मुंबई : राज्य शासनाच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, दि. ३० जून रोजी दुपारी चार वाजता ते नव्या जबाबदारीचा औपचारिक कार्यभार स्वीकारतील.
सध्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा कार्यकाल दि. ३० जून रोजी पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सौनिक यांचा सत्कार करत, त्यांच्या चार दशकांच्या प्रशासकीय सेवेचा गौरव केला. विविध प्रशासन क्षेत्रांत त्यांनी बजावलेली जबाबदारी आणि निर्णयक्षमतेचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
राजेशकुमार हे १९८८च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, राज्य शासनात महसूल, नगरविकास, गृह, वित्त अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. नीतीमूल्यांशी प्रामाणिक राहणारा, निर्णायक परंतु समतोल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे.