मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने परीक्षा न झालेल्या दहावी इयत्तेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. दुपारी ११ वाजता महाराष्ट्र बोर्डाने निकाल जाहीर केला होता. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार होता. मात्र निकाल बघण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतानाच महाराष्ट्र सरकारने दिलेली वेबसाईट क्रॅश झाली. यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा हिरमोड झाला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. राज्यातून १५ लाख७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून मिळाले, त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.
दरम्यान, निकाल पाहण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदाच्या वर्षी २ संकेतस्थळ दिली होती. मात्र ही दोन्ही संकेतस्थळ तब्ब्ल १ तासाहून अधिक काळासाठी ठप्प झाल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. लाखो विद्यार्थी आणि पालक एकाचवेळी साईटवर आल्याने हा प्रकार घडला.
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ६५ हजार ८९८
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १५ लाख ७४ हजार ९९४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९९.९५ टक्के
विभागनिहाय टक्केवारी
कोकण - १०० टक्के
पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर - ९९.८४ टक्के
औरंगाबाद - ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती - ९९.९८ टक्के
नाशिक - ९९.९६ टक्के
लातूर - ९९.९६ टक्के
ठाकरे सरकार हँग झालं आहे. त्यामुळे १०वीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली तर नवल काय? ठाकरेंसारकरने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीचा घेतलेली दिसतेय.
-अतुल भातखळकर, भाजप आमदार