अतुल्य भारताची ‘जिज्ञासा’

    09-Feb-2022   
Total Views |

neeta vaidya
 
 
 
‘अ‍ॅडवेंचर टुरिझम’ या क्षेत्रात यशस्वीपणे आपले नाव कोरणार्‍या नीता वैद्य यांच्या तितक्याच ‘अ‍ॅडवेंचरस’ जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
 
विशेषतः ‘पुरुषांचं’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘अ‍ॅडवेंचर टुरिझम’ या क्षेत्रात यशस्वीपणे आपले नाव कोरणार्‍या नीता वैद्य मूळच्या अहमदनगरच्या. एकत्र कुटुंबात बालपण व्यतीत करताना लहानपणापासूनच त्यांनी शिस्त अंगी बाणावली. व्यवस्थापन शास्त्रातील पदवी प्राप्त केली, तरी शहरातल्या वातावरणापेक्षा निसर्गाच्या रम्य, मोकळ्या वातावरणातच आपण अधिक रमतो, हे त्यांच्या बालपणीच लक्षात आले.
 
घरातल्या शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणाबरोबरच ‘साहसी खेळ’ हा नीतांच्या आवडीचा विषय. शालेय जीवनात विविध खेळांतून त्यांनी प्रावीण्य मिळवले व राज्यस्तरीय क्रिकेट टीममध्ये त्या काही काळ सक्रियदेखील होत्या. १९९० मध्ये केलेला हरिश्चंद्रगडावरचा ट्रेक ही त्यांच्यासाठी ट्रेकिंगची सुरुवात ठरली. कुठल्याही व्यक्तीच्या यशामागे एक संपूर्ण कुटुंब उभे असते, नीतांच्याबाबतीत देखील असेच झाले. दहावीनंतर नगर येथे डॉ. रवींद्र सातारकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ‘ओंकार ट्रेकर्स’ या संस्थेची स्थापना केली. नगरमध्ये पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांसाठी आठवडाभराचे ‘कमांडो’ कॅम्प घेण्यास या संस्थेने सुरुवात केली. मानसिक, शारीरिक स्वास्थ्याबरोबर निसर्गाशी मैत्री करायला शिकवणारा हा त्यांचा कॅम्प होता. शाळा,महाविद्यालयामधील मुलांच्या संस्थेचे कार्य ‘गिरीप्रेमी’ संस्थेच्या डॉ. उषा प्रभा पागे यांच्या कानावर गेले. त्यांनी या मुलांची भेट घेत त्यांना प्रोत्साहन देत सह्याद्रीबरोबरच हिमालयात देखील ट्रेकिंग करण्याचा सल्ला दिला. एकीकडे व्यावसायिक शिक्षण, तर दुसरीकडे नगरमधील ‘बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये नीतांचे ट्रेकिंग प्रशिक्षण सुरु होते. १९९३ मध्ये त्यांनी मनालीला जाऊन ट्रेकिंगचा कोर्स पूर्ण केला. वयाच्या १८व्या वर्षी त्या स्वतंत्रपणे ‘ट्रेक लीडर’ झाल्या आणि महिला व लहान मुलांसाठीचे अनेक ट्रेक त्या आयोजित करु लागल्या. लहान वयातच या ट्रेक्समुळे आपल्याला स्वास्थ्याची व जबाबदारीची जाणीव झाली, तसेच विश्वास ठेवणारे स्वतःचे व सहट्रेकर्सचे पालक हा फार मोठा ठेवा मिळाला, असे त्या सांगतात.
 
लग्नानंतर नीता नाशिकला आल्या. सुरुवातीचा काही काळ कौटुंबिक जबाबदार्‍या, नोकरी, दोन मुलींचा जन्म व मधल्या काळात झालेले ऑपरेशन्स यामुळे ट्रेकिंगपासून त्या दुरावल्या. इयत्ता आठवीत असलेल्या मुलीला भूगोल शिकवताना हिमालयाची माहिती नीता देत होत्या. ट्रेकिंगमुळे परिचयाची ही माहिती त्या अतिशय प्रभावीपणे तिला समजावून सांगू शकत होत्या. आपणही त्या भूभागाला भेट द्यावी, अशी इच्छा मुलीने बोलून दाखवली. पण, तिला एकटीला पाठवण्यातील अडचणी पाहाता तिला आपणच ट्रेकला घेऊन जावे, असे नीता यांनी ठरवले. जवळपास १५ वर्षांनंतर ट्रेकला जाताना आपल्याला आता हे सगळं कितपत जमेल, म्हणून त्यांचं मन साशंक होतं. तरीही मुळातच असणारी जिद्द व हिमालयाची ओढ यामुळे त्यांनी नोकरीतून काही दिवसांची रजा घेत मुलीबरोबर हिमालयात जाण्याचे ठरवले. यावेळी आणखीही काही जणींनी त्यांच्याबरोबर ट्रेकसाठी जाण्याची इच्छा बोलून दाखवली. उत्तराखंडच्या कुमाऊ भागात असणार्‍या पिंडारी-काफनी ग्लेशिअर येथे आयोजित केलेला १७ महिलांबरोबरचा हा त्यांचा पहिला ‘लेडीज स्पेशल ट्रेक’ ठरला. मुलींना असणारी निसर्गाची आवड व त्यांची लाभलेली साथ, पहिला अतिशय यशस्वी ठरलेला ट्रेक या आधारे त्यांनी नोकरीतून राजीनामा देत २०१६ मध्ये व्यावसायिक स्तरावर ’जिज्ञासा अ‍ॅडवेंचर्स टूर्स’ ची सुरुवात केली. एक महिला म्हणून काही अडचणी नक्कीच येत असल्या तरी त्यातून वाट काढायची वृत्ती, गेल्या काळात ‘कोविड’मुळे व्यवसायाला बसलेला फटका, अशा सगळ्यांतून नीता जिद्दीने पुढे मार्गक्रमण करीत आहेत. भारतातील अनेक राज्यांत आत्तापर्यंत त्यांनी ट्रेक, जंगलसफारी, निसर्ग ओळख अशा अनेक टूर्सचे आयोजन केले आहे. जवळपास पावणे दोन हजार लोकांना ‘अतुल्य भारत दर्शन’ त्यांनी ‘जिज्ञासा’ संस्थेतर्फे घडवलेले आहे. अरुणाचल प्रदेशात महिला स्पेशल टूर आयोजित करत असताना आसाम, अरुणाचल प्रदेश सीमेवर भालुक येथून लष्कराच्या जवानांनी केलेले सहकार्य हा त्यांच्यासाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण होता. एक महिला ट्रीप आयोजक असताना संपूर्ण भारतात कायमच आदराची व सहकार्याची वागणूक मिळाली, हे त्या आवर्जून सांगतात. स्थानिक लोकांकडून मिळणारं प्रेम व आदर ही तर कायमस्वरुपी जमेची बाजू. अर्थात, त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधल्या संस्कृतीचा अभ्यास, योग्य ती काळजी, ज्या भागात जातोय तिथली माहिती, लोकांविषयी आदर, कृतज्ञतेची भावना ही मानसिकता फार आवश्यक आहे. लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी केवळ फिरवून आणायचं नाही तर तिथला अनुभव कायमस्वरूपी त्यांच्या मनात नोंदवला जायला हवा, स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी, तसेच आपण जिथे जातोय तिथल्या जैवसंपदेला आपल्याकडून कुठलीही हानी पोहोचू नये, हा नीता यांचा कटाक्ष असतो.
 
‘निसर्ग मित्र’, ‘विशेष महिला पुरस्कार’, ‘वुमनोवेटर’ या संस्थेतर्फे ’थाऊजंड एशिया फेसेस’ हा विशेष पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आगामी काळात केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील लोकांना भारतातल्या अस्पर्शित भागांची ओळख करुन देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.