युवराज जागे होणार का?

    21-Dec-2022   
Total Views |
bharat jodo yatra


चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यातच चीनकडून मृतांची संख्या लपवली जात असल्याचे म्हटले जात आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांसह अन्य देशांतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारतानेही खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने एक बैठक घेऊन सद्यःस्थितीचाआढावा घेतला. तसेच, काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ‘भारत जोडो यात्रे’मध्ये ‘कोविड’प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सध्या ही यात्रा राजस्थानात असून राजस्थानातील काही खासदारांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान कोरोना पसरण्याच्या शक्यतेबाबत आरोग्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले होते. याच खासदारांचा संदर्भ देत मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे. पत्रात मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की, “ ’भारत जोडो यात्रे’त कोरोना नियम पालनासह मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यांनी कोरोना लसीचा डोस घेतला त्यांनाच रॅलीमध्ये प्रवेश द्यावा. त्याचप्रमाणे, जर नियमांचे पालन करणे शक्य नसेल, तर ही यात्रा देशहिताच्या दृष्टीने पुढे ढकलण्याचे आवाहनही आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. राजस्थानचे भाजप खासदार पीपी चौधरी, निहाल चंद आणि देवजी पटेल यांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर आक्षेप घेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले खरे मात्र, यात्रेवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. खरं तर अन्य देशांतील परिस्थिती पाहता स्वतः राहुल गांधी यांनी पुढाकार घेऊन ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु, तसे न होता त्यांची यात्रा निरंतर सुरू आहे. तसे पाहायला गेल्यास ‘भारत जोडो’ यात्रेतून काँग्रेस आणि राहुल यांना फायदा कमी आणि तोटाच जास्त झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता यात्रा काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानात असल्यामुळे यात्रा थांबवली जाण्याची तूर्तास तरी शक्यता दिसून येत नाही.

ते शहाणपणाचे लक्षण ठरेल


भारताने मोठ्या धीरोदात्तपणे कोरोनाच्या लाटांचा सामना केला आणि हे संकट परतवून लावले. देशातील नागरिकांना मोदी सरकारने मोफत लस देण्यासह जगालाही लसपुरवठा केला. परंतु, कोरोनाचा उगमस्त्रोत अर्थात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतीय आरोग्य मंत्रालयाने योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेतील गर्दी कोरोनाला साहाय्यकारक ठरू नये यासाठी केंद्राने यात्रा पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु, त्यावरही काँग्रेसने राजकारण सुरू केले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोग्यमंत्र्यांचे पत्र पूर्णपणे राजकीय असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भाजपकडून यात्रेवरील लक्ष वळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, गुजरात निवडणुकीचा दाखला द्यायलाही चौधरी विसरले नाहीत. आधीच ही यात्रा प्रचंड वादात सापडली आहे. कर्नाटकचा ध्वज, तसेच स्वा. सावरकरांचा अपमान, पैसे देऊन यात्रेत माणसे सहभागी होत असल्याच्या आरोपांनी ही यात्रा वादात सापडली. विशेष म्हणजे, यात्रा सुरू असतानाही त्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलटपक्षी भाजपला कधी नव्हे ते घवघवित यश मिळाले. प्रथमच भाजपचे १५०हून अधिक उमेदवार निवडून आले आणि ‘भारत जोडो’ यात्रा प्रभावशून्य असल्याचे सिद्ध झाले. यात्रा महाराष्ट्रात असतानाही राहुल यांनी स्वा. सावरकरांचा अपमान केला होता. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. तेव्हाच ही भारत जोडो नव्हे तर भारत तोडो यात्रा असल्याचे समोर आले. सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही राहुल यात्रेची वाट चालत आहे. उद्या ही यात्रा कोरोना पसरवण्यासाठी साहाय्यकारक ठरली, तर त्याला जबाबदार कोण राहणार, हादेखील प्रश्न उपस्थित होतो. राहुल यांच्या आततायीपणामुळे परिस्थिती गंभीर होण्यास वेळ लागणार नाही. अशीही फ्लॉप ठरलेली ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीपर्यंत आणखी फ्लॉप होण्याची चिन्हे आहेत. दक्षिण भारतातील राजकारण वेगळे असल्याने तिथे थोडाफार प्रतिसाद मिळाला खरा परंतु उत्तर भारतात मात्र ते अवघड आहे. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून यात्रा स्थगित करणे शहाणपणाचे लक्षण ठरेल.









आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.