रा से रावण???

    30-Oct-2022   
Total Views |

bharat 
 
 
 
रामाने तर अयोध्या ते श्रीलंका पदयात्रा केली, पण राहुल गांधी हे रामापेक्षाही जास्त पदयात्रा करणार आहेत. ते कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करणार आहेत. राजस्थानचे काँग्रेसचे मंत्री परसादी लाल मिणा यांनी नुकतेच म्हटले, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “भगवान राम आणि जगद्गुरू शंकराचार्य पदयात्रेला निघाले. लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. भगवान रामाच्या नावाची सुरुवातसुद्धा ‘रा’ अक्षरावरून होते आणि राहुल गांधी यांच्या नावाची सुरुवातसुद्धा ‘रा’ अक्षराने होते.” परसादी लाल मिणा म्हणा किंवा नाना पटोले म्हणा, यांनी राहुल गांधी यांची तुलना प्रभू श्रीरामचंद्रांशी केली आहे. चमचेगिरी करावी तरी किती? निवडणुकीचे तिकीट मिळावे, आमदार-खासदार व्हावे, यासाठी किती ही लाचारी?
 
 
गल्लीतले छोटेसे बाळही सांगेल की, प्रभू श्रीरामचंद्र आणि राहुल गांधी यांची तुलना तरी होऊ शकते का? मुळात इथे एक मात्र बरे वाटले की, राम नावाची व्यक्ती कुणी महापुरूष नव्हतीच, राम नव्हतेच, तर त्यामुळे अयोध्येमध्ये त्यांची रामजन्मभूमी कशी काय असेल? किंवा रामसेतू असणेच शक्य नाही, असे मत मांडणारे काँग्रेसी सध्या प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव घेत आहेत. त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी का होईना, पण प्रभू श्रीरामचंद्रांचे संदर्भ देत आहेत.असो. राहुल किती तास पायी यात्रा करतात? ‘एसी कंटेनर’मध्ये सर्वसोईसुविधायुक्त सहलीसारखी चाललेली राहुल यांची पदयात्रा. बसून कंटाळा आल्यावर ‘चला जरा फिरून येऊ. मात्र, फिरताना थोडाही त्रास होऊ द्यायचा नाही, अशी खबरदारी घेतलेली यात्रा’ असे राहुल यांच्या यात्रेचे स्वरूप.
 
  
राहुल काय कंदमुळे खाऊन आणि उपाशी राहून यात्रा करत आहेत? मुळात राहुल यांच्या यात्रेचे अधिष्ठान काय आहे? धर्मनीतीचे रक्षण, संस्काराचे पालन? यापैकी काय आहे? तर यापैकी काहीही नाही. राहुल यांच्या यात्रेने कुणाचे काय भले झाले, हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे परसादी लाल मिणा किंवा नाना पटोले यासारख्या लोकांनी प्रभू श्रीरामचंद्रांची तुलना राहुल गांधी यांच्याशी करणे, हे अत्यंत संतापजनक आहे. आता यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, नाना पटोले विसरले की राहुल गांधींच्या नावाची सुरुवात ‘रा’वरून होते आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या अधर्मीविरूद्ध युद्ध लढले, त्या लंकाधिपती रावणाच्या नावाची सुरुवातही ‘रा’ शब्दावरूनच होते. असो. सोच अपनी अपनी!
 
 
औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय...
 
एका महिलेने पती आणि सासरच्यांबद्दल तक्रार केली, न्यायालयात केस उभी राहिली. घरगुती हिंसाचार, लग्नानंतर सुनेला नोकरासारखी वागणूक दिली, अशी सुनेची तक्रार होती. त्यात आणखीनही बर्‍याच तक्रारी होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कांकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी या खटल्याची सुनावणी करताना एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ते म्हणाले की, कुटुंबात राहणार्‍या महिलेला काम सांगितले, याचा अर्थ तिला नोकरासारखे वागवले, असे होत नाही. तिला लग्नानंतर घरातली काम करायची नसतील, तर तसे लग्नाआधी सासरच्यांना सांगायला हवे.
 
 
जेणेकरून मुलाला ठरवता येईल की, तिच्याशी लग्न करावे की करू नये. खंडपीठाच्या या निर्णयाबद्दल काही लोकांशी चर्चा केली, तर 99 टक्के लोकांचे मत होते की, घरातले काम केल्याने कोणी नोकर होत नाही. त्या घरची प्रतिष्ठा, फायदे हवे असतात, तर मग घरातले काम करणेही ओघाने आलेच. तसेच, आजही समाजात स्वयंपाक आणि घरातील इतर कामे घरातली स्त्रीच करते. तो एक अलिखित नियमच आहे. तिला काय मिळते? याचा हिशोब पैशाने होऊ शकत नाही. श्रमाच्या बदल्यात पैसे मोजून देणे, हे मजूर आणि मालक अशा संकल्पनेतले वास्तव आहे. घरातल्या नात्याच्या ऋणानुबंधांचे आणि कर्तव्याचे मोजमाप पैशांमध्ये होणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर समाजात काय चित्र आहे?
 
 
मार्क्सवादी विचारसरणीने आपल्या इथे स्त्रीमुक्तीचा विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे स्त्रीला काय आवडते किंवा पुरुषाला काय आवडते, त्यापेक्षा तो किंवा ती करत नाही तर मी का करू? असे भंपक विचार समानतेच्या नावानेबोकाळलेले दिसतात. पूर्वी घरचा पुरूषच अर्थार्जन करायचा आणि महिला घर सांभाळायच्या. आता महिलाही अर्थार्जन करतात. मग घरातले कामही महिलांनीच का करायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो, विवाहापूर्वीच मुलीने सासरच्यांना कल्पना द्यावी की, आपण विवाहानंतर घरात काम करणार की नाही? त्यामुळे भावी सासरच्यांना मुलीचे विचार पटले, तर ते मुलीला सून करतील. पुढचे सगळे वादविवाद टळतील. औरंगाबाद खंडपीठाने मुलींना स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्यासाठीचे मत दिले आहे. यावर विचार करणे गरजेचे आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.