नवी दिल्ली : महाराष्ट्रात ‘झिका’ विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि ‘झिका’बाधित रुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बहुआयामी पथक महाराष्ट्राकरिता रवाना केले आहे. पुणे जिल्ह्यात नुकताच ‘झिका’ विषाणूग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे.
केंद्राने पाठविलेल्या तीन सदस्यांच्या पथकात पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ, नवी दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालया’तील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ज्ञ यांचा समावेश आहे. हे पथक राज्य आरोग्य विभागासोबत समन्वयाने काम करून रुग्ण सापडलेल्या ठिकाणाची परिस्थिती समजून घेईल आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ‘झिका’ व्यवस्थापनासाठीच्या कृती योजनेची अंमलबजावणी आवश्यक आहे का, याचे मूल्यमापन करून राज्यातील ‘झिका’ विषाणू व्यवस्थापनासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप करण्यासाठी सूचना देईल.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून ‘कोविड’मुळे बाधित झालेल्यांपैकी ३ कोटी, ०८ लाख, ५७ हजार, ४६७ व्यक्ती यापूर्वीच ‘कोविड-१९’ आजारातून पूर्णपणे बर्या झाल्या आहेत आणि गेल्या २४ तासांत ३६ हजार,९४६ रुग्ण ‘कोविड’ आजारातून बरे झाले. यामुळे रोगमुक्तीदर ९७.३५ टक्के झाला आहे.
देशात दिवसभरात ४० हजार, १३४ नवे रुग्ण
भारतात गेल्या २४ तासांत ४० हजार, १३४ नव्या ‘कोविड’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. सलग ३६ दिवस रोज नोंदवल्या जाणार्या नव्या ‘कोविड’बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. भारतातील ‘कोविड’ सक्रिय रुग्णसंख्या आज ४ लाख, १३ हजार, ७१८ इतकी आहे आणि सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण ‘कोविड’बाधितांच्या संख्येच्या १.३१ टक्के इतके आहे. देशभरात ‘कोविड’ संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या २४ तासांत देशात एकूण १४ लाख, २८ हजार, ९८४ चाचण्या करण्यात आल्या.
संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात ४६ कोटी, ९६ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. देशभरात एकीकडे ‘कोविड’ चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर सध्या २.३७ टक्के आहे, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर आज २.८१ टक्के इतका आहे. आता सलग ५६ दिवस दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांहून कमी राहिला आहे. सर्व स्रोतांद्वारे आतापर्यंत राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना ४९.६४ कोटी लसीचे डोस पुरवले गेले आहेत आणि आणखी ९ लाख ८४ हजार ६१० डोस पुरविण्यात येणार आहेत. ३.१४ कोटींपेक्षा जास्त (३,१४,३४,६५४) लस डोस अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.