
श्रीलंकेविरूद्ध नुकतीच पार पडलेली ‘टी-२०’ मालिकाही ‘३-०’ अशा फरकाने जिंकून घेत भारताने प्रतिस्पर्धी संघांविरोधात निर्भेळ यश मिळविण्याची हॅट्ट्रिक नुकतीच साधली. घरच्या मैदानावर जरी, या मालिका खेळविण्यात आल्या असल्या तरी आगामी ‘टी-२०’ विश्वचषकाच्या दृष्टीने संघामध्ये नवनव्या खेळाडूंना संधी देत प्रतिस्पर्ध्यांविरोधात निर्भेळ यश मिळविणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते. हे आव्हान पेलल्याबद्दल भारतीय पुरूष क्रिकेट संघ कौतुकास पात्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारताने आधी न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरोधात ‘३-०’ अशा फरकाने ‘टी-२०’ मालिकेत निर्भेळ यश मिळविले. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही संघांविरोधातही उत्कृष्ट कामगिरी केली. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यातील ताळमेळ उत्तम असल्याचेही पाहायला मिळत असून, याचा भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे निरीक्षण किक्रेट तज्ज्ञांनी नोंदवले आहे. मुख्य म्हणजे भारताला मधल्या फळीतील फलंदाजांची मोठी चिंता होती. भारताकडे खेळाडूंची काही कमी नव्हती. परंतु, त्या खेळाडूंकडून लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात येत नव्हती. या खेळाडूंना भारतीय संघात याआधीही संधी देण्यात येत होती. परंतु, खेळाडूंना आपल्या खेळीमध्ये काही सातत्य राखता येत नव्हते. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांची चिंता भारतीय संघाला कायम होती. नवनियुक्त भारतीय संघाचे प्रशिक्षक याकडे लक्ष देऊन ही चिंता दूर करतील, अशी आशा सर्वांना होती. सध्याची भारतीय संघाची कामगिरी पाहता, द्रविड यांनी ही चिंता मिटवली, असे म्हटल्यास कदाचित ते चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंनी विविध मालिकांदरम्यान मधल्या फळीत उत्तम कामगिरी करत सर्वांचे मन जिंकून घेतले. केवळ हे दोन खेळाडूच नव्हे, तर अष्टपैलू खेळाडूंनीही लौकिकाला साजेशी कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ निर्भेळ यशाची हॅट्ट्रिक साधण्यात यशस्वी झाला, असे मत तज्ज्ञांचे आहे. आगामी ‘टी-२०’ विश्वचषकासाठी भारत मजबूत संघबांधणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत विविध खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होणे, ही भारतासाठी एक चांगली बाब मानली जात आहे.
चिंतन करावे...
निर्भेळ यश मिळविल्याबद्दल भारतीय संघावर कौतुकवर्षाव होत असताना या मालिकांदरम्यान झालेल्या त्रुटींवर बोट ठेवत काही माजी क्रिकेटपटूंनी याबाबत आगामी काळात सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ‘लिटल-मास्टर’ म्हणून सर्वत्र ख्याती असणारे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर बोट ठेवले असून, त्यांच्या कामगिरीमध्ये आणखीन सुधारणा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. गावस्कर यांचे हे म्हणणे अगदी योग्य असल्याचे निरीक्षण क्रिकेट विश्वातील तज्ज्ञ मंडळींनीही नोंदवले आहे. सामन्यातील शेवटच्या षटकांदरम्यान भारतीय संघाकडून होणार्या गोलंदाजीवर अनेक तज्ज्ञ मंडळींनी आक्षेप नोंदवला असून, यामध्ये आणखीन सुधार होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारतीय गोलंदाजांकडून शेवटच्या षटकांदरम्यान भेदक मारा करण्यात यावा, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला वेसण बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ‘यार्कर’, ‘स्लोवर डिलिव्हरी’ आदींचा वापर गोलंदाजांनी अधिक करावा जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला कमीतकमी धावसंख्या उभारता येईल. तसेच, ‘ब्लॉक होल’मध्ये गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येची गती रोखावी, जेणेकरून फलंदाजांवर दडपण निर्माण होते. दडपणाखाली खेळणे हे सोपे नाही, अशा परिस्थितीत फलंदाज बाद होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ही नीती वापरून शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करावी, असे मत तज्ज्ञांचे आहे. परंतु, गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज लौकिकाला साजेशी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरल्याने दुबळ्या श्रीलंकेतील फलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडविण्यात यश जरूर मिळविले. परंतु, शेवटच्या षटकांदरम्यान गोलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी होताना दिसून येत नाही. परिणामी, दुबळा संघदेखील भारताविरोधात मोठ्या प्रमाणात धावसंख्या उभारत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मधल्या फळीतील फलंदाजांच्या चिंतेचा विषय नव्या प्रशिक्षकांनी सोडवला. त्याचप्रमाणे यावरदेखील चिंतन व्हावे, अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.