मुंबई(प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवाक गावातून एका घरात बिबट्या शिरला होता. या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. गुरवार दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री नवरात्रोत्सव संपवून देवीच्या विसर्जनासाठी घराबाहेर गेलेल्या मंडळींच्या घरत बिबट्या शिरला होता. हा बिबट्या पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला असल्याचा प्रार्थमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.
बिबट्या दिसताच घराबाहेर असलेल्या सदस्यांनी वन विभागास तत्काळ कळवले. वन विभागाची संपूर्ण टीम त्या ठिकाणी दाखल झाली. हेळवाक गावातील सुधीर कारंडे यांच्या घरात बिबट्या शिरला होता. गुरवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा वन्यजीव विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केले. या बिबट्याचे वय एक वर्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. या बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी केल्यावर या बिबट्याच्या डाव्या डोळ्याला मोती बिंदू असल्याचे समोर आले. तर मागच्या पायाने हा बिबट्या लंगडत असल्याचे देखील समोर आले आहे. या बिबट्याला पुढील उपचारांकरिता पाठविण्यात येणार आहे. या कारवाईत वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे , वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षकयांनी या बिबट्यास यशस्वी रित्या जेरबंद केले.