ठाणे : वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी वाहनाची ठराविक वयोमर्यादा संपल्यानंतर आरटीओकडे ग्रीन टॅक्स (हरित कर) भरून वाहनाचे पूर्ननोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, हा कर भरण्याकडे अनेक वाहनमालक दुर्लक्ष करताना दिसतात. ठाणे आरटीओने अशा बेजबाबदार वाहनमालकांना हरित कर भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरात हरित कर थकविणाऱ्या खाजगी व ट्रान्सपोर्ट वाहने मिळून सुमारे १६ हजार १६० वाहन मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
पेट्रोल-डिझेल आदी इंधनावर चालणाऱ्या वाहनांतील धुरामुळे प्रदूषण वाढते. त्यातच वाहनांची वयोमर्यादा संपल्यानंतर अशी वाहने रस्त्यावर चालवल्यास प्रदुषणात भर पडुन पर्यावरणाला मोठा धोका पोहोचू शकतो. यासाठी आरटीओने वाहनांची कालमर्यादा ठरवली आहे. चारचाकी अथवा दुचाकीसाठी १५ वर्षे तर ट्रान्सपोर्ट वाहनांना आठ वर्षांची वयोमर्यादा आहे.
वाहनांची मुदत सपल्यानंतर ग्रीन टॅक्स भरून आरटीओकडून योग्यता प्रमाणपत्र घेऊन नंतरच वाहने रस्त्यावर चालविण्याची अनुमती असते. मात्र, वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे नूतनीकरण करण्याची तसदी कुणी घेत नाहीत. जुनी झालेली वाहने रस्त्यावर चालवल्याने धुरामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणालाही धोका पोहचतो. तेव्हा,अशा प्रकारांना आळा बसावा,यासाठी ठाणे आरटीओने २०२१-२२ या वर्षात ग्रीन टॅक्स न भरणाऱ्या खाजगी आणि ट्रान्सपोर्ट अशा सुमारे १६ हजार १६० वाहनांच्या मालकांना नोटीस बजावली आहे.