श्रीलंकेला चीनप्रेम भोवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2022   
Total Views |
                
srilanka
 
 
दुसर्‍याचा आधार घेऊन स्वतःला सावरत बळकट करणे शहाणपणाचे लक्षण असते. मात्र, दुसर्‍याच्या थेट वळचणीला जाऊन स्वतःला दुर्बल करणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरते. या दोन्ही बाबी सध्या भारताचा शेजारी देश श्रीलंकेला चपखलपणे लागू होतात. आधीच डबघाईत सापडलेला श्रीलंका दिवसेंदिवस दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. कारण, नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीने श्रीलंकेची किती भयाण वाताहत झाली आहे, याचा प्रत्यय येतो. श्रीलंकेकडे कागद खरेदी करण्यासाठी डॉलर अर्थात परकीय चलन नसल्याने देशभरातील शाळा, महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे शाई आणि कागद बाहेरील देशांतून आयात करणे शक्य नसल्याने शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक परीक्षा घेण्यास असमर्थ ठरत आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने देशातील जवळपास दोन तृतीयांश अर्थात ४५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
श्रीलंकेला १९४८ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर सर्वात वाईट काळातून सध्या श्रीलंका जात असताना पेपर आणि शाई आयात करता न आल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. सोमवारपासून सुरू होणार्‍या परीक्षा यापुढे कधी घेतल्या जातील, याविषयीदेखील ठोस माहिती शिक्षण अधिकार्‍यांकडून समोर आलेली नाही. श्रीलंकेतील ‘टर्म टेस्ट’ या अंतिम परीक्षेद्वारे विद्यार्थी पुढील वर्गात जाणार की नाही, हे मूल्यांकन प्रक्रियेच्या माध्यमातून ठरविले जाते. मात्र, आता कागदाच्या तीव्र टंचाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. तब्बल २.२ कोटी डॉलर्सच्या रोखीचे संकट श्रीलंकेसमोर असून, त्यांनी सर्वाधिक कर्ज चीनकडून घेतले आहे. यंदा ६.९ अब्ज डॉलर्स कर्जाची परतफेड श्रीलंकेला करावी लागणार असून फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत त्यांचा परकीय चलन साठा फक्त २.३ अब्ज इतकाच उरला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परकीय चलनाची टंचाई जाणवत आहे. परकीय कर्जाने बेजार झालेल्या श्रीलंकेने मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटामुळे अन्न, इंधन आणि औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची आयातही बंद केली आहे. दूध पावडर, साखर, डाळी, तांदूळ, खाद्यतेल, अन्न, इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी श्रीलंकन जनतेला लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. देशातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे. श्रीलंकेचा एक रुपया म्हणजे भारताचे २७ पैसे अशी सध्याची स्थिती असून, श्रीलंकेतील महागाईचा दर तब्बल १६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. या आर्थिक संकटातून स्वतःला वाचविण्यासाठी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दरवाजे ठोठावले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीलंकेच्या सरकारने सर्वप्रथम चीनकडे मदत मागितली. मात्र, चीनने श्रीलंकेच्या मदत प्रस्तावाला झुलवत ठेवत एकप्रकारे केराची टोपलीच दाखवली. काही क्षणांच्या आमिषासाठी श्रीलंकेला चीन जवळचा वाटू लागला. मात्र, चीन आणि पाकिस्तानची दंशवादी वृत्ती कुणापासून कधीही लपलेली नाही. नेपाळनंतर भारताला पाण्यात पाहणार्‍या श्रीलंकेला चीनने आपल्या जाळ्यात अडकवत अगदी पद्धतशीरपणे भीकेला लावले. आता चीन बोले आणि श्रीलंका चाले, असा पुढचा अध्याय पाहायला मिळाला, तर नव्वल वाटू नये. नापाक वृत्तीने सर्वपरिचित पाकलाही चीनने भीकेला लावल्याने आता इमरान खान दारोदार भटकू लागले आहे.
भारताने आपला मित्रधर्म न विसरता श्रीलंकेला या संकटातून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. जानेवारीत श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यात अन्न, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यासाठी ‘एसबीआय’ आणि श्रीलंका सरकारमध्ये करार करण्यात आला. श्रीलंकेने विकासासह संरक्षण योजनांसाठी चीनकडून भरमसाठ कर्ज घेतले. चीनचा कावेबाज इतिहास माहीत असूनही श्रीलंका चीनच्या वळचणीला जाऊन बसला आणि आपल्या सत्यानाशाचा इतिहास स्वतःच्या हाताने लिहिला. श्रीलंकेला चीनप्रेम चांगलेच भोवले. त्यामुळेच दुसर्‍याच्या वळचणीला जाऊन स्वतःला दुर्बल करणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@