मिशन ऑलिम्पिक : शेवटपर्यंत लढायचं बघा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2021   
Total Views |

Sandip Chavan_1 &nbs
 
टोकियो (संदीप चव्हाण) : “सर, गावाकडे एरव्ही ट्रकवर रेती उपसली असती. पण, या खेळानं या हाताला सन्मान दिलाय. जगण्याचा आणि जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिलाय.” ‘टोकियो ऑलिम्पिक’च्या दुसर्‍या फेरीतील पराभवानंतर प्रवीण आपल्या भावना मोकळ्या करत होता. मोठ्या मुश्किलीनं पापण्याआड उंचंबळून येणारे अश्रू त्याने रोखून धरले होते. ‘ऑलिम्पिक’ला धडकणारा तो महाराष्ट्राचा पहिला तिरंदाज तर ठरलाच; पण पदापर्णातच पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत धडक देऊन त्याने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवलाय.
 
 
प्रवास कितीही मैलाचा असला तरी त्या प्रवासाची सुरुवात ही शून्यापासून होते. महाराष्ट्राचा नेमबाज प्रवीण जाधवनं हा शून्य ओलांडलाय. नुसताच ओलांडला नाही, तर त्याचे पहिले पाऊलही दमदार पडले. त्याच्या पावलावर पावूल टाकत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील अनेक प्रवीण जाधव पुढचा ‘ऑलिम्पिक’ प्रवास आता अधिक आत्मविश्वासानं करतील.
 
 
‘ऑलिम्पिक’च्या पहिल्या फेरीत माजी जगजेता आणि जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक भूषविलेला रशियाचा गॅलसन आणि दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थान भूषविलेला आणि तीन ‘ऑलिम्पिक’ पदक जिंकलेला खेळाडू असेल तर तुमची काय अवस्था होईल. आपले पहिलेच ‘ऑलिम्पिक’ खेळणार्‍या प्रवीणनं रशियाच्या गॅलसनचा पहिला अडथळा ६-० असा दिमाखात पार केला. दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या ‘ऑलिम्पियन मेडिलिस्ट’ एलिसन ब्रॅडी विरुद्ध तो ६-० असा पराभूत झाला असला, तरी त्यानं ब्रॅडीला घाम नक्की फोडला होता. प्रवीणला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुभवाची कमतरता जाणवली.
 
 
सातार्‍याच्या सरडे गावातील हा खेळाडू, घरचे अठराविश्व दारिद्य्र. खायची भ्रांत. दिल्लीतील ‘कॉमनवेल्थ’च्या वेळी महान धावपटू मिल्खा सिंग मला एकदा म्हणाले होते, “बेटा, ये पेट की भूख हैं ना, यह जिंदगी में आपको दौडना सिखा देती हैं।” भारताच्या फाळणीनंतर आणि कुटुंबीयांचे पाकिस्तानातून भारतात येण्यापूर्वी शिरकाण झाल्यानंतर निराधार झालेल्या मिल्खा सिंगनी आपल्या भुकेलाच आपली ताकद बनवली होती. मिल्खाचा वारसा सांगणारे अनेक खेळाडू भारताच्या कानाकोपर्‍यात दडलेले आहेत. प्रवीण हा तो वारसा सांगणार्‍या खेळाडूंपैकी एक...
 
 
 
आज प्रवीणवर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याला विचारलं की, “महाराष्ट्राचा तू पहिला ‘ऑलिम्पियन’ तिरंदाज ठरलायस. इतिहास घडवलायस.” पण, खरं सांगतो, त्याला या शब्दांचा अर्थही ठाऊक नाही. आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक स्वप्ने जळून राख होतात. या राखेतून जे झेप घेतात ते इतिहास घडवतात. प्रवीणला माझ्या या आलंकारिक शब्दांपेक्षा, घरला आईला आता काय सांगायचे, याची चिंताच अधिक आहे. “यंदा नाही जमलं. पण, पुढल्या वेळीस नक्की मेडल आणेन,” असं आईला कसं समजवायचं, यासाठी त्याची घालमेल सुरू आहे. शब्द सापडत नाहीत. झोपडीवजा घरात राहणार्‍या प्रवीणच्या ‘ऑलिम्पिक मिशन’ला कुठेही बाधा येऊ नये म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्याचे सुरुवातीचे शाळेचे शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याला सगळ्या अडचणींपासून दूर ठेवले होते. विकासचे एकच स्वप्न आहे. राहायला एक चांगले छत हवे आहे. ‘ऑलिम्पिक’चे महात्म्य आता संपले आहे. पुढील ‘ऑलिम्पिक’पर्यंत लोकांना प्रवीणचा विसरही पडेल. पण, तरीही प्रवीण म्हणतो तसं.... “सर, लढणे आपल्या हातात आहे. आपण शेवटपर्यंत लढायचं बघा...” त्याच्या पुढील सर्व लढायास शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नव्हतं... त्याच्या डोळ्यातील ती चमक, तिरंदाजी स्टेडियमधून सायंकाळी अंधारलेल्या वाटेवरून निघताना नजरेसमोरून हटता हटत नव्हती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@