मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होताना दिसून आला. मुंबई महापालिका क्षेत्रात मालाडच्या मालवणी परिसरात बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आले. अशातच टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाल्याचे वक्तव्य शुक्रवारी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले.
'टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते, त्यांच्या नावाचा विरोध करण्याचे काम भाजप करत आहे.', असे ट्विट करत नवाब मलिक यांनी चक्क टिपू सुलतानचे गोडवे गायल्याचे दिसत आहे.
हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याचा गाजावाजा करणाऱ्या शिवसेनेने मात्र यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे. यावरून नवाब मलिक यांच्या म्हणण्याप्रमाणे शहीद झालेल्या टिपू सुलतानचे नाव क्रीडासंकुलास देण्यात शिवसेनेचे समर्थन असल्याचे निश्चितच दिसून येते.