंद मिळाला. स्वत:ला काय हवे ते करता आले, याचे समाधान वाटते. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करीत त्यांनी शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. शिक्षणामुळे सतत साहित्याच्या संपर्कात राहता आले. त्यांचे अनेक वृत्तपत्रे, दिवाळी अंकात काम सुरू होते.
 
 
 
धनश्री या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत. धनश्री यांनी तीन कवितासंग्रहांना प्रस्तावना लिहिली आहे. आत्मचरित्रपर पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. शालेय जीवनात त्यांना नाटकात काम करण्याची संधीदेखील मिळाली होती. पण त्याकाळात तसे वातावरण नव्हते, त्यामुळे त्यांनी कधीही नाटकात काम केले नाही. त्यांचे वक्तृत्व उत्तम आहे. ‘पातंजल योग विद्याधाम’ या संस्थेच्या ‘एमए’च्या विद्यार्थ्यांसाठी ‘पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाचे गेल्या तीन वर्षांपासून त्या अध्यापन करीत आहेत. लीला भट्टे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘ललित’, ‘ज्येष्ठपर्व’, ‘विवेक’ यासारख्या मासिकांमधून, नामांकित वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. संतसाहित्य, संतकवयित्री, स्त्री साहित्य, चरित्रे, आत्मचरित्रे, कथा यासारख्या विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. धनश्री आपल्या नातींना गोष्टी सांगत असतात. आता त्यांची नातवंडे परदेशात आहेत. मात्र, तरीही त्या त्यांना गोष्टी सांगतात. त्यामुळे त्यांच्या नातवंडांना रामायण, महाभारत, शिवाजी महाराज अशा अनेक गोष्टी माहिती आहेत. त्यांची सहा वर्षांची नातदेखील त्यांच्यासोबत मराठी आणि इंग्रजी गोष्टी वाचते. खरंतर तिला वाचता येत नाही, पण ती त्या गोष्टी आज्जीने सांगितल्यावर लक्षात ठेवते. आज्जीमधील वाचनाचे गुण त्यांच्या नातवंडातसुद्धा उतरलेले दिसून येतात. धनश्री यांच्या घरात आठ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. अनेक साहित्यिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अशा या साहित्यश्रीमंत असलेल्या डॉ. धनश्री साने यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.