देहाचे 35 तुकडे, प्रेम आणि लव्हजिहाद!

    15-Nov-2022   
Total Views |

Aftab Shradda


वसईच्या श्रद्धा या 26 वर्षांच्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणारा आफताब पुनावाला. सध्या या घटनेने देश हादरला आहे. या घटनेने ‘लव्ह जिहाद’ आणि हा ‘जिहाद’ करणार्‍यांची विकृत क्रूर मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. या अनुषंगाने काही समाज अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया या लेखात संकलित केल्या आहेत. तसेच या घटनेनंतर समाजात काय चर्चा सुरू आहे, हे मांडण्याचा इथे केलेला प्रयत्न...

आफताब पुनावालाचे ’फेसबुक अकांऊट’ पाहत होते. त्याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍या श्रद्धाचा त्याने खून केला होता आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते ‘फ्रीज’मध्ये ठेवले हेाते. 18 दिवस तो ते तुकडे थोडे थोडे नेऊन जंगलात फेकत होता. इतकेच काय? त्यानंतरही त्याच घरात तो इतर मुलींशी लैंगिक संबंध ठेवत होता? या विकृत खुन्याची राक्षसी पार्श्वभूमी काय असेल? त्याच्या ‘इन्स्टा’ पेजवर जवळजवळ 28 हजार ‘फॉलोवर’ आहेत. त्याचे ‘फेसबुक अकाऊंट’ पाहिले तर हजारो ‘फॉलोअर्स’ त्यात हिंदूकन्यांचा भरणा. कित्येक हिंदू मुलींसोबत त्याचे अंगचटीला आलेले फोटो.


हो! आफताब ला स्त्रीस्वातंत्र्याचा पार कळवळा पण होता. स्त्रियांना ‘लेबल’ लावूनका. त्यांना मुक्त जगू द्या, बंधनं टाकू नका वगैरे वगैरे ’पोस्ट’ही त्याने केल्या होत्या. या दिवाळीला फटाके फोडू नका, पर्यावरणाचा नाश होतो, अशी खास निधर्मी ‘पोस्ट’ही तो टाकण्यास विसरला नव्हता. असा हा आफताब अत्यंत मुक्त विचारांचा निधर्मी आधुनिक. मात्र, एकाही मुस्लीम युवतीसोबत त्याचे फोटो नाहीत किंवा मुस्लीम रितीरिवाजांवर त्याची टिप्पणी नाही. हेच आफताबाचे खरे रूप होते. हिंदू मुलींसोबत मैत्री करणे, अतिशय सलगीचे फोटो काढणे आणि ते फेसबुकवर टाकणे, यात त्याला काही गैर वाटले नाही आणि ना त्याच्या त्या गैरमुस्लीम मैत्रिणींना. कारण, ‘चलता हैं।’ जग बदलले. जातीपाती करत तुम्ही देश तोडता? ‘गंगा-जमना तेहजीब’ जिंदा आहे, अशी मानसिकता.


बहुतेक आईबाबांचे म्हणणे असते, मुलगी परक्याचे धन. आज ना उद्या सासरी जाईल. लग्न झाल्यावर आहेच नियमाने वागणे. आम्हाला आमच्या तरुणवयात जे करायला मिळाले नाही, ते तिला करू दे. आमची लेक आहे, तिचे पाऊल कधी वाकडे पडणार नाही. दुसरीकडे मुलींना वाटते, आम्हाला कुणी फसवूच शकत नाही. आम्ही इतक्या खास आहोत की, आमच्यावर मुले मरतात. ते आमच्यासाठी वाट्टेल ते करतील. हो! एकवेळ येते की, या मुली ‘सुटकेस’मध्ये किंवा श्रद्धासारख्या फ्रीजमध्ये तुकडे होऊन सापडतात. मनात विचार सुरू होता आणि इतक्यात फोन आला.


समोरून ती व्यक्ती बोलत होती, “मॅडम, इट्स हंबल रिक्वेस्ट. ते तुम्ही ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स’वर ठेवले ते चूक आहे. तो मेसेज चुकीचा आहे.” आवाज ओळखला, अरे, हे तर मुस्लीम समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते. या व्यक्तीला कोणती ‘पोस्ट’ चुकीची वाटली असेल? त्यांना म्हटले कोणता ‘मेसेज’? तर त्यांचे म्हणणे, ”आफताबने श्रद्धाचा खून केला हा ‘मेसेज.’ तुमच्या ’मेसेज’मध्ये त्याचे नाव दिसते. मग वाचणार्‍यांना वाटते की, तो मुस्लीम आहे.” मला आश्चर्य वाटले आणि म्हटले, मग तो मुस्लीम नाही का? तर त्याचे म्हणणे ” तो मुस्लिम आहे.पण, त्याचे आडनाव बघा. तो काही सुन्नी, सच्चा मुसलमान नाही.” मी म्हटले, ‘’मुस्लिमांमध्ये पण असे असते का?” तर यावर त्यांचे म्हणणे, “जाऊ द्या मॅडम, पण एकट्या आफताबमुळे सगळ्या समाजाचे नाव खराब होते ना? तो काही सुन्नी नाही.”


अर्थात, या सगळ्या संवादाचा हेतू हा होता की, मुलाचे नाव आफताब असल्याने तो मुस्लीम आहे, हे कळते. त्यामुळे समाजाचे नाव खराब होते, तर ते तसे होऊ नये, यासाठी हा फोन होता. हे काही नवीन नाहीच. गेल्याच महिन्यात रुपाली चंदनशिवे हिचा मुंबईत भर रस्त्यात गळा चिरून खून करण्यात आला. गळा चिरणारा तिचा पती इकबाल शेख होता. त्यावेळीही आक्रमकपणे काही लोक मला म्हणत होती की, ”केस घरगुती हिंसाचाराची आहे. यात ‘लव्ह जिहाद’ काही नाही. ’लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे. हिंदुत्ववादी लोकांनी केलेला शब्दच्छल आहे. हिंदू-मुस्लीम मुलामुलींचं प्रेम होऊ नये, गंगा जमना तेहजीब वाढू नये, यासाठी ते असे ‘लव्ह जिहाद’ बोलतात.”


या पार्श्वभूमीवर प्रश्न असा येतो की, घरातल्यांच्या इच्छेविरूद्ध मुस्लीम धर्मीय मुलाशी प्रेम, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ किंवा निकाह करणार्‍या मुलींचा खून जेव्हा त्यांचे प्रेमी किंवा पती करतात तेव्हा ते काय आहे? एखादी मुलगी सगळे बंध सोडून, जन्माचे नाते तोडून त्या मुलासोबत मोठ्या आशेने जीवन जगायचे स्वप्न बघते. तिला काय ती स्वप्नं आपोआप पडलेली असतात? छे, तिला ती स्वप्नं दाखवलेली असतात. एखाद्या मुलीला काय बोलल्यावर आणि काय केल्यावर आवडेल, याची इत्यंभूत माहिती बातमी काढून तसे वागले जाते. आर्थिक सुबत्तेचे, मुक्त स्वातंत्र्याचे आणि प्रेमविश्वासाचे खोटे विश्व तिच्यासमोर उभे केले जाते.


मुस्लीम मुलांशी लग्न केलेल्या किंवा लग्न न करता त्याची दुसरी-तिसरी पत्नी बनून राहिलेल्या काही गैरमुस्लीम मुलींशीही संवाद साधला. तेव्हा कळले की, त्या मुली त्या पुरूषाच्या गोड बोलण्याला, रंग-रूप किंवा ‘फॅशनेबल’ राहणीमानाला भुलल्या होत्या. त्याहीपलीकडे जाऊन या पुरुषांनी या मुलींना विश्वास दिला होता की, ‘तुझ्यासाठी मी काहीही करेन. तू माझी झाली नाहीस, तर मी जीव देईन किंवा तू माझी झाली नाहीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही.’ थोडक्यात, आपल्या जीवनात ही मुलगी अतिविशेष आहे, असे या पुरुषांनी त्या मुलींना भासवले होते. बहुतेक जणांनी तर पहिली ‘गर्लफ्रेंड’ किंवा जगातल्या इतर सगळ्याच मुली किती वाईट आहेत आणि तू किती सर्वगुणसंपन्न आहेस, असे मुलीला सांगून जाळ्यात ओढले होते. या सगळ्यांमध्ये समानता मात्र एक होती. ती म्हणजे, या मुलींना ओळख झाल्यावर आपण किती सभ्य आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तशी वातावरणनिर्मिती केली होती.


