तुम करो तो बदला...

    18-Nov-2022   
Total Views |
supriya


आम्ही कधीही बदल्याचे राजकारण केले नाही.” सुप्रिया सुळे बाईंनी नुकतेच विधान केले. देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ते तुरुंगात आहेत. मात्र, सुळेबाईंनी उद्गार काढले की, हे बदल्याचे राजकारण आहे आणि या राजकारणाचा पुढचा भाग जितेंद्र आव्हाड अडसर आहेत. सुळेबाईंच्या या बोलण्यात कुणाला स्वारस्य किंवा तथ्य नसणारच.पण, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, तर काळ सोकावतो आहे.जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुळेबाईंना वाटते की, हा गुन्हा चुकीचा दाखल झाला आहे. पोलीस,मुख्यमंत्री आणि कार्यकर्ते उभे असताना कुण्या महिलेचा विनयभंग तेही काही सेकंदात कसा होऊ शकतो, असाही प्रश्न त्यांना पडला.त्यांना पडलेला प्रश्न हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कारण, संविधानाने महिलांच्या रक्षणासाठी, उत्थानासाठी कितीही कायदे केले तरी त्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्यावेळी स्वतःला ‘नेता’ वगैरे मानणारे लोक हमखास कायद्याच्या अंमलबजावणीला अडथळा आणत असतात.जितेंद्र आव्हाडांनी सामाजिक कार्यकर्ता रिदा रशीद हिचा विनयभंग केला की नाही हे ठरवणारे आपण न्यायालय नसलो, तरीसुद्धा माणूस म्हणून ते दृष्य पाहताना जर कुणाला त्यात काहीच वावग वाटत नसेल, तर मग महिला हक्क आणि संविधानाच्या गप्पा मारण बंद करणेच ठीक.अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेबाईंबद्दल त्यांच्या दैनंदिनी बोलीतलाशिवराळ शब्द वापरला. तो चूकच होता. त्या शब्दासाठी सुळेबाई व्यथित झाल्या. त्यांचा अवघा पक्ष रस्त्यावर उतरला. मात्र, आव्हाडांच्या घटनेत तर प्रत्यक्ष कृती होती. रिदा भाजी विक्रेता गरीब महिलेची कन्या, तर सुळेबाई तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या जन्मजात नेता. त्यामुळे या दोघींचा अपमान किंवा स्त्री सुलभ भावना सन्मान यामध्ये फरक असेल का? छे, तसे असेल तर हा संविधानाचा अपमान आहे. असो. आता रिदा रशीदवर ‘अ‍ॅट्रोसिटी’ची केस कुणीतरी टाकली आहे. ही केस आताच कुणीतरी टाकणे हा योगायोग आहे की काय? आम्ही बदला घेत नाही म्हणणार्‍या सुळेबाई यावर गप्प बसतील. त्याआधी केतकी चितळेची अटक हा बदला होता की नव्हता याबद्दलही त्या उत्तर देणार नाहीत. मात्र, देशमुख नवाब मलिक आणि आव्हाडांचा बदला घेतला जातोय, असे त्यांना वाटते. थोडक्यात, ‘हम करे तो न्याय तुम करे तो बदला!’
प्रसिद्धी हवी, कशीही!

इंदोरला एका मिठाईवाल्याच्या दुकानात म्हणे कोणी तरी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात बॉम्बस्फोट आणि राहुल गांधी यांचा उल्लेख आहे. आता यावर काही नतद्रष्ट लोक (हे तेच लोक जे राहुलबाबावर जळतात) म्हणतात ही चिठ्ठी ‘पब्लिसिटी स्टंट’ असू शकते. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ का ‘तोडो यात्रा’ सुरू झाल्यानंतर राहुल यांनी पादर्‍यांसोबत हिंदू धर्माबाबत उलटसुलट चर्चा केली. त्यावर बराच गदारोळ झाला. यामध्ये राहुल गांधींना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. राहुल यांच्याशी चर्चा करताना त्या पादरीने ख्रिस्ती धर्माला महत्त्व दिले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वायनाडच्या बहुसंंख्य मुस्लीम मतदारांवर प्रभाव पडू शकत होता. कारण, या वायनाडच्या मतदारांच्या मते, त्यांच्या धर्मापुढे कोणताच धर्म मोठा नाही. आपल्या चर्चेचा दुष्परिणाम वायनाडला पडला, तर पुढे वायनाडला पण ‘टाटा-गुडबाय’ करावे लागेल, हे राहुल यांनी ओळखलेच असावे.मग पुढच्या यात्रेत राहुल गांधींच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ने यात्रेचा रोखच बदलला. नरेंद्र मोदींना ‘सायलेंट’ मतदार म्हणजे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मतदान करून जिंकवतो, हे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला माहिती आहे. त्यामुळे या यात्रेमध्ये मुली-महिला मोठ्या संख्येने सामील होतील, याकडे त्यांनी लक्ष दिले. मग राहुल गांधींच्या यात्रेमध्ये महिला दिसू लागल्या. या सगळ्या जणी राहुल गांधींची गळाभेट घेत, राहुल गांधी त्यांचा हात हातात घेत आणि त्या राहुल गांधींच्या खांद्यावर डोके ठेवून चालत असत, असे दृश्य दिसू लागले. मात्र, ही कोणती संस्कृती असा प्रश्न देशभर उमटला. झाले हीसुद्धा ‘स्ट्रॅटिजी’ही चुकली. राहुल गांधींच्या यात्रेला अजिबात प्रसिद्धी मिळेनाशी झाली. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ असे वागण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आली. महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करून त्यांनी घाणेरड्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवलीच. त्याहीपुढचे, राहुल गांधींची यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करण्याआधीच इंदोरच्या मिठाईवाल्याकडे यात्रेत बॉम्बहल्ला करण्यासंदर्भातली चिठ्ठी सापडली. यात्रा पोहोचण्याआधीच त्या यात्रेबद्दल देशभरात चर्चा सुरू झाली. काही का असेना राहुल गांधी खूश असणार. का? म्हणजे लोक ढुंकून विचारत नाहीत, पण यानिमित्ताने का होईना, राहुल गांधी आणि त्यांच्या यात्रेबद्दल बोलतात तरी. आता या प्रसिद्धीलोलुपतेला काय म्हणावे?

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.