सुर्याला उगवावे लागलेच...

    22-Feb-2022   
Total Views |

डॉ. मिलींद संपगावकर
 

डॉ. मिलींद संपगावकर म्हणजे एक अफलातून व्यक्तीमत्त्व. यशस्वी उद्योजक आणि तितकेच समाजशील समाजहितचिंतक. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
‘सिद्धी असोसिएटस’, ‘रिद्धी रिसर्च अ‍ॅण्ड सेंटिमेंटल ट्रेनिंग’ या दोन कंपन्यांसोबतच, ‘रिद्धी लेडी विंग’, ‘बीबीसी चॅरिटेबल ट्रस्ट’, मध्यमवर्गीय विकास मंच या सामाजिक परिक्षेपात काम करणार्‍या संस्थाचे संस्थापक मिलींद संपगावकर. मिलींद हे गुंतवणूक सल्लागार असून २३ हजार लोकांना ते गुंतवणूक आणि विमा संदर्भात सेवा देतात. आजपर्यंत त्यांनी ३५०० कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. ११० कोटींचा ‘लाईफ इन्शुरन्स प्रिमियम’ ते जमा करून देतात. ‘एमडीआरटी’ युएसए मानांकनप्रमाणे नऊ वेळा ‘एमडीआरटी’चा बेच मार्क त्यांनी पार केला. ‘वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया’मध्ये नोंद झाली. ‘गिनीज बुक’मध्ये नाव येण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा बेंचमार्क पहिल्यांदाच पूर्ण करणारे ते एकमेव आहेत. त्यांना लक्ष्मीचा आशीर्वाद तर आहेच. पण, सरस्वतीमाताही त्यांना प्रसन्न आहे. ‘एमकॉम’, ‘एमफिल’,‘पीएच.डी इन इन्शुरन्स अ‍ॅण्ड कोऑपरेटिव्ह बँक’, ‘फेलो फ्रॉम इन्शुरन्स इन्सिट्युट ऑफ इंडिया’, ‘आयआयआय सीए इंटर’, ‘जीडीसीए’, ‘सर्टिफिकेट ऑफ पब्लिक पॉलिसी’, ‘इकॉनॉमिक्स फ्रॉम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘एमएस इन इन्शुरन्स मॅनेजमेंट फ्रॉम बोस्टन युनिव्हर्सिटी’, ‘पीएच.डी इन फायनान्स अ‍ॅडमिनीस्टे्रशन फ्रॉम द अमेरिकन युनिव्हर्सिटी युएसए’ असे त्यांचे शिक्षण आहे. विमा क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे त्यांना ३६० पेक्षाही जास्त पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर जाणवते की, अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी असे तेजोमय आयुष्य म्हणजे पुण्याच्या मिलींद संपगावकर यांचे आयुष्य म्हणू शकतो.
 
 
 
संपगावकर कुटुंब तसे मुळचे मालेगावचे. भारत संपगावकर आणि भारती संपगावकर या दाम्पत्यांना चार अपत्ये. त्यापैकी एक मिलींद. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भारत यांनी पानाचे छोटे दुकान टाकले. त्यातही उत्पन्न नाहीच. मिलींद लहानपणापासूनकुशाग्र बुद्धिचे. इयत्ता चौथीत असतानाच त्यांनी भिक्षुकी करायला सुरुवात केली. शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी ते पापड, पोहे विकू लागले. दिवसाला १०० चुन्याच्या पुड्या भरून ५० पैसे कमवू लागले. बालपणातचअर्थार्जनाची सवय लागली. तो सगळा काळ गरिबी आणि त्याअनुषंगाने येणार्‍या भयानक अनुभवांचाच होता. नात्यात कुठे शुभ प्रसंग असेल, तर केवळ एक औपचारीकता म्हणून निमंत्रण दिले जाई. आमंत्रण दिले म्हणून संपगावकर कुटुंब गेले तर तिथे मान सन्मान तर सोडाच विचारपूसही केली जायची नाही. पैसा पाहून, बरकत पाहून, आवभगत करायची. हे सगळे पाहून मिलींद यांनी बालपणीच ठरवले की, कुठेही आपल्याला मानाने बोलावले जावे इतके मोठे व्हायचे. त्यामुळे लहाणपणापासून मिलींद स्वाभिमानी, स्वावलंबी आणि महत्त्वाकांक्षी झाले. आजही एक जबाबदार व्यक्तिमत्त्व ही त्यांची प्रमुख ओळख म्हणता येईल. याचे बीज लहानपणीच्या ‘त्या’ घटनेत असावे. त्यावेळी भिक्षूकी करून आणि इतर छोटे छोटे व्यवसाय करून मिलींद यांनी थोडे पैसे साचवले होते. मिलींद यांनी हट्ट धरला, मला दिवाळी आणि दसर्‍यालाही नवीन कपडे हवेत. त्यावेळी त्यांची आई म्हणाली, “मिलींद तू सगळ्यात मोठा आहेस. तुझ्यावर तुझ्या सगळ्या भांवडांची जबाबदारी आहे. सगळ्यांना कपडे घेतले की, तू दोन काय चार कपडे घे. समजूतदार मोठ्या व्यक्तिने माणसाने सगळ्यांची काळजी घ्यावी.” त्यावेळी लहान मिलींदला इतके काही कळले नाही. पण, आपण मोठे आहोत, आपण आपल्या सोबतच्या लोकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे हे त्यांच्या मनावर ठसले.
  
 
 
लहानपणी त्यांना वाटे आपण डॉक्टर व्हावे. पण, वैद्यकिय अभ्यासक्रम आणि महाविद्यालयात प्रवेश घेणे खर्चिक असते. तो खर्च सध्या तरी आपण उचलू शकणार नाही म्हणून मिलींद यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्याचवेळी सीए एन्ट्रन्सचीही परीक्षा उत्तीर्ण झाले. पण, पुढच्या परीक्षेस बसण्यासाठी पैसे नव्हते. आर्थिक परिस्थितीमुळे सर्वत्र कोंडीच कोंडी होत होती. आजपर्यंत आर्थिक मागास या निकषावर ‘स्कॉलरशिप’ मिळत होती किंवा मालेगावच्या मारू नावाच्या एका दानशूर व्यक्तिच्या वह्या वितरणातून अभ्यासासाठी मिळत होत्या. पण पुढे काय? शेवटी वाणिज्य शाखेची पदवी मिळवल्यानंतर नोकरीसाठी मिलींद नाशिकला मावशीकडे आले. तिथे मावशीचे घर ते कार्यालय आठ किलोमीटर अंतरावर होते. शेवटी भरपूर मेहनत करून मिलींद नाशिकमध्ये स्थायिक झाले. कुटुंबालाही बोलवून घेतले. काही वर्षांनी कामानिमित्त ते पुण्याला आले. पुण्यात विमा क्षेत्रातल्या कंपनीत काम करू लागले. पुण्यात घरही घेतले. लग्न झाले. याच काळात त्यांनी ‘एमकॉम’, ‘एमफिल’ आणि ‘पीएच.डी’ही केली. काम, घर आणि शिक्षण या तीन आयामापलिकडे त्यांनी कुठेही लक्ष दिले नाही. पण इथेही वेतन पुरेसे पडत नव्हते. उत्पन्न वाढवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. त्यानंतर त्यांनी ‘सिद्धी असोसिएटस’ हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुणे कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि विविध कंपन्यांच्या गेटबाहेर अक्षरशः उभे राहात. इमारतीतून बाहेर पडणार्‍या व्यक्तिंना विमा पॉलिसी गुंतवणुकीबद्दल माहिती सांगत. आज बघता बघता मिलींद यांच्या कामाचा पसारा किती वाढला आहे. आपल्या उत्पन्नातला काही वाटा ते समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करतात. कर्करोग पिडीतांसाठी खर्च करतात. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या हितासाठी खर्च करतात. गुंतवूणक सल्लागार म्हणून अत्यंत यशस्वी कारकिर्द असलेले मिलींद संपगावकर यांच्या सामाजिक कार्याचा आलेखही असाच उत्तुंग आहे. “प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेने मानवी मूल्य जपत मेहनतीने केलेले कार्य यशस्वी होतेच. तिथे यशाच्या सूर्याला उगवावे लागतेच”, असे मिलींद सांगतात. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श समाजाला नक्कीच प्रेरक आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.