पराधीन नसे पुत्र मानवाचा!

    03-Oct-2022   
Total Views |
 
Bhavna Bawkar
 
 
 
भावना बावकर... एक ध्येयसमर्पित व्यक्तिमत्त्व. वयाच्या सत्तरीनंतर मराठी साहित्यातील 106 दर्जेदार साहित्यकृतींचा ‘ब्रेल’ लिपीत अनुवादित करणार्‍या भावना बावकर यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा... 
 
 
 
पराधीन नसे पुत्र मानवाचा!
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा।
पराधीन आहे, जगती पुत्र मानवाचा॥
 
 
‘गीतरामायणा’मध्ये ग. दि. माडगूळकरांनी अटळ सत्य मांडले. मात्र, दैवजात दु:खांनाही पराभूत करत मानवी आयुष्याच्या पराधीनतेलाही जगाच्या कल्याणासाठीच मार्गी लावणारेही काही लोक या भूतलावर आहेत. या परिघामध्ये भावना गोविंद बावकर यांचे नाव समाविष्ट नाही झाले तरच नवल! भारती यांची आज वयाची 80 वर्षे उलटून गेली आहेत. ‘संध्याछाया भिवविती’ अशी भावना आजकाल लोकांना वयाच्या पन्नाशीतच उपाळून येते. ज्येष्ठ आणि वानप्रस्थ आयुष्याची काळजी वाटणार्‍या अशा सर्वांसाठी भारती यांचे जीवन म्हणजे दीपस्तभंच...
 
 
2011 ते आता 2022 या कालावधीत भारती यांनी 106 पुस्तकांचे ‘ब्रेल’ लिपीत भाषांतर केले आहे. ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ते सुधा मूर्ती, अनिल अवचट, माधुरी शानभाग आणि इतर अनेक मान्यवर साहित्यिकांच्या साहित्याचा ब्रेल लिपीत भावना यांनी अनुवाद केला. ‘ब्रेल’ लिपीत इंग्रजीमधले साहित्य अनुवादित झाले. इतरही भाषेतील पुस्तके अनुवादित झाली. सुखदा पंत यांच्या पुढाकाराने जवळ जवळ 400 व्यक्ती दर्जेदार साहित्य ‘ब्रेल’ लिपीत अनुवादित करण्याचे कार्य स्वेच्छेने करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भावना.
 
 
भावना यांनी 2011 साली ‘ब्रेल’ लिपी अवगत केली. त्यावेळी त्यांनी वयाची सत्तरी पार केली होती. गुडघेदुखीने त्या हैराण होत्या. त्याच काळात त्यांचे पती गोविंद हेसुद्धा हृदयविकाराने त्रस्त होते. जवळजवळ अंथरूणावरच खिळले होते, तर भावना यांचा लाडका नातू श्रेयस हा एका गंभीर आजाराने जन्मापासूनच अंथरूणावर होता. बोलण्या-ऐकण्याशिवाय तो स्वत:हून काही करू शकत नव्हता. तेव्हा त्याचे वय 12 वर्षे होते. भावना यांची दोन मुलेही तशी समाजशीलच. पण, पती आणि नातवामध्ये भावना यांचा जास्तीत जास्त वेळ जायचा. बहुविकलांग असलेला श्रेयस नेहमीच हसमुख असे. तो विदेशी भाषाही शिकल्या. 85 टक्के गुण घेऊन तो शालांत परीक्षेत उत्तीर्णही झाला. अनिश्चित आणि लौकिकअर्थाने कसलेच भवितव्य नसलेल्या आयुष्यातही त्याने त्याच्यापरीने कर्तृत्व निर्माण केले होते.
 
 
श्रेयसकडे पाहून भावना यांना एक प्रकारचे बळ मिळे. नातवाला मराठी साहित्यातली दर्जेदारकथा-कविता त्या वाचून दाखवत. ते ऐकताना नातवाच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून त्यांना आनंद वाटे. कुठेही चालू-फिरू न शकणार्‍या श्रेयसला साहित्याच्या जगातून जगाची ओळख होताना पाहणे हे त्यांच्यासाठी खूपच समाधानकारक होते. त्यावेळी त्या एका शाळेतून नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. शाळेत पूर्ण दिवस कसा जायचा, हे त्यांना कळायचे नाही. मात्र, निवृत्तीनंतर दिवसभर काय करायचे? नुसते बसून राहणे किंवा आराम करणे, त्यांना अजिबात आवडले नाही. याच काळात भावना यांची भेट पद्मा चापेकर यांच्याशी झाली. पद्मा या मराठी साहित्य ‘ब्रेल’ लिपीतून अनुवादित करत असत. तोपर्यंत ‘ब्रेल’ लिपीशी भावना यांचा काडीमात्र संबंध नव्हता.
 
 
‘ब्रेल’ लिपीतील साहित्य चक्षूहीन बांधव वाचू शकतात. त्यांच्यापर्यंतही उत्तमोत्तम साहित्य गेले पाहिजे यासाठी ‘ब्रेल’ लिपीतून साहित्य अनुवादित करणे, हे मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचे काम आहे, असे प्रथमदर्शनीच भावना यांना वाटले. निवृत्तीनंतर काय करायचे, या विचारात न पडता मग भावना यांनी ‘ब्रेल’ लिपी शिकली आणि दर्जेदार मराठी कथा-कादंबर्‍या-कविता त्यांनी ‘बे्रल’ लिपीत अनुवादित करण्यास सुरुवात केली. याच काळात भावना यांचे पती गंभीर आजारी पडले. दुसरीकडे नातवाची तब्येतसुद्धा ढासळू लागली. भावना यांचे मन व्याकुळ झाले. पण, दु:ख करून काही बदलणार नव्हते. दु:ख केले तर पती आणि नातू दोघेही आणखीन दु:खी होणार, या विचारांनी भावना यांनी स्वत:ला सावरले. ‘ब्रेल’ लिपीतून पुस्तके अनुवादित करण्याचा त्यांनी पण केला आणि बघता बघता भावना यांनी 100 पुस्तके अनुवादित केली. त्यातही पती जानेवारी 2022 ला मृत्यू पावले, तर थोड्या अवकाशाने लाडका नातूही देवाघरी गेला. हे दु:ख आभाळाइतके होते. पण, त्यानंतरही भावना यांनी काम सुरूच ठेवले आणि सहा पुस्तके अनुवादित केली.
 
 
वयाच्या 80च्या टप्प्यावर भावना यांना आधुनिक तंत्रज्ञान उत्तम हाताळता येते. स्मरणशक्ती वाणी अगदी तेजस्वी आहे. भावना यांचे वडील गोंविद भाटे हे डॉक्टर, तर आई इंदिरा ही गृहिणी आणि पुढे त्यांनी समाजात कुटुंब नियोजनाच्या जागृतीसाठी कार्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळातले हे दाम्पत्य अतिशय समाजशील. भाटे कुटुंब मूळचे कर्नाटकचे, पण कामानिमित्त ते पुणे तळेगावला राहू लागले. उत्तम संस्कार आणि संपन्न परिवारातल्या भावना यांचे लहानपण व्यतीत झाले. कलाशाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी शिक्षकेची नोकरी केली. पुढे गोविंद बावकर यांच्याशी विवाह झाला.
 
 
त्या सासरी मुंबईत आल्या. काही वर्षे गेल्यानंतर भावना यांनी बी.एड् केले. शिक्षक पेशा स्वीकारला. हजारो विद्यार्थ्यांना घडवले. या सगळ्या काळात कुटुंब आणि समाजाचे उत्थान यासाठी आपले जगणे, या सूत्रानेच त्या आयुष्य जगल्या. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत अंध बांधवांसाठी उत्तमोत्तम साहित्य ‘ब्रेल’ लिपीत अनुवादित करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्या म्हणतात की, ”माझे समाजाकडे एकच मागणे आहे की, डोळे मौल्यवान आहेत. कृपया मृत्यूपश्चात नेत्रदान करण्याचा संकल्प करा. दु:खांना घाबरू नका. चरैवेति चरैवेति... इच्छित कार्य करत राहू.” अशा भारती बावकर... त्यांच्या जिद्दीला आणि संकल्पाला नमन..!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.