दि. २७ मार्च, या ‘जागतिक रंगभूमी दिना’ निमित्ताने, रंगभूमीचे बोट पकडून आपल्या घरोघरी पोहोचलेले युवा कलाकार श्रेयस राजे, पृथ्वीक प्रताप आणि अनिषा सबनीस यांना रंगभूमीने कसे समृद्ध केले, याबद्दल त्यांचे शब्दानुभव...
नाटक म्हटले की, दरवेळी आपल्या नजरेसमोर येतो तो प्रत्यक्ष रंगमंच, पडद्यामागील कलाकारंची धावपळ, प्रकाशयोजना, प्रत्यक्ष कलाकार, नेपथ्य वगैरे वगैरे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘नाटक हा प्रयोगक्षम एकांक आहे.’ नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. दरवेळी त्यात बदल होत असतात आणि म्हणूनच त्याला आपण ‘प्रयोग’ असे म्हणतो. आजचे युवा कलाकार एकांकिका किंवा नाटक सादर करताना त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघता, असा प्रयोग रंगभूमीवर झाला पाहिजे, एका चौकटीत न अडकता आपल्याला त्यातून बाहेर येता आले पाहिजे, लोकांना काय आवडते, काय जास्त विकले जाते यापेक्षा आम्ही काय पाहतोय, आम्हाला काय जाणवतंय, हे प्रेक्षकांना दाखवायला हवे, असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. आज नाटकात १०० टक्के वेगळे प्रयोग होत आहेत. परंतु, कदाचित ते प्रसिद्ध किंवा ओळखीचे चेहरे नसल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत ते तेवढ्या ताकदीने पोहोचत नाहीत. ज्यांना प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे शक्य नाही, जे वयोवृद्ध आहेत, अशांसाठी ‘घरोघरी नाटक’ असा वेगळा प्रयोग तरुणाई करत आहे.
प्रत्येक व्यक्ती म्हटली की, तिचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. जे पूर्वीपासून टिकून आहे, प्रसिद्ध आहे ते म्हणजेच ‘अभिजात’ असे आपण मानतो. अभिजात नाटक मागे पडलंय का? किंवा एखादी कलाकृती अभिजात आहे, तर तरुण पिढी तिला तितकासा मान का देत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.परंतु, नाटक हे पिढीनुसार बदलत आले आहे. एखादी गोष्ट शिकायची इच्छा असेल, तर आपण ती प्रत्येकाकडून शिकायचा प्रयत्न करतो. अमुक एक जण आला आणि त्यांनी आम्हाला शिकवले असे होत नाही. इथे प्रत्येक जण गुरू असतो. तसेच, प्रत्येक दिग्दर्शकाची कलाकृती ही अभिजात कलाकृतीच्या जवळ जाणारी असते किंवा नसते. पण, म्हणून ती कलाकृतीच नाही असे होत नाही. सर्वात आधी नाटक केव्हा झाले होते, तर एका आदिमानवाने वाघ पाहिला आणि हावभाव करून दुसर्याला ते सांगितले. ही कलाकृती का अभिजात का नाही? शास्त्रशुद्धरित्या आज ती अभिजात नसेल, पण तिचेच बदलत गेलेले स्वरुप आज आपण पाहत आहोत. ज्या वेळी मुले एकांकिका स्पर्धांमधून व्यावसायिक नाटकापेक्षा भन्नाट, वेगळे प्रयोग करून बघतात तेव्हा ‘तुम्ही व्यावसायिक झालात का!’ असे न बोलता, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. एकांकिका स्पर्धांमधून ‘स्पर्धा’ हा शब्द वगळता आला, तर त्याला इतर कोणत्या अडचणी येणार नाहीत- नाटकाएवढीच भव्यता त्याला प्राप्त होईल. आजच्या नाटकात अनेक बदल होत आहेत की, त्यामुळे त्यातून चित्रपटाची झलक दिसून येते. म्हणून या एकांकिकांना ‘स्पर्धा’ न म्हणता फक्त ‘एकांकिका’ म्हटले, तर आपण स्पर्धेच्या पलीकडे जाऊन नाटक-एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे अभिजात कलाकृती ही प्रत्येक पिढीला आपलीशी वाटणारी असायला हवी.