मात्र, या मुलीला पाहून इमान डगमगले, आता लैंगिक संबंध ठेवले नाही, तर वेडा होईन, असे या मुलींना त्या पुरूषांनी सांगितले होते. या मुलींना ऐनकेन प्रकारे लैंगिक संबंध ठेवण्यास राजी केले होते, दबाव टाकला होता. असे का? तर एकदा मुलीशी लैंगिक संबंध ठेवला, तर मुलीला घाबरवून, पुन्हा पुन्हा तिच्यावर बलात्कार करता यावा म्हणून. या मुलीशी असे संबंध ठेवल्यानंतर त्यांना सांगितले गेले की, तू हे सगळे केलेस, तुझ्याशी कोण लग्न करणार? तुझ्या घरच्यांना, जातीवाल्यांना कळले, तर तुला ते हाकलवतील, संबंध तोडतील. या मुलींना हे सगळे खरे वाटले. ते काही अंशी खरेही होतेच. भावनिक एकटेपणा सहन करण्याची ताकद या मुलींमध्ये नव्हती. हे सगळे होईपर्यंत त्यांना समजले होतेे की, त्याने दाखवलेला चांगुलपणा, सभ्यता, माणुसकी वगैरे वगैरे ही केवळ फसवणूक होती. त्यांनाही प्रश्न पडलाच की, त्याच्या समाजातही मुली होत्याच ना? मग हे माझ्यासोबतच का? विडंबना अशी की, याबाबत त्या वाच्यताही करू शकल्या नाहीत. कारण, आता त्या दोन-चार मुलांच्या अम्मीजान झालेल्या आहेत. तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत. मुख्य म्हणजे ती हतबल आहे.


प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदू मुलींना फसवायचे, त्यांचे शारीरिक शोषण करायचे, कंटाळा आला किंवा तिची जबाबदारी नकोशी झाली किंवा नवीन अशीच कुणी जाळ्यात फसली की, मग त्या मुलीचा क्रूर पद्धतीने जीव घ्यायचा. कधी तिच्या देहाचे तुकडे करून ’सुटकेस’मध्ये भरायचे, तर कधी फ्रीजमध्ये ठेवायचे. चुकूनमाकून जगलीच, तर आयुष्यभर प्रतारणा आणि अप्रतिष्ठा सहन करत तिने जगायचे. प्रेमाची, विश्वासाची परतफेड या मुलींना अशी का मिळावी? मुलींनी स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे किंवा तत्सम गोष्टी शिकल्या पाहिजे, असे आपण सारखे म्हणतो. पण मनाचे आणि भावनांचे संरक्षण करण्यासाठीचे काय? आपला धर्म, आपले नीती-संस्कार, आपली परंपरा चांगली आहे, हे या मुलींना काय मुलांनाही शिकवले जाते का?


आपण ज्या समाजाचे आहोत त्यामध्येच आजन्म राहावेसे वाटेल, अशी समाजाप्रति निष्ठा, प्रेम या मुलांमध्ये निर्माण होईल, असे काही मुद्दाम केले जाते का? की दि. 26 जानेवारीला, दि. 15 ऑगस्टला स्नेहसंमेलन आणि ’ऑर्केस्ट्रा’ ठेवले की, संपला सामाजिक कार्यक्रम, असेच करतो. घर आणि घरातले सदस्य म्हणून एकमेकांशी आपली किती बांधिलकी आहे? या सगळ्या गोष्टी आता ठरवून करण्याची वेळ आली आहे. कारण, त्याशिवाय पर्याय नाही. अर्थात, खर्‍या प्रेमनिष्ठेला बिलकूल विरोध नाही. मात्र, आमच्या मुली कधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’चा बळी होणार आणि त्यांचे तुकडे ‘सुटकेस’मध्ये किंवा ‘फ्रीज’मध्ये मिळणार? कधी पर्यंत?




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.