मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली आहे. अँटिलियाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. हिरन यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचं नाव आल्याने एनआयएने त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मनसुख हिरन यांच्या हत्येचा मास्टरमाईंड प्रदीप शर्मा होते, अशी माहिती मिळतेय. अटकेत असलेल्या विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव यांच्यासह आणखी दोघांनी मनसुख हिरण यांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला. हे सगळे प्रदीप शर्मा यांच्या जवळचे आहेत. प्रदीप शर्मा यांनी त्यांना पैसे आणि गाडी दिली. प्रदीप शर्माने या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असल्याचेही समजते आहे. शर्मांना दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. त्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. एनआयएने एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस शर्मांची चौकशी केली होती. काही महिने ही चौकशी थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने सीआरपीएफच्या ताफ्यात मुंबईच्या अंधेरीतील त्यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती सुरु केली. अनेक तासांच्या झाडाझडती आणि चौकशीनंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली.
प्रदीप शर्मा कोण आहेत ?
- प्रदीप शर्मा १९८३ साली पोलीस सेवेत रुजू झाले
- पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख
- ३१२ गुंडांचा प्रदीप शर्मा यांच्याकडून एन्काऊंट
- कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही आरोप
- २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबन
- २०१७ मध्ये आरोपांतून क्लीनचिट
- २०१७ साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली
- २०१९ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा
- नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली
- मुंबईत अँटिलियाबाहेर स्फोटकं सापडल्याप्रकरणी एनआयएकडून चौकशी आणि अटक