‘लॉकडाऊन’च्या काळात शाळा, ऑफिस यांच्याबरोबर नाटकदेखील ऑनलाईन सादर होत होते. नाटकासारखी प्रत्यक्ष अनुभवावी, नाट्यगृहात जाऊन बघावी, अशी गोष्ट आता यापुढे ऑनलाईनच सादर होईल का, अशी शंका मनात निर्माण झाली होती. किंबहुना, आता नाटकालादेखील ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ मिळणार का, असा प्रश्न मनात होता. प्रत्यक्ष रंगमंचावर घडणारी कलाकृती बंद काचेमागे बघणे ही कल्पना नाट्यप्रेमींच्या पचनी न पडणारीच आहे. परंतु, थोडा दूरदृष्टीने विचार केला तर लक्षात येत, की आज साकार होणार्या उत्तम नाटकाचा ५० वर्षांनी जर प्रयोग झाला नाही किंवा आपण ऐकून, वाचून असलेली उत्तम कलाकृती जर तांत्रिक संस्कार करून राखून ठेवता आली, तर आपण तो प्रयोग ‘ओटीटी’वरून केव्हाही, कुठेही पाहू शकतो. नक्कीच त्याला प्रत्यक्ष बघताना जो अनुभव येतो तो येणार नाही. परंतु, ‘माझी ही कलाकृती पाहायची राहून गेली,’ अशी रुखरुख तरी उरणार नाही. याचबरोबरीने ‘संपूर्ण जग ही एक रंगभूमी आहे,’ असे जर आपण म्हणतो, तर एखाद्या रस्त्यावर केलेले नाट्य किंवा प्रहसन (स्कीट) हा नाटकाचा भाग असू शकत नाही, हे म्हणणे चुकीचे ठरते. आपण एखादी गोष्ट समाज माध्यमातून पाहू-ऐकू शकतो. परंतु, जर एखाद्या गरीबाकडे किंवा चहावाल्याकडे जर हे माध्यम नसेल, तर तो पथनाट्य पाहून स्वतःचेमनोरंजन करून घेऊ शकतो. कारण, शेवटी प्रबोधन हे मनोरंजनातून होते. लोक हे सर्व का बघतात, मनोरंजन का करतात, तर ते त्यातून काहीतरी बोध घेत असतात. त्यामुळे शाळेतही गोष्टींच्या खाली ‘तात्पर्य’ लिहिले असते. म्हणजे ‘गोष्ट दाखवणे’ हे कलाकारांचे काम आहे, तर ‘तात्पर्य शिकणे’ हे लोकांचे काम आहे. त्यामुळे पथनाट्य आणि प्रहसन हे दोन घटक लोकांचे जनजागृती करणारे भाग आहेत.
नाटक ही अविरत, अखंड चालणारी कलाकृती आहे. ती न संपणारी आहे. बर्याचदा ‘नाटक संपत चालंय’ अशी ज्यांना भीती आहे, त्यांनी स्वतःहून नाटकासाठी काहीतरी करावे. नाटक हे पूर्वीसारखे तीव्रतेने होत नाही किंवा पोटतिडकीने कोणी नाटकातून का सांगत नाही, असे वाटणे खरे आहे. पण, हेच व्यक्त करायला सिनेमासारखे आणखी सक्षम माध्यम आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन अतिशय सक्षम आणि ताकदीची माध्यमे आहेत. जेव्हा आपण नाटकासारखी गोष्ट अतिशय तन्मयतेने, अभ्यासपूर्ण पद्धतीनी, मनन-चिंतन बघायची सवय लागते तेव्हा आपल्याला चित्रपट सजगतेने बघायची सवय लागते. ज्यांनी आयुष्यात काहीच केले नाही, तोही चित्रपट करतो, ज्याने नाटक केले आहे तो देखील चित्रपट करतो. म्हणजेच आपल्याला पूर्वापार नाटकाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे नाटक आपल्या मुळाशी आहे. तोच आपण विविध माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट नाटकातून व्यक्त करता येत नसेल ती चित्रपटातून व्यक्त होऊ शकते. चित्रपटांतून रसनिष्पत्ती नक्की होते. परंतु, एखाद्या कलाकाराच्या रंगमंचावरील अभिनयामुळे जेव्हा डोळ्यात पाणी येते, तो अनुभव अतिशय वेगळा असतो. जसा स्पर्शाचा अनुभव असतो, गंधाचा अनुभव असतो, तसा नाटकाचासुद्धा अनुभव आहे आणि तो न संपणारा आहे आणि तो संपणारही नाही. सध्या नाटकाच्या बाबतीत असा गोंधळ झाला आहे की, आपण त्याच्याकडे ‘नाटक’ म्हणून न पाहता फक्त ‘व्यवसाय’ म्हणून बघतोय. मोठमोठ्या पारितोषिकांकरिता, प्रसिद्धीकरिता सादरीकरण केले जात आहे का, असे प्रश्न पडतात. यामुळे एखादी उत्तम संकल्पना, ज्यातून नाटक घडू शकते ते बाजूलाच राहते. आत्ताची तरुणाई ‘लॉकडाऊन’मध्ये म्हणत होते की, ‘नाटक मरतंय, नाटकाला जगवले पाहिजे.’ परंतु, एक गोष्ट सत्य आहे की, नाटक कधीच मरणार नाही, किंबहुना आपल्या आयुष्यात नाटकाला कुठेच स्थान नसेल, तर नुकसान आपले होणार आहे. नाटक हे आपल्या आयुष्यातला अविभाज्य आहे. नाटक हे अमृत आहे आणि ते लोकांना जगवतेय.
शब्दांकन : वेदश्री दवणे