धोकादायक लोकसंख्या असंतुलन

    14-Oct-2022   
Total Views |
 
डॉ. मोहनजी भागवत
 
 
 
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांना संबोधित करताना लोकसंख्या धोरणाची गरज अधोरेखित केली. तसेच लोकसंख्या असंतुलनामुळे अनेक देशांचे तुकडे पडले असून सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात ईस्ट तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवोचे उदाहरण दिले. त्यावरून, धर्माधारित लोकसंख्या असंतुलन एखाद्या देशासाठी धोकादायक कसे ठरू शकते, असा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी डॉ. मोहनजी भागवत यांनी उल्लेख केलेल्या तीन देशांमध्ये असे नेमके काय घडले की, त्यांचे तुकडे पडले, हे समजून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.
 
 
सरसंघचालकांनी उल्लेख केलेल्या देशांपैकी ईस्ट तिमोर आधी इंडोनेशियाचा भाग होता. वसाहतवादी काळात त्यावर पोर्तुगालचा तिथे ताबा होता, तर 1975 मध्ये जपानचा. नंतर त्या देशाचा इंडोनेशियात समावेश करण्यात आला. त्यावेळी इंडोनेशियात सुहार्तोचाहुकूमशाही कारभार होता. जगभरात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या इंडोनेशियात असून सुहार्तो मुस्लीमच होता, पण सेक्युलर! 1975 मध्ये ईस्ट तिमोरच्या भागात मुस्लीम बहुसंख्येने होते, तर 20 टक्के ख्रिश्चन होते. तथापि, सुहार्तोच्या भ्रष्टाचारी हुकूमशाहीमुळे ईस्ट तिमोरची जनता दारिद्य्रात खितपत पडली व ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्याचाच फायदा घेतला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू केले अन् 20 टक्क्यांची ख्रिश्चन लोकसंख्या 1990 मध्ये 95 टक्क्यांवर पोहोचली.
 
 
1989 मध्येच पोपने ईस्ट तिमोरचा दौरा केला, तर ईस्ट तिमोरमध्ये धर्मांतरासाठी जबाबदार असलेल्या बिशप कार्लोसला ‘नोबेल शांतता पुरस्कार’ दिला गेला. पुढे इंडोनेशियाच्या मुस्लीम अन् ईस्ट तिमोरच्या ख्रिश्चनांत वादाला सुरुवात झाली व ख्रिश्चनांनी स्वतंत्र देशाची मागणी केली. त्यातूनच 1999 साली भीषण हिंसाचार झाला अन् जागतिक दबावामुळे इंडोनेशियाने ईस्ट तिमोरमध्ये सार्वमत घेतले. त्यातूनच इंडोनेशियाचे दोन तुकडे झाले व ईस्ट तिमोर नामक नवा देश तयार झाला.
दुसरा देश म्हणजे सुदान, इथेही 97 टक्के मुस्लीम राहत असत. सुदानच्या दक्षिणेत कच्च्या तेलाचेही साठे आहेत. 1990 साली सुदानमध्ये केवळ पाच टक्के ख्रिश्चन होते आणि इथेही धर्मांतराचा खेळ सुरू झाला. 2011 पर्यंत सुदानच्या दक्षिण भागात ख्रिश्चनांची संख्या 61 टक्के झाली व त्यातूनच सुदानमध्ये मुस्लीम अन् ख्रिश्चनांत गृहयुद्ध सुरू झाले.
 
 
दक्षिण सुदानच्या जनतेने ‘सुदान रेव्होल्युशन पार्टी’ तयार केली. सुदानमध्ये इतिहासातील सर्वांत मोठे गृहयुद्ध झाले, लाखो लोकांचा बळी गेला वा पलायनासाठी अगतिक झाले. पुढे 2011 मध्येच इथे संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली सार्वमत घेतले गेले. त्यात दक्षिण सुदानच्या जनतेने वेगळ्या देशाच्या बाजूने मत दिले व सुदानचे दोन तुकडे झाले, दक्षिण सुदान नावाचा नवा देश अस्तित्वात आला. पुढचा देश म्हणजे कोसोवो, आधी युगोस्लव्हियाचा भाग होता. युगोस्लव्हियाचे तुकडे पडल्यानंतर कोसोवो सर्बियाचा भाग झाला. इथे सर्बस आणि अल्बेनियन्स असे दोन समुदाय राहत असत. बहुतांश सर्बस रुढीप्रिय ख्रिश्चन होते, तर अल्बेनियन्स मुस्लीम.
 
 
अधिक जन्मदरामुळे कोसोवोच्या एका भागात अल्बेनियन्सची संख्या वाढू लागली. 1921 मध्ये इथे अल्बेनियन्सची संख्या 65 टक्के होती ती 1991 मध्ये 82 टक्के झाली. सर्बसची संख्या इथे कमी होती, पण तिथे अतिशय महत्त्वाचे चर्च होते. कोसोवोच्या अल्बेनियन्सनी मानवाधिकार उल्लंघन आणि जातीय नरसंहाराचा मुद्दा उपस्थित केला व त्यातूनच इथे अंतर्गत लढाईला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी त्यात पुढाकार घेऊन ‘कोसोवो लिबरेशन आर्मी’ तयार केली. 1998 ते 1999 दरम्यान सर्बियाच्या ‘रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया’ आणि ‘कोसोवो लिबरेशन आर्मी’त युद्ध झाले, मोठ्या प्रमाणावर लोक मारले गेले, दोन लाख सर्बस लोकांना कोसोवो सोडावे लागले. ‘नाटो’नेही याकडे लक्ष दिले, 1999 मध्ये ‘नाटो’ने युगोस्लाव्हियावर बॉम्ब फेकले व कोसोवोवर आपला अधिकार स्थापन केला. 
 
 
नंतर 2008 साली कोसोवोनामक नवा देश तयार झाला, तर 2006 मध्ये सर्बियाचेही दोन तुकडे पडले व मॉन्टेनेग्रो अस्तित्वात आला. या तीन देशांतल्या घडामोडी पाहता, त्यासाठी लोकसंख्या असंतुलन सर्वाधिक जबाबदार ठरल्याचे दिसते. असेच 1947 साली भारतातही झाले व पाकिस्तानचा जन्म झाला. आजही भारतात धर्मांध मुस्लीम व मिशनर्‍यांकडून धर्मांतराचे, लोकसंख्या असंतुलनाचे उद्योग केले जातात, त्यामुळे लोकसंख्या धोरण गरजेचे असल्याचे स्पष्ट होते.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.