मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत नूतनीकरण करण्यात आलेल्या महिलांच्या प्रसाधन गृहासाठी भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या ‘ती फाऊंडेशन’ संस्थेकडून सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन भेट देण्यात आले आहे.डॉ. भारती लव्हेकर या भारतातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणाऱ्या महिला व आमदार आहेत. त्यांना भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून, त्यांचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम व डिस्पोजल मशीन स्थापन केल्या आहेत.
मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने येणार्या आजाराबाबत अजूनही जनजागृती करण्याची गरज आहे.‘ती फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ती करण्याचा प्रयत्न मी करतेय, असे भारती लव्हेकर यावेळी म्हणाल्या. या व्हेंडींग मशिनच्या वार्षिक देखभालीची जबाबदारीही लव्हेकर यांची ‘ती फाऊंडेशन’ करणार आहे. पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. लव्हेकर यांनी ही मशिन आज पत्रकार संघास सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विजय तारी उपस्थित होते.