मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे नायगांव व वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या ४६० पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीची विंग, इमारतीतील सदनिकेचा मजला आज निश्चित करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगांव बीडीडी चाळीतील १२ बी, १३ बी, १४ बी, १५ बी, १६ बी, १९ बी व २२ बी या इमारतींमधील ४४२ पात्र भाडेकरू / रहिवासी व वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील सावली इमारतीतील १८ भाडेकरू / रहिवाशांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी तत्वावर मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक (Randomised) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित करण्यात आला.
प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/ रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे.
यावेळी उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य श्री. जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी श्री. मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक श्री. सतीश आंबावडे, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत धात्रक, कार्यकारी अभियंता श्री. सुनील भडांगे, उपमुख्य अधिकारी (बीडीडी प्रकल्प) श्री. राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे.